Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्याबाबत परिपत्रक 29 जुलै 2026 | शिक्षक संवर्गातून पदोन्नती - विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत परिपत्रक 14 मे 2026, 10 जुलै 2026, 29 जुलै 2026

शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्याबाबत परिपत्रक 29 जुलै 2026 | शिक्षक संवर्गातून पदोन्नती - विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत परिपत्रक 14 मे 2026, 10 जुलै 2026


शिक्षक संवर्गातून पदोन्नती 3 सप्टेंबर 2001 पूर्वीच्या शिक्षकांचे सेवाज्येष्ठता यादीत नाव नसेल तर करावयाचा अर्ज नमुना पहा. Download Letter format



शिक्षक संवर्गातून पदोन्नती प्रक्रियेला स्थगिती 

शालेय शिक्षण विभागाच्या दि.२९/७/२०२६ रोजीच्या शासन निर्णयाला मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र. ५९४३/२०२६ अन्वये आव्हान देण्यात आले असून मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने २९-७-२०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील खंड ४(अ) च्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आलेली आहे.

त्यामुळे सन २०२६ च्या माहे ऑगस्ट मधील (शासन निर्णयातील ४ अ नुसार) चालू वर्षी करावयाच्या पदोन्न्तीबाबतची कार्यवाही शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.

शिक्षक संवर्गातून पदोन्नती प्रक्रियेला स्थगिती देणेबाबत परिपत्रक 




शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्याबाबत परिपत्रक 29 जुलै 2026



जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक इत्यादीं पदांवर त्या-त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार पदोन्नती देण्यात येते. सदर पदोन्नती ज्येष्ठता-नि-पात्रता या आधारावर दिली जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाने अंजूमन ईशात-ए-तालिम ट्रस्ट विरुध्द महाराष्ट्र शासन या प्रकरणात दि.०१.०९.२०२५ रोजी पारीत केलेल्या न्यायनिर्णयानुसार टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण होणे ही पदोन्नतीसाठीची आवश्यक पात्रता ठरविली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 01 ऑगस्ट 2019 शासन निर्णयान्वये प्रत्येक वर्षाचा दि. ०१ सप्टेंबर हा पदोन्नती प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक ठरविण्यात आला आहे. या आधारावर 14 मे 2026 च्या शासन निर्णयान्वये पदोन्नती संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. दि. १४.०५.२०२६ रोजीच्या पत्रास मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका क्र. ४५७४/२०२६ अन्वये आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणांचा न्यायनिर्णय दि. १०.०७.२०२६ रोजी पारीत झाला असून त्याद्वारे दि. १४.०५.२०२६ रोजीचे पत्र रद्दबातल ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात पदोन्नती प्रक्रियेत एकसुत्रता असावी, जेणेकरुन विद्यार्थी हित व शिक्षकांना दिलासा मिळेल या दृष्टीने कार्यवाही करण्यासंदर्भात शासनास निर्देश देण्यात आले आहेत. सदर निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.


शिक्षक संवर्गातून पदोन्नती बाबत शासन निर्णय 

जे शिक्षक TET/CTET उत्तीर्ण असणे या अर्हतेबरोबरच सेवाप्रवेश नियमानुसार आवश्यक असणारा अनुभव व अन्य अर्हता धारण करीत आहेत, त्यांचा समावेश पदोन्नतीसाठीच्या विचारक्षेत्रात करण्यात यावा.

दि. १०.०७.२०२६ पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पदोन्नती आदेश निर्गमित झाले आहेत, त्या ठिकाणची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल.

पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा पदोन्नत्यांना संरक्षण प्रदान करण्यात आले असले तरी जे शिक्षक अन्यथा पदोन्नतीसाठी पात्र ठरले असते, मात्र दि. १४.०५.२०२६ रोजीच्या शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या पत्रामुळे अपात्र ठरले, असे शिक्षक यानंतर पदोन्नत झाल्यास पदोन्नतीच्या संवर्गातील त्यांची सेवाज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात यावी.

पदोन्नती प्रक्रियेत संपूर्ण राज्यात एकसुत्रता असावी यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ) या चालू वर्षी (सन 2026-27) करावयाच्या पदोन्नतीबाबत -


I. माहे ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी.
II. पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET/CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी.
III. पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी.
IV. संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत दि.३१.०८.२०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल.

ब) पुढील वर्षी पासून (सन 2027-28) करावयाच्या पदोन्नतीबाबत -

।. प्रत्येक वर्षाच्या दि. ०१ जानेवारी रोजी आवश्यकता असल्यास तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात यावी. यासंदर्भात आलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम सेवाज्येष्ठता यादी दि. ३१ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात यावी.

॥. तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याची आवश्यकता नसल्यास दि. ०१ जानेवारी रोजी अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात यावी.

॥॥. दि. १५ फेब्रुवारी ते दि. २२ फेब्रुवारी या कालावधीत पदोन्नती समितीची बैठक आयोजित करण्यात यावी. बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET/CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी.

IV. पात्र उमेदवारांची शिफारस करण्याची कार्यवाही पुढील एक आठवड्यात करण्यात यावी.

V. दि. ३१ मार्च पर्यंत पदोन्नतीचे आदेश निर्गमित करुन पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

VI. दि. ३१ मार्च पर्यंत पदोन्नती आदेश निर्गमित करण्यात आले तरी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये. असे शिक्षक दि. ०२ मे रोजी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होतील या दृष्टीने त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे.


उपरोक्त प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करणे सर्व जिल्हा परिषदांसाठी अनिवार्य असेल. या कार्यपध्दतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असेल. अशा प्रकारे कार्यवाही करताना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

सदर आदेश संदर्भ क्र. ३ येथील न्यायनिर्णयान्वये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच ग्राम विकास विभागाचे अनौपचारीक संदर्भ क्र. ०१/२०२६/आस्था-१४, दि.२८.०७.२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबध्द कार्यपध्दती विहित करण्याबाबत शासन परिपत्रक 29 जुलै 2026 - Click Here



विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत परिपत्रक 10 जुलै 2026


संचालनालयाचे पत्र दिनांक १४/०५/२०२६ नुसार विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे बाबत निर्देश या कार्यालयामार्फत देण्यात आले होते.

तथापि मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक ४५७४/२०२६ मधील निर्णय दि.१०/०७/२०२६ नुसार मा. न्यायालयाने संचालनालयाचे पत्र प्राशिसं/ड-३०१/शिक्षक संवर्ग पदोन्नती/२०२६ दि.१४/०५/२०२६ रद्द केले आहे. तरी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत पुढील शासन निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.


विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत परिपत्रक 10 जुलै 2026 - Click Here


शिक्षक संवर्गातून पदोन्नती - विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत परिपत्रक 14 मे 2026



मा. सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन-इशात-ए-तालीम या प्रकरणी शिक्षकांना पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. याबाबत राज्यातील शिक्षकांकडून मा. उच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये विवध न्यायनिवाडयामध्ये देखील शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. (मा. उच्च न्यायालयातील याचिकेतील आदेशाच्या प्रती सोबत जोडल्या आहेत.)


यास्तव शिक्षकाची विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नती करताना सेवाज्येष्टतेनुसार शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांचा पदोन्नतीसाठी विचारात घेण्यात यावे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही सुरू आहे. पदोन्नती करताना सेवा जेष्ठता-नि-गुणवत्ता आधारे पदोन्नती करण्यात येते परंतू शिक्षकांना पुढील पदावर पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, त्यामुळे पदोन्नतीसाठी जेष्ठतेसह ही पात्रता देखील तपासणे आवश्यक आहे.

सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक ०१/०९/२०१९ अन्वये पदोन्नतीसाठीच्या तरतूदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यातील ५.१.३ मध्ये निम्न संवर्गातील किमान सेवेची गणना करण्याची तरतूद देण्यात आलेली आहे, त्यानुसार प्रतिवर्षी निवड सूची वर्षाच्या (सध्या २०२५-२६ निवडसूची वर्ष पहिल्या तारखेस म्हणजेच दिनांक १ सप्टेंबर या तारखेस (म्हणजेच दिनांक ०१/०९/२०२५ रोजीची) विचार क्षेत्रातील कर्मचारी यांची निम्न पदावरील किमान सेवा तसेच पदोन्नतीसाठीची इतर आवश्यक अर्हता पूर्ण झाली पाहिजे अशी तरतूद आहे.

तसेच दिनांक ०१/०९/२०२५ रोजी अर्हता धारक कर्मचारी विचारात घेतल्यानंतर पदोन्नतीची पदे रिक्त रहात असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास निम्न पदावरील किमान सेवेची अट पूर्ण करणाऱ्या व पदोन्नतीसाठीची इतर आवश्यक अर्हता पूर्ण करणाऱ्या कर्मचारी यांचा विचार करण्याबाबत तरतूद आहे.

उक्त शासन निर्णयातील ५.२ मध्ये सेवाज्येष्ठता सूचीबाबत तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ज्या पदावर पदोन्नती द्यावयाची आहे त्या पदाच्या निम्नस्तरीय पदाची निवडसूची वर्षाच्या (सन २०२५-२६ निवडसूचीसाठी) लगतच्या वर्षाची (म्हणजेच दिनांक ०१/०१/२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची तयार करावी अशा तरतूद आहेत.

यावरून हे स्पष्ट होते की, सध्या निवड सूची वर्ष २०२५-२६ सुरु असून त्यासाठी ०१/०९/२०२५ रोजीची पात्रता विचारात घ्यावी लागेल व त्यासाठी दिनांक ०१/०१/२०२५ रोजीच्या ज्येष्ठता सूचीच्या आधारे पदोन्नतीची कार्यवाही करावी लागणार आहे. तसेच पदोन्नतीसाठी पदे शिल्लक रहात असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास अर्हता धारण करणारे कर्मचारी यांना विचारात घेवून रिक्त राहणाऱ्या पदांवर पदोन्नतीची कार्यवाही करता येईल अथवा पुढील वर्षाच्या निवड सुचीनुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल.

वरील प्रमाणे शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही करताना उतरत्या क्रमाने शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक याप्रमाणे केल्यास त्या त्या गटातील पदे रिक्त होवून जास्तीत जास्त पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होवून पदोन्नतीची रिक्त पदे भरली जातील व पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. सदर पदोन्नतीची कार्यवाही वेळेत पूर्ण झाल्यास खालची शिक्षकांची पदे रिक्त होतील त्यामुळे रिक्त होणारी पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या सारखी अध्यापकीय पदे पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीची कार्यवाही पूर्ण करता येईल.

काही जिल्हा परिषदामधील पदोन्नतीबाबत मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यामध्ये वेळीच शपथपत्र दाखल करून याचिका निकाली काढून त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. याबाबत शासकिय विधिज्ञ/जिल्हा परिषदांचे वकील यांचेशी संपर्क साधून तात्काळ कार्यवाही करावी.

वरील बाबी विचारात घेवून शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही मा. न्यायालयाचे आदेश व प्रचलित तरतूदी विचारात घेवून पदोन्नतीची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संचालनालयास अहवाल सादर करण्यात यावा.


शिक्षक संवर्गातून पदोन्नती - विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत परिपत्रक 14 मे 2026

Post a Comment

0 Comments

close