Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षकांचे आर्थिक शोषणसत्र!

शिक्षकांचे आर्थिक शोषणसत्र!
सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात कोणतीही नोकरी मिळविण्याचे व ती टिकवण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोरच असते. सर्वात सुखाची नोकरी म्हणून पाहिले जात असलेली शिक्षकाची नोकरीही सध्या धोक्यात आली असून प्रचंड मानसिक तणावात नोकरी टिकवून अध्यापन करणे जिकरीचे झाले आहे. खासगी अनुदानित प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधील शिक्षक संस्थाचालकांकडून होणार्‍या प्रतिमहिना हप्‍ता वसुलीला कंटाळले असले तरी नोकरी टिकवणे महत्त्वाचे आहे. एकही शिक्षक संस्थाचालकाविरूध्द तक्रार करण्यास धजावत नसल्याचे भयावह चित्र सध्या दिसून येते. 
सरकारी नोकरीत शिक्षकाची नोकरी चांगली अशी सर्वांची समजूत. त्याला कारणेही तशीच आहेत. सर्वात जास्त सुटी शिक्षकांना, रविवारसह मकर संक्रांत, दिवाळी, दसरा, श्रावण शुक्रवार, उन्हाळी सुटी, यासह गावोगावच्या जत्रा अशा अनेक सुट्या शिक्षकांना मिळतात. वेतनही चांगले, त्यात शिक्षक असल्याचा समाजातील मान निराळाच. त्यामुळे कोणीही शिक्षकांची नोकरीच चांगली असे म्हणतो. परंतु ‘जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे’ याप्रमाणे नोकरीला लागण्यापूर्वीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सोसणे आता अपरिहार्य बनले आहे. 
शहर तसेच जिल्ह्यातील अनुदानित खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी किमान 10 ते 15 लाख रूपये मोजावे लागतात. त्यानंतर सुमारे वर्ष-दीड वर्षानी वेतन सुरू होते. त्यानंतरही शिक्षकांना सुख लागतेच असे नाही. शाळेचा पट टिकविण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांचीच असते. त्यामुळे उन्हाळी सुटीत घरोघरी फिरून विद्यार्थ्यांना शोधण्याचे तसेच त्यांच्या पालकांना आपलीच शाळा, शिक्षण, भौतिक सुविधा इतरांच्या तुलनेत कशा चांगल्या आहेत, हे पटवून द्यावे लागते. हा कार्यक्रम स्वखर्चाने सुमारे महिनाभर शाळेतील शिक्षकांना करावा लागतो. याशिवाय प्रज्ञा शोध परीक्षा असो वा इतर स्पर्धा परीक्षा असोत यासाठी विद्यार्थ्यांकडून तयारी करून आपल्या शाळेतील विद्यार्थी स्पर्धेत कसे टिकतील, याकडे लक्ष द्यावे लागते. अलीकडील काळात पालक सजग झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांकडून काही चुकल्यास दुसर्‍याच दिवशी पालक शाळेत हजेरी लावून शिक्षकांना जाब विचारतात. अशा सगळ्या परिस्थितीला रोज शिक्षकांना तोंड द्यावे लागते. यातून संस्थापकाचा जाच निराळाच असतो. 
ग्रामीण भागातील अनेक अनुदानित शाळांचे संस्थापक हे पुढारीच आहेत. त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला वर्गणी शिक्षकांकडून वसूल केली जाते. अनेक संस्थापकांचे नातेवाईकच मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतात किंवा संस्थापकाच्या जवळच्या व्यक्‍तीकडेच मुख्याध्यापकाची जबाबदारी दिली जाते. अनेक शाळांमधून शिक्षकांच्या वेतनातून प्रतिमहिना ठरलेली रक्‍कम वसूल केली जाते. काही शाळात स्केलनुसार म्हणजे डीएड शिक्षकाकडून प्रतिमहिना 2 हजार, तर पदवीधर शिक्षकाकडून प्रतिमहिना 3 ते 5 हजार रूपये घेतले जातात. या वसुलीला संस्थापकांकडून सांस्कृतिक भाषा वापरली जाते. वर्गणी, शाळेची देखभाल दुरूस्ती या नावाखाली प्रतिमहिना सर्वच शिक्षकांकडून रक्‍कम वसूल केली जाते. काही संस्थापकांनी तर चक्‍क शिक्षकांच्या नावावर 2  ते 5 लाखांचे कर्ज उचलले आहे आणि या कर्जाच्या हप्त्याची रक्‍कम शिक्षकांच्या वेतनातून कपात होत आहे. काही संस्थापकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बस खरेदी केल्या आहेत. त्याही शिक्षकांकडून गोळा केलेल्या पैशावर. या स्कूल बसचे हप्‍तेही शिक्षकांच्या पगारातून भरले जात असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.  
शिक्षकाने आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला रोज मुख्याध्यापकाच्या जाचाला सामोरे जावे लागते. रजा न देणे, उशिरा आल्यास कारवाई करणे, मेमो देणे, डमी पालकांना पाठवून त्या शिक्षकाविरूध्द तक्रार करायला लावणे, सरप्लस करणे जी.पी.एफ.बॅंकेचेकर्ज न देणे असे उद्योगही काही संस्थापक करीत असतात. वर्गणी, शाळा देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली घेतली जाणारी रक्‍कम शाळेवरही खर्च होताना दिसत नाही. अनेक शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत आहेत. तर अनेक शाळांना साधी संरक्षण भिंत, शौचालय, स्टाफरूम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नसल्याचे विदारक चित्र आहे. 
ग्रामीण भागातील अनेक संस्था तर पुढार्‍यांच्याच असल्याने राजकीय  पक्षाच्या प्रचारासाठी शिक्षकांकडून हप्‍ता घेतला जातो. एवढ्यावरच न थांबता या शिक्षकांना प्रचारात राबवून घेतले जाते. संस्थापकाच्या घरचे लग्‍न कार्य असो किंवा गावातील जत्रा असो जेवणाच्या पंगती वाढण्यापासून ते जेवलेली ताटे उचलण्यापर्यंत शिक्षकांकडून कामे करून घेतली जातात. शिक्षकही बिचारे नाईलाजाने का होईना ही जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून येते. हप्‍ता वसुलीच्या त्रासाला कंटाळून गेल्या काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाने संस्थापकाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी मात्र संस्थापकाने तडजोड करून हे प्रकरण मिटवले होते. शिक्षकांकडूनच संस्थापकाचा जाच सहन केला जात असल्याने संस्थापकांचे फावते आहे.
   याशिवाय शिक्षक निवृत्त होताना पेन्शनची फाइल करताना देखील शिक्षकांकडून रक्कम उकळली जात आहे.
आयुष्यभर नोकरी करून, आर्थिक शोषणाला बळी पडून
शेवटी हातपाय थकल्यावर शिक्षक बिचारे काय करणार
पेन्शन,ग्रॅच्युईटी, पेन्शन विक्री हे लाभ मिळवून शेवटी राहण्यासाठी झोपडी बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगून असल्याने शेवटी फाईल वर सह्या रक्कम ठरविल्या शिवाय, दिल्याशिवाय होत नाहीत.सगळेच कांहीं सारखे नसतात कांहीं चांगले असतील त्यांना वंदन करतो.पण आपल्या वाट्याला आलेलं शेअर केलं तर यातना कमी होतील आणि
भविष्यात कुणाच्या नशीबी आले तर त्याची मानसिक तयारी होईल.लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका नामांकित शाळेच्या विद्यार्थी प्रिय, त्यागी, ऋषीतुल्य आणि ज्यांच्या नावाने आज प्रतिष्ठान चालविले जाते, उदगीरच्या शैक्षणिक इतिहासात मानदंड ठरणाऱ्या अशा महान व्यक्तीला पेन्शनसाठी झालेला त्रास आणि मन:स्ताप सर्वश्रुत आहे
निवृत्ती नंतर करावयाच्या सत्कारासाठी, निरोपाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ज्याला निरोप द्यावयाचा आहे त्यांच्याकडे पैशाची मागणी करणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती असू शकते.टाळूवरले लोणी खाण्याचा
हा प्रकार म्हटले तरी वावगे ठरणार नाही
    हे सर्व सहन करावंच लागतं नाहीतर लेकरं बाळं, बायका पोरं ,मायबाप, बहीण भाऊ आणि विशेष म्हणजे समाज
विद्रोह केला तर समाज देखील वाळीत टाकतो,अरे असं तर नोकरीत होतंच
    काळ बदलेल, परिस्थिती बदलेल,दिवस बदलतील असा आशावाद कांहीं अंशी ऑनलाईन च्या काळात, मोदीजीनी
निर्माण केलाय
आशावाद निर्माण झालाय
शेवटी
        कालाय तस्मै नमः
कुलकर्णी सर मातोळकर

Post a Comment

0 Comments

close