Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुले खोटे बोलतात तेव्हा... - दिपक पाटील

 #मुले_खोटे_बोलतात_तेव्हा.. °°••°°

#आपली मुले आपल्याशी किंवा इतर कुणाशी खोटे बोलत असतील तेव्हा आपल्याला त्यांच्या अशा वागण्याचा राग येतो. यामागे मुलांचा आपल्या आईवडिलांची किंवा इतरांची फसवणूक करण्याचा जाणीवपूवर्क हेतू असतोच असे नाही. पण आपल्या पालकांनी आपल्याला रागावू नये, किंवा इतर कोणतीही शिक्षा करु नये असा हेतू असल्याने मुले कधी कधी खोटे बोलतात.

#काही मुलं खोटं बोलतात, काही मुलं अजिबात खोटं बोलत नाहीत तर काही मुलं कधी-कधी थोडयाफार प्रमाणात खोटं बोलत असतात. खोटं बोलणारी मुले ही तेव्हा खोटं बोलतात जेव्हा खरं बोलल्यामुळे आपल्याला रागावलं जाईल किंवा शिक्षा होईल अशी त्यांच्या मनात भिती असते. पण असं करता-करता त्यांना खोटं बोलण्याची सवय कधी लागून जाते ते कळत सुध्दा नाही.
#खोटं बोलणं ही सवय कधीही चुकीचीच आहे. कारण एक खोटं बोललं की ते खोटं खरं आहे असं पटवण्यासाठी दुसरी कितीतरी वाक्य खोटीच सांगावी लागतात. मग असं खोटं बोलणारा व्यक्ती खोटया गोष्टींच्या त्या चक्रव्यूहात अडकत जात असतो. शेवटी कितीही केलं तरी खोटं हे कधीही सर्वांसमोर येतच असतं. म्हणून कधीही खोटे बोलू नये असे आपण लहानग्यांना शिकवत असतो.
#आपण कधी हा विचार केला आहे का, की आपणही लहान असतांना कधी-कधी खोटे बोललो होतो. जर आपण लहानपणी कधीच खोटे बोललो नाहीत तर खुप छान पण आपणही आपल्या लहानपणी खोटे बोललो असाल तर ते आज आपण प्रामाणिकपणे मान्य करायला हवे. मग आपण आता हा विचार करायला हवा की आपण आपल्या लहानपणी आपल्या पालकांशी किंवा इतरांशी खोटे का बोलायचो? आपले आई-वडील किंवा आपले पालक आपण केलेल्या एखादया चुकेसाठी आपल्याला रागावतील किंवा मारतील या भितीपोटी, आपणही कधीतरी आपल्या पालकांशी खोटे बोललो असणार. होय ना!
#खरं तर “#खोटे_कधी_बोलू_नये”, हा सुविचार आपण आपल्या लहानग्या मुलांच्या मनावर त्यांच्या लहानपणापासूनच बिंबवण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण आपल्याला आपल्या मुलांना उत्तम संस्कार देऊन आदर्शवत घडवायचे असते. त्यासाठी आपण त्यांना वेळोवेळी उपदेश करतो किंवा विविध बोधकथाही सांगतो. खरंतर #मुले_ही_जन्मजात_खोटं_बोलत_नसतात_ते #सर्वकाही_आपल्या_अवती_भवतीच_शिकत_असतात.
#आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, जी मुलं अजिबात खोटं बोलत नाहीत, त्यांचे आई-वडील किंवा त्यांचे पालक हे आजपर्यंत अतिशय #सुजाण_पालकत्वाची भुमिका पार पाडत आले आहेत असे म्हणावे लागेल. मुलांचे काही चुकलेच तर ते आपल्या मुलांवर एकदम चिडत नाहीत, रागवत नाहीत किंवा त्यांना मारहाणही करत नाहीत. मुलांकडून झालेल्या चुकीच्या गोष्टींविषयी ते त्यांच्याशी नीटपणे संवाद साधून, त्यांनी केलेली चूक त्यांना समजावण्याची भूमिका स्विकारतात.
#याउलट मुलं चुकली की काही पालक हे अतिशय आक्रमकपणे मुलांच्या वागण्यावर रागीट प्रतिक्रीया देत असतात. म्हणजे जसं अतिशय वाईट पध्दतीने बोलणे, रागावतांना अपशब्दांचा वापर करणे, प्रसंगी मुलांना मारहाण करणे, मुलांना खोलीत कोंडून ठेवणे, दोरीने हात-पाय बांधून ठेवणे अशा शिक्षा मुलांच्या मनावर दुरगामी आणि विपरीत परिणाम करणा-या ठरु शकतात. म्हणून पालकांनी अशा प्रसंगी शांततेने मुलांशी त्यांच्या कडून होणा-या चुकांविषयी बोललं पाहीजे आणि त्यांना समजावलं पाहीजे. अशा प्रसंगी मुलांनीही आपल्या पालकांची मनापासून माफी मागायला हवी आणि घडलेली चूक पुन्हा होणार नाही अशी ग्वाही दयायला हवी. पण अनेक प्रसंगी भितीपोटी मुले आपल्या पालकांसमोर आपली बाजू नीटपणे मांडू शकत नाहीत आणि घाबरून जात पुढच्या वेळेला आपण जे चुकलोय ते आपल्या पालकांना समजणार नाही यासाठी झालेली चूक लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे खोटे बोलत असतात. म्हणजे मुलांचे खोटे बोलण्याची सुरुवात अशा पध्दतीने होत असते.
#ब-याच वेळा खोटं बोलण्याची सवय मुलांना घरातूनच लागत असते. जसे घरी पप्पांना कुणी तरी भेटायला आले, मग पप्पा आपल्या मुलांसमोरच घरी असतांनाही सांगतात, की "त्या आलेल्या व्यक्तीला मी घरी नाहीये म्हणून सांग," मग काही कामानिमित्ताने घरी आलेला तो व्यक्ती निराश होऊन माघारी जातो. पप्पांना फोन आल्यानंतर पप्पा इकडून बोलतात की, "अरे मी तर आता बाहेरगावी आलोय, मी सध्या घरी नाहीये, तु मला नंतर फोन कर आणि नंतर येऊन भेट". पण त्यावेळी खरंतर ते घरीच असतात. मग आपल्या वडीलांच्या खोटं बोलण्याचं घरातली लहान लहान मुलं निरीक्षण करतात आणि मग खोटं बोलणं अजिबात वाईट नसतं असं समजून ते सुध्दा वेळोवेळी सहजपणे खोटं बोलायला शिकतात. म्हणजे #जसे_पालक असतात #तसे_त्यांचे_प्रतिबिंब मुलांमध्ये उमटायला सुरुवात होत असते. मुले सर्वाधिक गोष्टी आपल्या आई-वडीलांकडून आणि कुटूंबातील लोकांकडून शिकत असतात. त्यांनतर ते आपल्या अवती-भवती राहणा-या लोकांकडून आणि मित्र मैत्रिणींकडून शिकत असतात. त्यानंतर टी.व्ही आणि मोबाईलच्या माध्यमातून ते काय पाहतात, त्यावर आधारीत गोष्टी सुध्दा शिकत असतात. म्हणून या सर्व गोष्टी ज्या त्यांच्या डोळयांसमोर येणार आहेत त्या आदर्शवतच येतील याची आपण खबरदारी घ्यायला हवी.
#तर मग चला एक सुजाण पालकत्वाची भुमिका आपण सर्वांनी निश्चयाने पार पाडूया आणि एक सुसंस्कृत पिढी घडवूया..
✍️
(लेख आवडला तर नक्की Share करा)
धन्यवाद!
🙏🙏
श्री.दिपक विनायक पाटील
(खर्देपाथर्डेकर)
प्रा.शिक्षक मांजरोद शिरपूर धुळे

Post a Comment

2 Comments

close