Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थ्यांना यंदापासूनइलेक्ट्रॉनिक ओळखपत्रे

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक विभागांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदापासून इलेक्ट्रॉनिक ओळखपत्रे दिली असून, या ओळखपत्राद्वारे विद्यार्थ्यांकडून होणारा सुविधांचा वापर, विद्यार्थ्यांच्या सुविधा-शुल्क अशी माहिती मिळणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षेसोबतच विविध योजना व उपक्रमांत हे ओळखपत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वन कॅम्पस, वन आयडी कार्ड या संकल्पनेतून हे इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र तयार केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक विभागाचे ओळखपत्र, ग्रंथालयाचे ओळखपत्र अशी ओळखपत्र सांभाळावी लागत होती. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर ओळखपत्र देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी यंदा करण्यात आली आहे. युनिक नंबर असलेल्या या ओळखपत्रात माहिती साठवण्यासाठी मेमरी कार्ड आहे. या ओळखपत्राची 'डुप्लिकेट' प्रत काढता येणार नाही. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र देण्यामागे व्यापक विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार असलेल्या प्रकल्पातील इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र हा पहिला टप्पा आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती किंवा इतर शैक्षणिक तक्रारींवर उपाययोजना करण्यासाठीही ओळखपत्र उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.
माहिती एका 'क्लिक'वर
या ओळखपत्राला विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शुल्कासह विद्यापीठाच्या योजनांतील सहभाग, ग्रंथालय-क्रीडा संकुलातील प्रवेश जोडण्यात आले आहे. त्यामुळे ही सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून, निर्माण केलेल्या सुविधांचा विद्यार्थ्यांकडून किती प्रमाणात वापर होतो. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, अशी माहिती या ओळखपत्रामुळे संकलित होऊ शकेल. या सर्वांचा फायदा विद्यापीठ प्रशासनाला धोरणे आखण्यासाठी होणार आहे.

Post a Comment

0 Comments

close