शैक्षणिक संस्थांमध्ये मुक्तपणे वावरणाऱ्या भटक्या श्वानांना आवर घालण्याची जबाबदारी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांवर टाकली आहे. शिक्षण आयुक्तांनी काढलेल्या पत्रकाच्या आधारे आता प्रत्येक शाळेत नोडल अधिकारी म्हणून एका शिक्षकाची नेमणूक होणार असून त्याला शाळा परिसर स्वच्छतेसोबतच भटक्या श्वानांचा वावर कमी करण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे.
आधीच शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांवर आता आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता प्रत्येक शाळेत नोडल अधिकारी म्हणून एका शिक्षकाची नेमणूक होणार असून, शाळा परिसर स्वच्छतेसोबतच भटक्या कुत्र्यांचा वावर कमी करण्याची जबाबदारीही त्यांना शिरावर घ्यावी लागणार आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांनी काढलेल्या पत्रकाचा सर्वच शिक्षक संस्थांनी निषेध केला आहे.
देशभरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांची आणि त्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रत्येक शैक्षणिक संस्थेने परिसर स्वच्छता व सुरक्षा यांच्यासाठी 'नोडल अधिकारी' नेमण्याचे परिपत्रक काढले होते. याच धर्तीवर आता शालेय शिक्षण विभागानेही अशाच आशयाचे परिपत्रक काढले आहे. या पत्रात, 'प्रत्येक शाळेने परिसर स्वच्छता व सुरक्षा यांच्यासाठी शाळेतीलच एका शिक्षकाची नियुक्ती 'नोडल अधिकारी' म्हणून करायची आहे. या शिक्षकाची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावून स्थानिक महापालिका किंवा संबंधित यंत्रणेला कळवणेही आवश्यक आहे. भटके कुत्रे शाळेच्या आवारात शिरू नयेत किंवा निवाऱ्याला असू नयेत, याची जबाबदारी या शिक्षकाची असेल,' असे म्हटले आहे.



0 Comments