Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*कोरडा खोकला का येतो ?*

*कोरडा खोकला का येतो ?*

एकदा सहज खोकून पाहा. आता सांगा तुम्ही काय काय केलेत ते ? एवढे विचारात पडू नका. आधी तुम्ही दीर्घ श्वास घेतला. मग एपिग्लाॅटीस नावाचा घशातील पडदा श्वासनलिकेवर दाबला. त्यानंतर तुम्ही दाबाखाली हवा बाहेर सोडली. हे करताना आवाजही झाला (ज्याला आपण खोकला म्हणतो) व श्वासनलिकेतील चिकट पदार्थ व बेडकाही बाहेर आला. आपल्या लक्षातही न येता एवढ्या क्रिया आपण केल्या. श्वासनलिकेत काही गेले (धूळ, पाणी, अन्नकण इत्यादी), तर ते काढून टाकण्यासाठी खोकल्याचा उपयोग होतो. खोकला हे अशा प्रकारे शरीराचे प्रतिकाराचे शस्त्रच आहे. रोगांमध्ये मात्र जिवाणू व विषाणूंच्या क्रियेमुळे व दाहामुळे वारंवार खोकला येतो. बेडके पडतात; पण खोकून खोकून छाती, घसा दुखायला लागतात. बेडक्यासहीत येणारा खोकला म्हणजे ओला खोकला. नुसताच येणारा खोकला म्हणजे कोरडा खोकला. कोरडा खोकला का येतो ते आता पाहु. आपल्या इच्छेने आपण खोकु शकतो व आपल्या मनाविरुद्ध व इच्छेविरुद्धही आपल्याला खोकला येतो.

पोटातील जंतू असतील, घशाचा व स्वरयंत्राचा दाह होत असेल किंवा कर्करोगाच्या गाठीमुळे किंवा फुगीर महारोहिणीमुळे जर श्वासनलिकेवर दाब येत असेल तर कोरडा खोकला येतो. काही मानसिक रोगातही कोरडा खोकला येतो. असा त्रासदायक खोकला थांबवण्यासाठी कोडेन व नोस्कापीनसारखे औषध उपयोगी पडते. सोबत संबंधित रोगाचा उपचारही घेणे अगत्याचे ठरते. बेडके पडणाऱ्या खोकल्यात मात्र खोकलाविरोधी औषधे घेऊ नयेत. बेडके बाहेर आल्याने रोगजंतू शरीराबाहेर पडतात व ते आवश्यक असते. बेडक्याच्या तपासणीवरून रोगाचे निदानही करता येते. रोगाप्रमाणे उपचार घेणेच श्रेयस्कर होय.

संकलन
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

साभार
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन

Post a Comment

0 Comments

close