राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. SQAAF मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शाळांना इतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी भेटी देऊन शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व शाळा विकास आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांना इतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी भेटी देणे बाबत परिपत्रक जाहीर
सन २०२४-२०२५ मध्ये राज्यातील १,०२,६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले. सन २०२४-२०२५ मध्ये स्वयं मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांच्यापैकी सन २०२५-२०२६ मध्ये १०७१२ शाळांची बाह्य मूल्यांकन करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी १०६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आले. तसेच सन २०२५-२६ मध्ये स्वयं मूल्यांकन दिनांक १५ मार्च २०२६ ते दि.१८ मे २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे.
आपल्या जिल्ह्यातील तालुकानिहाय SQAAF मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांची माहिती maa.ac.in या संकेतस्थळावरील SQAAF विभागामध्ये देण्यात आलेल्या SQAAF -DASHBOARD मधून घेण्यात यावी व SQAAF मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शाळांना इतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी भेटी देऊन शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व शाळा विकास आराखडा तयार करण्यासाठी आपल्या स्तरावरून मार्गदर्शन करण्यात यावे.
Sqaaf मध्ये गुणवत्तेत अव्वल शाळांची यादी डाउनलोड करा. - Click Here
शाळा भेटी देणाऱ्या शाळांना खालील सुचना द्याव्यात.
१. तालुकानिहाय सर्वाधिक गुण मिळविलेल्या शाळांनाच भेट देण्यात याव्यात.
२. भेट देण्यासाठी निवडण्यात आलेली शाळा ही आपल्याच केंद्रातील / जवळच्या केंद्रातील असावी.
३. शाळा भेटीचा दिनांक निश्चित करून गटशिक्षणाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.
गटशिक्षणाधिकारी यांनी शाळा भेटीबाबत मान्यता दिल्यानंतरच शाळा भेट करता येईल. पूर्वपरवानगी शिवाय मुख्याध्यापकांना शाळा भेट करता येणार नाही.
४. भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या शाळेला किमान ३ दिवस आधी पूर्व सूचना देण्यात यावी.
५. भेटीसाठी निवडण्यात आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
६. भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या शाळेला कोणताही आर्थिक खर्च येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. स्वागत समारंभाचे कार्यक्रम टाळावेत. शाळा भेट ही शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी असावी.
७. भेट देण्यासाठी शासकीय वाहनाचाच (बस, रेल्वे) वापर करावा. खाजगी / अनधिकृत वाहनातून प्रवास करू नये.
८. शाळा भेटीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता अनूदेय असणार नाही.
९. भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या शाळेला मुख्याध्यापक व शाळेतील SQAAF चे कामकाज पाहणारे एक शिक्षक यांनीच भेट देण्यात यावी. सदरील भेट ही नियोजित असावी व वर्षातून एक दिवसच देण्यात यावी. द्विशिक्षकी शाळेतून फक्त मुख्याध्यापक यांनीच शाळा भेटीचे नियोजन करावे.
१०. शाळा भेट देणाऱ्या मुख्याध्यापकांनी आपली शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसे नियोजन करूनच शाळा भेटीचा दिनांक निश्चित करावा.
११. शाळा भेट देणाऱ्या मुख्याध्यापकांनी SQAAF संबंधी क्षेत्र, उपक्षेत्र, मानक निहाय शाळेच्या उल्लेखनीय बाबी, सुधारात्मक बाबी, लिंक मध्ये भरलेली माहिती, पुरावे, SQAAF संबंधी शाळेने केलेले नियोजन या बाबत सकारात्मक चर्चा करावी.
१२. शाळा भेट देणाऱ्या मुख्याध्यापकांनी शाळा भेटीवरून आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये शाळा भेटीबाबत सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत चर्चा करावी. झालेली चर्चा इतिवृत्तात नमूद करावी व सर्वांच्या सहकार्याने शाळा विकास आराखडा तयार करावा. सदरील शाळा विकास आराखड्यास मान्यता घेण्यात यावी व शाळेचा स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
१३. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) - स्वयं-मूल्यांकनात व बाह्य मूल्यांकनात चांगली कामगिरी करणाऱ्या शाळा या इतर शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रेरणा देतील आणि मार्गदर्शन करतील.
वरीलप्रमाणे शाळा भेटीबाबत आपल्या जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात व जिल्हयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.



0 Comments