Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"गुरुजी, माझ्या मुलाला पहिल्या बेंचवर बसवा”. दिपक विनायक पाटील यांचा शैक्षणिक लेख

"गुरुजी, माझ्या मुलाला पहील्या बेंचवर बसवा”. दिपक विनायक पाटील यांचा शैक्षणिक लेख

(प्रत्येकाला हवाय पहिला बेंच, गुरुजी कुणा-कुणाला पहिल्या बेंचवर बसवणार?)

 #दिवाळीनंतर शाळा उघडल्यात, शाळेची सुरुवात विदयार्थ्यांच्या प्रत्यक्ष हजेरीने सुरु झाली आणि ज्या वेळेची वाट प्रत्येक विदयार्थी आणि शिक्षक आतुरतेने पहात होता, ती वेळ त्यांच्या जीवनात आली.

मुलं खोटं बोलतात तेव्हा.... - दिपक विनायक पाटील यांचा शैक्षणिक लेख

#आपल्या आई-वडीलांचं बोट हातात धरुन, शाळेची वाट धरणारी बालके शाळेत पोहोचली. कुठे वाजत गाजत, तर कुठे फुलांची पायघडी टाकत, विद्यार्थ्यांचं स्वागत शाळेत करण्यात आलं आणि देशभरातील शाळांना त्यांच गतवैभव पुन्हा प्राप्त झालं.  


#शाळा उघडल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रत्येक शिक्षकाला येणारी नेहमीचीच पण पहीली समस्या, पुन्हा एकदा पालकांच्या पहील्या वाक्याने शिक्षकांना अनुभवायला मिळाली.

#पालक_म्हणालेत..

“#गुरुजी, #माझ्या_मुलाला_पहिल्या_बेंचवर_बसवा.” 


गुरुजींनी शक्य होईल त्या-त्या मुलांना प्रत्येक रांगेतल्या पहील्या बेंचवर बसवण्याचा प्रयत्न केला, पण पहील्या बेंचची जागा संपल्यावर आता कुठे बसवावे, असा प्रश्न त्यांनी आपल्याच मनाशी केला. 

Read also - मुलांच्या राग चिडचिडेपणा हट्टीपणा व आक्रस्ताळीपणा यावर काय उपाय करावेत? पालक म्हणून कसे मुलांशी कसे वागावे?

#आपली मुले शाळेत पाठवणा-या प्रत्येक आई वडिलांना असेच वाटते की, माझ्या मुलाने वर्गातल्या पहील्याच बेंचवर बसावे. यासाठी शिक्षकांजवळ हट्ट ही धरला जातो आणि कधी- कधी भांडणंही केली जातात. पण बिच्चारा,  वर्गशिक्षक कुणाकुणाला पहील्या बेंचवर बसवणार?


 #पहील्या बेंचवर बसणारी मुलं हुशारच असतात किंवा हुशार होतातच असे मुळीच नाही. वर्गातल्या कोणत्याही बेंचवर बसून वर्गशिक्षकाच्या शिकवण्याकडे मनापासून लक्ष देणारी आणि अभ्यास समजून घेणारी मुलं मात्र नक्कीच हुशार होतात, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. पहील्या बेंचवर बसण्याचा हट्ट  धरणा-या पालकांना व त्यांच्या मुलांना पाहून, माझ्या लहानपणी, खरंतर माझ्याही मनात वर्गातल्या पहील्या बेंचवर बसण्याची ईच्छा निर्माण होई. पण माझे पालक माझ्यासाठी हट्ट धरुन शाळेपर्यंत आणि वर्गशिक्षकांपर्यंत कधीच नं पोहोचू शकल्याने माझी ती ईच्छा कधीच पुर्ण होऊ शकली नाही. पण तरीही मिळेल त्या बेंचवर बसून मी वर्गातल्या गुणवत्तेत मात्र, पहील्या तीन मध्येच नंबर काढला.


#दहावीतले शिक्षण घेत असतांना तर मी आणि माझा मित्र भूषण आम्ही वर्गातल्या सर्वात शेवटच्या बेंचवर बसायचो. त्यासाठी कारणही तसेच होते, नववीपर्यंत दुपारच्या शिप्टला शिक्षण चालू असतांना, दहावीच्या वर्गात सकाळच्या शिप्टला प्रवेश मिळावा म्हणून त्यावर्षी, एकाच वेळी अर्ज करुन दहावीत सकाळच्या शिप्टच्या वर्गात आम्ही प्रवेश घेतला होता. मग काय वर्ग नवा, मित्र नवे आणि सोबत वर्गशिक्षकही नवे, म्हणून बसण्यासाठी सरळ शेवटच्या बेंचवरची जागा आम्हाला मिळाली. 


#पण शेवटच्या बेंचवर बसूनही वर्गातल्या प्रत्येक  विद्यार्थ्यापेक्षा आमचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणीत असायचा. वर्गशिक्षकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी वर्गातल्या शेवटच्या बेंचवरुन आमची दोन बोटे नेहमीच वर असायची. त्यामुळे साहजिकच वर्गशिक्षकांचे विचारणे आम्हाला व्हायचे आणि प्रश्नाचं उत्तर ऐकतांना वर्गातल्या सर्व मुला-मुलींच्या नजरा वळून थेट वर्गाच्या शेवटच्या बेंचपर्यंत, म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचायच्या. हे दृश्य त्या वेळेलाही मनाला कमालीचा आनंद द्यायचे आणि ते दृश्य आजही जेव्हा आठवते तेव्हा, तेवढाच कमालीचा आनंद मला होत असतो.


#वर्गशिक्षक म्हणून भूमिका वठवितांना जेव्हा पालक माझ्याकडे येतात आणि “माझ्या मुलाला पहील्या बेंचवर बसवा, असा हट्ट धरतात, तेव्हा या आठवणी मी पालकांना व विदयार्थ्यांना आवर्जुन सांगत असतो. या आठवणी आणि हे अनुभव ऐकल्यानंतर मात्र बरेच समजूतदार पालक आपल्या मुलांना पहिल्या बेंचवर बसवण्यासाठीचा हट्ट सोडून आल्या पावली माघार घेत, घरी परतत असतात.


#या प्रकारच्या हट्टाची लागण, माझ्या घरी, माझ्या मुलीलाही झाली होती. दररोज शाळेत जाण्यासाठी ती खुप धावपड करून तयारी करत असे. तिला सुद्धा शाळेत सगळ्यांच्या आधी पोहोचून पहिला बेंच पकडायचा असे. त्यासाठी तीची धावपळ पाहिली की मला हसायला येई. मग तीला सुद्धा माझ्या बालपणीच्या आठवणी सांगुन मी तिला या बाल-हट्टापासुन दूर केले आहे.


#घरोघरी आणि प्रत्येक शाळेत येणाऱ्या या समस्येतुन मुक्त होण्यासाठी अशाच प्रकारचे काही दाखले आपल्याला विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना द्यावे लागणार आहेत.


#नुसतच पहिल्या बेंचवर बसून मुलं हुशार होत नसतात.  हुशार होण्यासाठी अभ्यासाकडे आणि वर्गशिक्षकांच्या शिकवण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असावे लागते. म्हणून.. आता आपणच ठरवायचं आहे की, आपल्याला पहील्या बेंचवर बसण्यासाठी हट्ट धरायचा आहे, की मिळेल त्या बेंचवर बसून वर्गशिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देऊन, अभ्यासात हुशार व्हायचे आहे.

धन्यवाद..!

#शब्दाकंन..

#श्री_दिपक_विनायक_पाटील

(खर्देपाथर्डेकर) 

प्रा.शिक्षक मांजरोद शिरपूर धुळे

Post a Comment

0 Comments

close