Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

नांदेड - केंद्र सरकारने जाहिर केलेल्या मानधन वाढीची अधिसुचना काढावी यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने गेल्या पंधरा दिवसापासून असहकार आंदोलन सुरू आहे. बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. मोर्चानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोलन केले.
शहरातील कलामंदिर भागातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चा पोलिस अधिक्षक कार्यालय, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हा परिषदेवर धडकला. मोर्चातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य कराव्यात, अशी घोषणाबाजी केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेत द्यावे, मध्यंतरी सरकारने जाहीर केलेल्या मानधनाबाबतची अधिसुचना विना विलंब काढावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन बाबतीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी, थकीत मानधन त्वरीत द्यावे, सन २०१६ पासून थकीत असलेला टीए-डीए देण्यात यावा मोबाइल प्रशिक्षण काळात जेवणासाठी खर्च झालेली रक्कम द्यावी, सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ द्यावा, अतिरिक्त कामाचे मानधन द्यावे, या प्रमुख मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
घोषणाबाजीने झेडपीचा परिसर दणाणला
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाचा हा मोर्चा उपाध्यक्षा शततारका काटकाडे, अश्विनी महल्ले, कुशवर्ता पांचाळ, रोहिणी टेंभूर्णीकर, सुरेखा सावंत, वंदना पवार, विजया लाभशेटवार, अनुसया नवसागरे, महानंदा पांचाळ, प्रभाबाई मामीडवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. या मोर्चासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या घोषणाबाजीने जिल्हा परिषदेचा परिसर दणाणला होता.

Post a Comment

0 Comments

close