Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मधुमेह व लठ्ठपणा कमी करण्यासाठी... दोनवेळा खा, अध्येमध्ये प्या


'आपले वजन कमी करून देण्यासाठी इतर कुणीही येणार नाही. स्वत:च्या वजनाची जबाबदारी स्वत: घ्यायला हवी. ठरलेल्या दोन वेळेला पोटभर जेवणे आणि दिवसभरात भूक लागली तर विविध साधी पेये पिणे, हा मंत्र आत्मसात करायला हवा. असे केल्यास लठ्ठपणा कमी करणे आणि मधुमेहास दूर ठेवणे, या दोन्ही बाबी साध्य करणे शक्य आहे', असा सल्ला आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी रविवारी येथे दिला.
'विनासायास वजनात घट आणि मधुमेहास प्रतिबंध' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. आयटी पार्कमधील पर्सिस्टंट सभागृहात सप्तक आणि डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशन यांच्यावतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. जिचकार यांनी वजन कमी करण्यासाठी मांडलेल्या विचारावर आधारित या व्याख्यानात डॉ. दीक्षित यांनी वजन आणि मधुमेह या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. लठ्ठपणा आणि मधुमेह यांचे प्रमाण वाढल्यास रक्तदाब, हृदयविकार, मेंदूतील रक्तस्राव, श्वसनाचे त्रास यांच्यापासून ते काही कर्करोगांपर्यंत विविध आजार होऊ शकतात. लठ्ठपणाच्या मागे आनुवंशिक कारणे कमी आहेत. शारीरिक श्रमांचा अभाव, खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी, औषधे आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती अशा विविध कारणांमुळे लठ्ठपणात वाढ होऊ शकते, असे डॉ. दीक्षित म्हणाले.
'एखादा पदार्थ खाल्ला की इन्शुलिन स्रवते आणि रक्तातील इन्शुलिन वाढले की लठ्ठपणा वाढतो. आहाराचे प्रमाण कितीही जास्त असले तरी इन्शुलिनच्या वाढण्याचे प्रमाण सारखेच राहते. इन्शुलिन एकदा तयार झाले की पुढील ५५ मिनिटे पुन्हा तयार होत नाही. पेशींना ग्लुकोज पुरविल्यानंतरही ते उरल्यास इन्शुलिन त्याचे रूपांतर चरबीत करते. त्यामुळे इन्शुलिन कमी केले तर चरबीही कमी होते. त्यासाठी कमी खाणे हा उपाय नसून, कमीवेळा खाणे आवश्यक आहे, ' असेही त्यांनी सांगितले.

उपाय दीक्षितांचे

- कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा.
- त्या दोन वेळांतच जेवण करा व या वेळा पाळा.
-जेवण जास्तीत जास्त ५५ मिनिटांच्या कालावधीत संपवा.
- दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका.
- जेवताना शक्यतो कमी गोड खा, किंवा टाळा.
- जेवणातील प्रथिने वाढवा.
- दोन जेवणांच्या मध्ये पाणी, पातळ ताक, ग्रीन किंवा ब्लॅक टी, बिनसाखरेचा पातळ चहा, नारळपाणी प्या.

Post a Comment

0 Comments

close