शाब्बास गुरुजी शाब्बास ...
डॉ . गजानन पाटील
मागील आठवडयात मराठवाडयातील एका स्थानिक वृतपत्रामध्ये माझ्या समस्त शिक्षकांचा , गुरुजनांचा अवमान करणारा लेख लिहून संबंधित संपादकांनी आपले स्थानिक वृतपत्र प्रसिध्दीच्या झोतात आणण्याच जो केविलवाणा प्रयत्न केला त्यामुळे संबंधित संपादकांनी शिक्षण विभाग, शिक्षकांची कामे, कोरोनाच्या महामारीत सुध्दा शिक्षकांची विद्यार्थ्या प्रती चाललेली धडपड या विषयाचे ज्ञान अतिशय त्रोटक असल्याचे या लेखातून सिध्द करून दाखविले आहे .
कोणत्याही वृतपत्राचा संपादक जितका सुसंस्कृत असतो तितके त्यांचे वृतपत्र समाज मनात प्रवेश करते . सवंग लोकप्रियता मिळविण्याच्या नादात संपादक महाशयांनी डोकं ठिकाण्यावर न ठेवता तमाम महाराष्ट्रातील गुरूजनांचा अवमान करणारा संपादकीय लेख लिहिताना समाजमान्यतेचा कोणताही अभ्यास न करता गरळ ओकली आहे . अशा महाभागांना वेळीच धडा शिकवायला हवा . लेखनी विकलेली माणसंच फक्त अशा प्रकारचे लेख लिहितात हे पुन्हा एकदा सिध्द झाले .असो .
खरं तर माझ्या महाराष्ट्रातील शिक्षक गुरुजनांविषयी सांगायचं झालं तर खूप कांही आहे .कोरोनाच्या या महामारी मध्ये माझ्या शिक्षकाने कोरोना योध्दा म्हणून पोलिसांच्या, आरोग्य सेवकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे . घरातील लहान मुलांची पर्वा न करता त्यांनी हे काम केले आहे . याची जाणीव तर महाशयांनी ठेवायला हवी होती . कोरोनाची ड्यूटी बजावताना अनेक शिक्षकांना कोरोना झाला . त्यात ३५ हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला . पण जीवाची पर्वा न करता शिक्षकांनी प्रशासनाने लावलेला प्रत्येक काम मनापासून केले . रस्त्यावर उभे राहण्यापासून रेशन वाटण्या पर्यंत सर्व कामं शिक्षकांनी मनापासून केली . त्या कामाचे तोंड भरून कौतूक सोडाच पण त्यांच्या हा ड्यूटीचा भाग आहे असा समज अनेक महाभागांनी केला . त्यानंतर जून पासून शाळा जरी सुरू झाल्या नसल्या तरी ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षक आपल्या आपल्या पद्धतीने काम करताना दिसून येत आहेत . स्वतःचे पैशे खर्च करून काम करत आहेत .एवढेच काय जिथे रेंज नाही तिथे स्वतः शिक्षक पायी किंवा गाडीने जाऊन मुलांना शिकवण्याचं काम करत आहेत . जर शिक्षक इतकं चांगलं काम करत असताना सुद्धा कोणीतरी सोम्यागोम्या त्यांच्याविषयी वाईट साईट लिहीत असेल तर मग सुसंस्कृत म्हणणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये आम्ही गप्प बसायचं का ? हाही प्रश्न आहे .
अशा लुंग्या सुंग्यांना गुरुजीचा जिथे अर्थच कळला नाही तर त्यांचे पावित्र कार्य काय डोंबल समजणार ? मुळात गुरु हा लघु नसतोच . तो मोठा असतो .म्हणून भारतीय संस्कृतीत गुरू हा महान आहे . गुरु हे गुरुजी होतात तेव्हा गुरूपरंपरेतील त्यांचे स्थान अढळ असते . म्हणून सन्मानपूर्वक गुरूजी हा शब्द उचारला जातो . तसेच शिक्षक म्हणजे ज्या व्यक्तीत शिस्त, क्षमाशीलता आणि कर्तव्य यांचा मिलाफ झालेला असतो ते शिक्षक . मास्तर या शब्दाचा अर्थ तर त्यांना समजलाच नाही .मास्तर म्हणजे मॉ- स्तर म्हणजेच आईच्या स्तरावर जाऊन जो मुलाला घडवतो तो मास्तर .अशा शिक्षकांच्या विषयी ,गुरुजनांच्या विषयी , मास्तरांच्या विषयी अपशब्द वापरून त्यांची निंदा-नालस्ती करून या सदगृहस्थाला काय मिळाले असेल ? समजत नाही .
अशा प्रकारची शिक्षकांच्या विषयी गरळ ओकणारे बहुसंख्य माणसं व्यवस्थेमध्ये आलिकडच्या काळात तयार होत आहेत . त्यांना त्यांचं काम दिसत नाही, त्या कामा पाठीमागची धडपड दिसत नाही, मुलांना शिकवण्यासाठी चाललेली त्यांचे प्रयत्न दिसत नाहीत , प्रशासनाने कोणतेही काम सांगितल्यानंतर ती करण्यासाठीची त्यांची मनस्थिती दिसत नाही .फक्त दिसतो तो त्यांचा पगार आणि गाडया .
माझा शिक्षक राष्ट्र घडवणार आहे . माझा शिक्षक या देशातील पंतप्रधान, राष्ट्रपती यांना घडवणार आहे .म्हणूनच माझ्या मते माझा शिक्षक पंतप्रधान ,राष्ट्रपती पेक्षा सुद्धा मोठा आहे . अशा समाजाच्या आधार स्तंभाला , समाज घडविण्याच्या शिक्षकांना कोणीही कांहीही बोलले तर खपवून घेतले जाणार नाही , हे मात्र ध्यानात ठेवावे . गुरुजींच्या कामा बदल मी एवढंच म्हणेन की शब्बास गुरुजी शाब्बास ! तुम्ही तुमचं पवित्र काम करत रहा आम्ही सारे तुम्हा सोबत आहोत .
डॉ . गजानन पाटील
या लेखाबाबत आपल्या प्रतिक्रिया comment box मध्ये अवश्य व्यक्त करा.


3 Comments
धन्यवाद साहेब आपण नेहमी आमच्यासाठी प्रेरणादायी आहात.यामुळे अश्या मानसिकतेच्या लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो...खरे म्हणजे अशी भाषा वापरणारी व्यक्ती संपादक या पदासाठी शोभत नाही. सर आपली शिकवण आणि प्रेरणा घेऊन काम करणारे हजारो शिक्षक आज महाराष्ट्रात आहेत.ते सदैव उत्कृष्टच काम करतील.या लेखणी द्वारे आपण मांडलेली भूमिका अतिशय मार्मिक.
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteGud
ReplyDelete