Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जर्मन भाषा शिकण्यास व शिकविण्यास इच्छुक शिक्षकांना सुवर्ण संधी

जर्मन भाषा शिकण्यास व शिकविण्यास इच्छुक शिक्षकांना सुवर्ण संधी. जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमित शिक्षकांना अर्ज करता येईल. 



महाराष्ट्र शासन व बाडेन वुर्टेनबर्ग राज्य (जर्मनी) यांचे दरम्यान दिनांक 25/02/2024 रोजी झालेल्या सामंजस्य करारानुसार आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: कौशल्य 2024 / प्र.क्र.51/ एसडी- 6 दिनांक 11/7/2024 अन्वये महाराष्ट्रातील कुशल/अकुशल मनुष्यबळ बाडेन वुर्टेनबर्ग राज्य (जर्मनी ) येथे पुरविण्यात येणार आहे. जर्मनी येथे पुरविण्यात येणाऱ्या या मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन पुणे यांच्याकडून ठराविक कालावधीनंतर घेतली जाणारी A 1, A 2 या स्तरनिहाय परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. सदर विविध परीक्षांसाठी प्रशिक्षण वर्ग प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणे प्रस्तावित आहे. या वर्गांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जर्मन भाषेचे प्रशिक्षक तयार करणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक शिक्षकांनी हा फॉर्म भरावा.

इच्छुक शिक्षकांचे स्वतःचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळेचे एकूण चार विकल्प देण्यात येतील. प्रत्येक ऑनलाईन प्रशिक्षण वर्गासाठी 16 ते 25 शिक्षकांची एक बॅच असेल. प्रत्येक बॅच साठी चार ते पाच आठवड्यांमधून एकदा ऑफलाइन तासिका आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये शंका निरसन व समुपदेशनावर भर असेल. A1, A 2, B 1 व B 2 या चार प्रमाणपत्र परीक्षा नऊ ते दहा महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे ज्यामध्ये किमान ९०% उपस्थिती प्रत्येक प्रमाणपत्रासाठी आवश्यक राहील. प्रत्येक जिल्ह्यातून अशी किमान एक बॅच बनवण्यात येईल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षित शिक्षकांद्वारे आयोजित केले जाणारे प्रशिक्षण वर्ग खालील नियमांना अनुसरून आयोजित होतील.


१) सदरील वर्ग कमाल 40 प्रशिक्षणार्थी क्षमतेचे असतील, ज्यात जर्मनी येथे रोजगारासाठी उपरोक्त शासन निर्णयानुसार जाण्यास इच्छुक सर्वसाधारणपणे वाहन चालक, सुरक्षा रक्षक, सुतार (कारपेंटर), नळ जोडारी (प्लंबर), आचारी (कुक), रंगारी (पेंटर) इत्यादी निवडक 30 कौशल्य प्रकारांच्या कुशल / अकुशल प्रशिक्षणार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्यात येईल.

२) या प्रशिक्षणार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत जिल्हानिहाय निवडण्यात येईल.

३) जर्मन भाषेच्या A-1 व A-2 प्रमाणपत्रासाठी एकूण सात ते आठ महिन्यांमध्ये त्यांना प्रशिक्षित करायचे आहे. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी 45 मिनिटांच्या अंदाजे 160 तासिका घेणे अपेक्षित आहे. या जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल -



४) प्रत्येक सत्रामध्ये/ सेशनमध्ये काय शिकवायचे आहे याचे सविस्तर वेळापत्रक देण्यात येईल. सबब अंदाजे 160 तासिकांमध्ये प्रत्येक प्रमाणपत्रासाठीचा आवश्यक अभ्यासक्रम प्रत्येक विद्यार्थ्याकडून पूर्ण करून घेणे ( लिहिणे/ वाचणे/ बोलणे/ ऐकणे इत्यादी सर्व कौशल्ये ) बंधनकारक राहील.

५) प्रशिक्षित शिक्षकास प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी सोमवार ते शुक्रवार मधील कोणत्याही दोनच बॅच किंवा/आणि शनिवार- रविवारच्या एका बॅचचे वाटप करण्यात येईल.

६) प्रशिक्षण घेतांना व देतांना सुद्धा सुट्ट्या कमीत कमी मिळतील याची नोंद घ्यावी.

७) सर्व प्रशिक्षण वर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी असतील. (प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे व नंतरच्या प्रशिक्षणाचे वर्ग सुद्धा)

८) प्रशिक्षण वर्गामध्ये आवश्यक साहित्य (संगणक, प्रोजेक्टर, स्क्रीन, साऊंड सिस्टिम, माईक, खडू, फळा, बेंच इत्यादी) पुरविण्यात येईल.

९) प्रशिक्षणार्थी शिक्षकांना व नंतर प्रशिक्षण देताना सुद्धा सर्वांना आवश्यक पूरक साहित्य व यासाठी निवडलेली पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतील.

१०) प्रशिक्षणार्थी शिक्षकांना संपूर्ण अभ्यासक्रम / कोर्स कसा शिकवायचा याचेही प्रशिक्षण देण्यात येईल, जे बंधनकारक असेल. अध्यापकांच्या संपूर्ण कामकाजावर सनियंत्रण ठेवण्यात येईल व आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, ज्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.

११) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आदेशाप्रमाणे प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेणे आपल्याला बंधनकारक असेल. तसेच सदरील प्रशिक्षण मधेच समाधानकारक कारणाशिवाय सोडून दिल्यास किंवा प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च वसूल करण्यात येईल तसेच शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात येईल.

१२) प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडे वैयक्तिक लक्ष देणे, प्रत्येक पंधरवड्यातील परीक्षेत त्यांच्या दिसून आलेल्या उणीवा पुढील पंधरवड्यातील परीक्षेपर्यंत समाधानकारकपणे दूर करणे व सर्व प्रशिक्षणार्थी हे त्या स्तरासाठीची परीक्षा उत्तीर्ण होण्यास सक्षम करणे ही प्रशिक्षकाची जबाबदारी असेल.

१३) हे संपूर्ण प्रशिक्षण मोफत असेल.

१४) सदरील प्रशिक्षण घेण्यासाठी कोणताही अतिरिक्त मोबदला मिळणार नाही व आपण जेव्हा प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षण देण्यास सुरुवात कराल त्यावेळीसुद्धा कोणताही अतिरिक्त मोबदला देण्यात येणार नाही. तसेच आस्थापनाविषयक कोणत्याही नियमात बदल होणार नाही. उपरोल्लेखित नुसार, आयोजित करावयाच्या जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गासाठी शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियमित शिक्षक, ज्यांना जर्मन भाषा B-2 परीक्षेच्या स्तरापर्यंत शिकून व नंतर सध्या नियुक्त जिल्ह्याच्या ठिकाणी जर्मन भाषा शिकविण्याचे वर्ग घेण्याची तयारी आहे अशा शिक्षकांनी खालील अर्ज भरावा.

अर्ज भरताना सर्व माहिती इंग्रजी भाषेमधेच भरावी.




Post a Comment

0 Comments

close