Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक निवडणुकीसाठी १२ हजार ८८२ मतदार...


म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र राज्य विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात १२ हजार ८८२ मतदारांनी नोंदणी केली असून, यामध्ये ९ हजार ७२० पुरूष व ३ हजार १६२ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जून महिन्यात ही निवडणूक होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान केंद्र राहणार आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी नव्याने तयार करण्यासाठी सखोल पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळासोबतच संबंधित तहसील कार्यालयात ही यादी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पात्र शिक्षक मतदारांनी मतदार नावनोंदणी फॉर्म सादर केले होते, त्या सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत सामाविष्ट झाले आहे किंवा नाही, याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.
मतदार यादीतील तपशिलात काही चुका असल्यास त्या दुरुस्ती करणेबाबत लेखी स्वरुपात संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करावा व ज्यांनी अद्याप मतदार यादीत नावनोंदणी केलेली नसेल, त्यांनी आपला मतदार नावनोंदणी फॉर्म आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तहसील कार्यालयात जमा करावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक शाखेने केले आहे.
..............
संगमनेर तालुक्यात सर्वात जास्त मतदार
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत जिल्ह्यात सर्वात जास्त मतदार संगमनेर तालुक्यात आहेत. या तालुक्यातून १ हजार ६९५ मतदारांनी नावनोंदणी केली आहे. तर अकोले तालुक्यातून १ हजार १०, कोपरगाव ८५८, श्रीरामपूर ८८२, राहाता १ हजार ४८, राहुरी ५१६, नेवासा १ हजार ९५, शेवगाव ७१२, पाथर्डी ७३७, नगर ग्रामीण ६०४, नगर शहर १ हजार ३४६, पारनेर ७३९, श्रीगोंदा ७४२, कर्जत ५९५ व जामखेड तालुक्यातून ३०३ जणांनी नावनोंदणी केली आहे.

Post a Comment

0 Comments

close