Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कविता - तुम्हीच सांगा ... सगळ्यांनाच सगळं यावं हे नेमके जमेल कसे?

तुम्हीच सांगा ......

सगळ्यांनाच सगळं यावं
हे नेमके जमेल कसे?
तुम्हीच सांगा उडतील कसे
उंच आकाशात  मासे?
सांगा त्या़ंना कोणत्या श्रेणीत घेऊ?
की अप्रगतच्या यादीत  ठेवू?

कोणी काढतो सुंदर चित्रे
अन् रेखाटतो रेखीव रांगोळी
नाहीच लक्षात राहत त्याच्या
कवितेच्या सगळ्या ओळी
सांगा त्याला कोणत्या श्रेणीत घेऊ
की अप्रगतच्या यादीत ठेवू?

मोत्यासारखे अक्षर त्याचे
पाहणारा प्रेमात पडे
तोंडी हिशोब करतो भरभर
पण कुठे येतात त्याला पाढे?
सांगा त्याला कोणत्या श्रेणीत घेऊ?
की अप्रगतच्या यादीत ठेऊ?

ती मोठी बोलघेवडी
सगळ्या स्पर्धा जिंकून येते
गणिताचा पेपर म्हटला की
पोटात तिच्या कळ येते
सांगा तिला कोणत्या श्रेणीत घेऊ?
की अप्रगतच्या यादीत ठेऊ?

तो सरसर चढतो झाडावर
अन् सुसाट धावतो वा-यागत
इंग्रजीची एबीसीडी
नाहीच होत त्याला अवगत
सांगा त्याला कोणत्या श्रेणीत घेऊ?
की अप्रगतच्या यादीत ठेऊ?

पहिलीतला कृष्णा माझा
खाडखाड वाचतो फळे
वहीवर लिहीताना
नुसतेच काढतो गोळे
सांगा त्याला कोणत्या श्रेणीत घेऊ?
की अप्रगतच्या यादीत ठेऊ?

लेकरे अशी विविधांगी
त्यांना कोणती चाळणी लावू?
कोण याच्यात, कोण त्याच्यात
एका दोरीत कसे घेऊ?
तुम्हीच सांगा त्यांना कोणत्या श्रेणीत घेऊ?
की अप्रगतच्या यादीत ठेऊ?

वाचन, लेखन गणिती क्रिया
एवढेच शिक्षण असते का?
जगण्याच्या शर्यतीत
दुसरे काहीच नसते का?
सांगा त्यांच्या कलाकलाने घेऊ?
की घोकंपट्टीची झापडे त्यांच्या डोळ्यावर लावू?

🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲

Post a Comment

0 Comments

close