महाराष्ट्र राज्यातील विशेष शाळांमधील बौद्धीक अक्षम विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या दिशा अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय | implementation of DISHA curriculum for intellectually disabled students
राज्यामध्ये दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी शासकीय संस्था व स्वयंसेवी संस्थांमार्फत अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर व बौद्धीक अक्षम प्रवर्गासाठी शाळा, कर्मशाळा, प्रशिक्षण केंद्र, संलग्न वसतीगृहे, मतिमंद बालगृहे इत्यादी विशेष उपक्रम निवासी व अनिवासी स्वरुपात चालविले जातात. दिव्यांगांच्या विशेष उपक्रमांकरीता, दि.१८ जुलै, २०१८ व दि.०५ फेब्रुवारी, २०१९ अन्वये सुधारित विशेष शाळा संहिता लागू करण्यात आली असून, अस्थिव्यंग, मूकबधीर व अंध प्रवर्गाकरीता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यांनी ठरविलेला अभ्यासक्रम राबविला जात आहे.
जय वकील फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर, मुंबई या संस्थेने बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांकरीता बौद्धीक अक्षमतेच्या स्तरानुसार (Mild to Profound) विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम वय वर्षे ३ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. सदर अभ्यासक्रम National Institute for the Empowerment of Persons with Intellectual Disabilities (NIEPID) यांचे दिनांक २ ऑगस्ट, २०२२ च्या पत्रान्वये प्रमाणित करण्यात आला आहे. राज्यातील बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमामध्ये तसेच वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमाच्या (Individulised Education Program) मुल्यांकनाच्या सूचीमध्ये (Assessment Check List for IEP) एकसमानता व सातत्य यावे या उद्देशाने जय वकील फाउंडेशन आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात जानेवारी, २०१९ पासून दिशा अभियान सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात जय वकील फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर व महाराष्ट्र शासन यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. दिशा अभियानांतर्गत सदर अभ्यासक्रम सप्टेंबर, २०१९ पासून दिव्यांगांच्या बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांमध्ये शिकविण्यात येत आहे.
यासंदर्भात आयुक्त, दिव्यांग कल्याण यांच्या दिनांक २२ जून, २०२२ च्या पत्रान्वये दिशा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बौद्धीक अक्षम प्रवर्गातील सर्व विशेष शाळांचा दिशा अभियानामध्ये पूर्णपणे सहभाग नोंदविणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. तसेच या अभियानातील ऑनलाईन प्रशिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे, दिशा वार्षिक कॅलेंडर, "दिशा अंमलबजावणी शाळा" तयार करण्याबाबत मुख्याध्यापकांची भूमिका इ. बाबींसाठी कालबद्ध नियोजन करण्यासाठी संबंधित विशेष शाळांचे मुख्याध्यापक व दिशा अभियानाचे मार्गदर्शक (दिशा समन्वयक) यांच्या बैठका आयोजित करण्याबाबत सर्व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.
संबंधित विशेष शाळांच्या नूतनीकरण प्रस्तावासंबंधीच्या तपासणी अहवालामध्ये दिशा अभियानाच्या अंमलबजावणी नमूद करूनच प्रस्ताव सादर करण्याबाबतसुद्धा सर्व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना निदेश देण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्व बौद्धीक अक्षम विशेष शाळांमध्ये दिशा अभियान राबविणे बंधनकारक आहे. त्यासाठी दिशा पोर्टल / विभागाचे पोर्टल, अभ्यासक्रम व मुल्यमापन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
राज्यातील सर्व बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांमध्ये दिशा पोर्टल / विभागाचे पोर्टल, अभ्यासक्रम व मुल्यमापन प्रणाली राबविणे बंधनकारक करण्यात येत आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यासाठी जिल्हाधिकारी यांची असेल.
त्यानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, मुंबई शहर / मुंबई उपनगर तसेच या विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हास्तरावरील अधिकारी यांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
1) दिशा पोर्टलवर शाळांना ऑनबोर्ड करणे: राज्यातील बौद्धीक अक्षम विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सर्व विशेष शाळा दिशा पोर्टलवर ऑनबोर्ड करण्याची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगरामध्ये जिल्हाधिकारी यांचेकडून करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्यातील उक्त प्रवर्गाच्या विशेष शाळांचे समन्वयन संस्थेसोबत करण्याची कार्यवाही करावी. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांची नोंद दिशा पोर्टलवर /विभागाच्या पोर्टलवर केली आहे, याची खात्री करावी. माहिती अचूक असल्याचे खात्री करण्यासाठी माहिती दरवर्षी / आवश्यकतेनुसार अद्यावत करावी.
2) मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे प्रशिक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर / मुंबई उपनगर यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन / प्रत्यक्ष बैठका आणि प्रशिक्षणांना सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी उपस्थित रहावे. तद्नंतर मुख्याध्यापक यांनी विशेष शाळेच्या उर्वरित शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करावे व त्यांना प्रशिक्षण द्यावे.
3) वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम (IEP-Individualised Education Program) तयार करणे : प्रत्येक शैक्षणिक वर्षात, सर्व शिक्षकांनी दिशा पोर्टलवर / विभागाच्या पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांची IEP साठी मूल्यांकन सूची (Assessment Checklist for IEP) पूर्ण करणे आवश्यक आहे, ज्यायोगे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेसोबत त्यांच्या सर्वांगीण कार्यक्षमतेच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळू शकेल. दिशा पोर्टल / विभागाच्या पोर्टल संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका व जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील.
a) IEP साठी मूल्यांकन सूची (Assessment Checklist for IEP) च्या आधारे शिक्षकांनी पालक /पालकांचे प्रतिनिधी / थेरपिस्ट यांच्याशी सल्लामसलत करून विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक वर्षाच्या कालावधीसाठी शाळेमध्ये पूर्ण करावयाची तसेच घरी पूर्ण करावयाची ध्येये (Goals) निश्चित करावे. त्यामधील ध्येये निवडून वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम (IEP) तयार करावा.
b) वरीलप्रमाणे तयार केलेला वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम (IEP) शिक्षकांनी पोर्टलद्वारे मुख्याध्यापकांकडे मंजूरीसाठी सादर करावा.
c) मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमाची तपासणी करावी व आवश्यकता भासल्यास त्यामध्ये सुधारणा करावी. त्यानंतर दिशा पोर्टलवर / विभागाच्या पोर्टलवर वार्षिक IEP ध्येयांना मंजूरी द्यावी.
d) शाळेचे मुख्याध्यापक / वरिष्ठ शिक्षक / शिक्षक यांनी पालक / पालकांचे प्रतिनिधी / थेरपिस्ट यांचेसोबत बैठका आयोजित करून IEP ध्येयांवर चर्चा करावी आणि विद्यार्थ्याने घरी पूर्ण करावयाची ध्येये (Home Goals) तसेच सदर ध्येये पूर्ण करण्याची संपूर्ण प्रक्रीया (Task Analysis) याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना अवगत करावे.
e) सदर वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम (IEP) प्रक्रिया वर्तमान विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या आत आणि नवीन विद्यार्थ्यासाठी प्रवेश घेतल्यापासून शक्यतोवर एका महिन्यात व कमाल दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.
4) वैयक्तिक थेरपी कार्यक्रम (ITP-Individualised Therapy Program) तयार करणे :
वैयक्तिक थेरपी कार्यक्रमाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात यावी.
a) बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यास संवाद (Communication), दैनंदिन जीवनातील कौशल्ये (ADL), शरीराच्या लहान व मोठ्या हालचाली (Mobility), सामाजिक वर्तन (Social Behaviour) या क्षेत्रांमध्ये थेरपीची आवश्यकता निश्चित करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे मुल्यांकन करण्यात यावे.
b) त्यानंतर थेरपिस्ट यांनी संबंधित विद्यार्थ्यांसाठी २ ते ३ वैयक्तिक थेरपी कार्यक्रमाची (ITP) उद्दीष्टे तयार करावीत. या कार्यक्रमाची (ITP) उद्दीष्टे वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमातील उद्दीष्टांशी (Therapy Goals) सुसंगत असावीत. ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहितीसुद्धा वैयक्तिक थेरपी कार्यक्रमामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.
c) वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम तसेच वैयक्तिक थेरपी कार्यक्रमांची (ITP) उद्दीष्टांची पुर्तता पालक, थेरपिस्ट व शिक्षक यांनी एकमेकांशी समन्वय साधून करावी, यासाठी शाळांनी आवश्यकतेप्रमाणे स्पीच लँग्वेज थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओ थेरपी इ. चा थेरपीचा कार्यक्रम आखून वैयक्तिक थेरपी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी.
d) वैयक्तिक थेरपी कार्यक्रमांच्या (ITP) उद्दीष्टांच्या प्रगतीचे मुल्यांकन थेरपिस्ट यांनी पहिल्या / मध्य सत्रांच्या मुल्यांकनाच्या वेळी (दिवाळी सुट्ट्यांपूर्वी किंवा IEP तयार झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत) आणि दुसऱ्या / वर्ष अखेरच्या मुल्यांकनाच्या वेळी (मार्च / एप्रिल) मध्ये करावे.
5) बहुसंवेदी अध्यापन पद्धतीचा अवलंब आणि अंमलबजावणी (Adoption and implementation of multisensory pedagogy):
a) जेथे शक्य असेल तेथे, विद्यार्थ्यांचे वय आणि क्षमतेनुसार गट केले जातील.
b) शिक्षकांनी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेमध्ये पूर्ण करावयाच्या ध्येयांशी (School Goals) सुसंगत असे साप्ताहिक वेळापत्रक तयार करावे आणि त्याचे पालन करावे.
c) शिक्षक पुस्तिकेनुसार (Teacher Manual) बहुसंवेदी (VAKT - Visual, Auditory, Kinesthetic and Tactile) (दृश्य, श्राव्य, क्रियात्मक / हालचाल / गतिज आणि स्पर्शिक) पद्धती आणि ITA (Interest-Teach-Apply) (आवड-शिकवा-लागू करा) दृष्टिकोन वापरून अध्यापन केले जाईल.
d) शिकविण्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी शिक्षकांनी योग्य अध्यापन-अध्ययन साहित्याचा (Teaching Learning Material) चा वापर करावा.
e) सराव आणि शिकण्यासाठी विद्यार्थ्यांसाठीची कार्यपुस्तके (Student Workbook) वापरत असल्याचे शिक्षकांनी सुनिश्चित करावे.
f) अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती योग्यरित्या राबवल्या जात आहेत, याची खात्री करण्यासाठी मुख्याध्यापक महिन्यातून किमान एकदा तपासणी करून सुधारणा करतील.
6) मुल्यांकन आणि पुनर्विलोकन :
a) प्रथम सत्र / मध्यसत्रामधील (Mid Term) विद्यार्थ्याचे मुल्यांकन दिवाळीच्या सुट्ट्यांच्या आधी (किंवा IEP तयार केल्यापासून तीन महिन्यांच्या आत) केले जाईल. शिक्षकांनी पोर्टलवर सर्व क्षेत्रांमधील (घर / शाळांसाठी निश्चित करण्यात आलेली) IEP ध्येयांचे मुल्यांकन करावे. हे मुल्यांकन विद्यार्थ्यांचे निरीक्षण (Observation), शैक्षणिक ध्येयांसाठीच्या चाचण्या (टेस्ट्स), तसेच ADL (Activity of Daily Living) आणि जीवन-कौशल्य ध्येये (Life Skill Goals) या मुद्यांबाबत पालक / पालकांचे प्रतिनिधी थेरपिस्ट यांचेसोबत सल्लामसलत करून करण्यात येईल.
b) मुख्याध्यापक या मूल्यांकनांची तपासणी करून शिक्षकांना अभिप्राय देतील व पोर्टलद्वारे मुल्यांकनाला मान्यता देतील.
c) प्रथम सत्र मूल्यांकनाअंती विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत अवगत करण्यासाठी तसेच प्रगती पुस्तक देण्यासाठी, शाळा पालक-शिक्षक बैठकीचे आयोजन करतील.
d) शिक्षक हे मुख्याध्यापक आणि पालक / पालकांचे प्रतिनिधी / थेरपिस्ट यांचेशी सल्लामसलत करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतील, आणि त्यानुसार पुढील सत्रासाठी अध्यापन धोरणे निश्चित करतील.
e) शिक्षकांद्वारे द्वितीय सत्र / अंतिम सत्र मुल्यांकन हे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी (मार्च/एप्रिल) मध्ये वरील a) आणि b) येथे नमूद प्रक्रियेनुसार केले जाईल. मुख्याध्यापक पोर्टलवर अहवाल मंजूर करतील, आणि त्या अहवालासंदर्भात पालक-शिक्षक बैठकीमध्ये पालक /पालकांचे प्रतिनिधी यांना अवगत केले जाईल.
7) सक्षमीकरण, पर्यवेक्षण आणि आढावा :
A. जिल्हास्तरावरील अभ्यासक्रम अंमलबजावणीची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद त्यांच्या जिल्ह्यात तसेच जिल्हाधिकारी (मुंबई शहर / मुंबई उपनगर) दिशा अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असतील. त्यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील.
a. बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांमध्ये दिशा अभ्यासक्रम राबविण्याची जबाबदारी त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद /जिल्हाधिकारी (मुंबई शहर / मुंबई उपनगर) यांची राहील.
b. विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हास्तरावरील अधिकारी / सहायक / दिशा समन्वयक / शाळा प्रमुख आणि व्यवस्थापन यांच्यासोबत मासिक आढावा घेतील. तसेच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करतील व दिव्यांग कल्याण आयुक्तांना अहवाल देतील.
c. बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांची वार्षिक तपासणी करताना जिल्हा स्तरावरील अधिकारी, इतर बाबीसोबत संबंधित उपक्रमाने अभ्यासक्रमांतर्गत केलेल्या प्रगतीबाबतसुद्धा तपासणी करतील व त्याविषयीचे अभिप्राय त्यांच्या तपासणी अहवालामध्ये नमूद करतील.
d. दिशा अभियानाच्या समन्वयकांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना द्यावयाच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्याची कार्यवाही विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हा स्तरावरील अधिकारी यांच्या समन्वयाने करावी.
B. आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्या जबाबदाऱ्याः
a) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या सर्व विशेष शाळांनी या अभ्यासक्रमाची पूर्णपणे अंमलबजावणी केली आहे, याबाबत खातरजमा करून आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे हे मुख्य कार्यकारी अधिकारी / जिल्हाधिकारी (मुंबई शहर / मुंबई उपनगर) यांचा नियमित आढावा घेतील.
b) या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी /जिल्हाधिकारी (मुंबई शहर / मुंबई उपनगर) हे दिशा समन्वयक यांच्यासोबत त्रैमासिक बैठका आयोजित करतील व त्याबाबतचा अहवाल आयुक्त, दिव्यांग कल्याण यांचेकडे पाठवतील. तसेच आयुक्त, दिव्यांग कल्याण हे मुख्य कार्यकारी अधिकारी / विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हास्तरीय अधिकारी हे राज्य दिशा समन्वयक यांच्यासोबत सहामाही बैठका आयोजित करतील व त्याबाबतचा अहवाल दिव्यांग कल्याण विभागाकडे पाठवतील.
8) "दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा" प्रक्रीया आणि प्रमाणन (Certification):
8.1 प्रक्रीया : राज्यातील सर्व बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांपैकी ज्या शाळांनी पोर्टलवर विहित मुदतीत वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम (IEP) बेसलाईन मुल्यांकन पूर्ण केले आहे. अशा शाळांना दिशा समन्वयक हे तीन महिन्यातून एकदा भेट देतील. त्यापैकी दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा म्हणून घोषित करण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या मानकांची पुर्तता करणाऱ्या विशेष शाळा "दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा" म्हणून समजण्यास पात्र ठरतील.
i. पोर्टलवरील एकूण विद्यार्थ्यांपैकी किमान ८०% विद्यार्थ्यांचे बेसलाईन IEP TASK (वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम) विहित मुदतीत पूर्ण करणे.
ii. पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांची IEP साठीची मूल्यांकन तपासणी सूची (Assessment Checklist for IEP) Baseline Assessment तसेच प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र इ. बाबी विहित मुदतीत पूर्ण करणेकरणे.
iii. शाळेतील सर्व वर्गामध्ये विषयांचे वेळापत्रक प्रदर्शित केलेले असणे आणि त्याचे काटेकोरपणे अनुपालन करणे.
iv. वर्गामध्ये दृश्य वेळापत्रक (Visual Schedule), पाठ नियोजन (Lesson Plan) इ. असणे आणि त्याचा काटेकोरपणे वापर करणे.
8.2 प्रमाणन (Certification):
1. दिशा समन्वयक परिच्छेद ७.१ मध्ये विहित केलेल्या मानकांची पुर्तता करणाऱ्या विशेष शाळांचा अहवाल एप्रिल / मे महिन्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठवतील.
॥. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदर अहवालाची तपासणी करून "दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा" म्हणून घोषित करण्यासाठी त्यांच्या शिफारशींसह त्यांचा अहवाल आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांचेकडे पाठवतील.
III. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालाची तपासणी केल्यानंतर त्यानुसार आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे हे "दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा" म्हणून पात्र ठरलेल्या विशेष शाळांना त्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र वितरित करतील.
9) दिशा अभ्यासक्रमाची पुस्तके व कार्यपुस्तिका (Workbook) उपलब्ध करणे: आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांनी राज्यातील बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांना दिशा अभ्यासक्रम, विद्यार्थी कार्यपुस्तिका तसेच शिक्षक पुस्तिका यांच्या मुद्रीत प्रती उपलब्ध करून देण्याची कार्यवाही आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून करावी.
ज्या बौद्धीक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांकडून उक्त अभ्यासक्रम राबविण्यात येत नाही तसेच आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर / मुंबई उपनगर यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येत नाही, असे निदर्शनास आले तर संबंधित विशेष शाळांचे अनुदान थांबविणे, संस्थांचे नोंदणीप्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५१२१९१६०१०७३०३५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



0 Comments