Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका PDF / शासन परिपत्रक | शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा सहभाग लिंक

शिक्षक व अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणेबाबत परिपत्रक, शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा सहभाग लिंक | शिक्षक व अधिकारी /  कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका PDF | Shikshak V Adhikari Spardha link, guidance PDF


शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र (SCERTM), पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सदर उपक्रम केवळ एक स्पर्धा नसून शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी एक संधी आहे. यातून त्यांना आपले कौशल्य आणि नवकल्पना विकसित व प्रदर्शित करता येतील


राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० (NEP-2020) हे शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीला मोडून एक समग्र, लवचीक आणि बहुआयामी शिक्षण पद्धतीचा पाया रचते. या धोरणानुसार, शिक्षकांचे सर्वांगीण व्यावसायिक सक्षमीकरण हे शिक्षणाच्या गुणवत्तेचा केंद्रबिंदू आहे. प्रस्तावित स्पर्धात्मक कार्यक्रम NEP-2020 च्या तत्त्वांना मूर्त स्वरूप देतील. या स्पर्धांद्वारे शिक्षकांना नवीन अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास करण्यास प्रोत्साहन मिळेल.


शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये समस्या निराकरण, चिकित्सक विचार आणि सर्जनशीलता यांसारख्या कौशल्यांची वाढ करणारे असणे आवश्यक आहे. या स्पर्धा शिक्षकांना अशा प्रकारच्या शैक्षणिक बदलांशी जुळवून घेण्यास आणि ते प्रत्यक्षात आणण्यास मदत करतील.


शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन देऊन आणि त्यांच्या कार्याची ओळख निर्माण करून कार्यमान प्रतवारी निर्देशांक (PGI) मध्ये समाविष्ट असलेल्या विविध मापदंडांमध्ये आपण सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. उदा. शिक्षकांची तयारी, व्यावसायिक विकास, शालेय वातावरणातील सुधारणा इ. सदर उपक्रम शिक्षकांना अशा २१ व्या शतकातील कौशल्यांसाठी सुसज्ज करील. सर्जनशीलता, सहयोग, संप्रेषण आणि चिकित्सक विचार. आजच्या जगात, शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांना भावी जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविण्यासाठी मार्गदर्शक होणे आवश्यक आहे.


या स्पर्धांच्या माध्यमातून, आपण शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाला सक्रियपणे सहभागी करून एक उत्साहवर्धक, सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण निर्माण करू शकतो. या उपक्रमांतर्गत समाविष्ट विविध स्पर्धांना मिळणारे यश हे राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देईल. 


सदर स्पर्धांमधून शिक्षकांच्या सेवाविषयक कामगिरी उंचावेल आणि वर्गातील अध्ययन-अध्यापनाचा दर्जा सुधारेल. प्रस्तुत मार्गदर्शिकेत समाविष्ट स्पर्धांमध्ये भविष्यात वाढ होऊन सर्वांना अधिक संधी मिळू शकते. प्रत्येक केंद्रातून किमान एक शिक्षक सहभागी होईल याची खात्री करावी. सर्वांनी सहभाग घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विजेत्यांसाठी प्रोत्साहनपर भरपूर पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. 


शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा उद्देश

राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, DIET मधील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे, त्यांच्यात समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल, भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात येत आहे.


शिक्षक व अधिकारी /  कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका PDF

या स्पर्धांच्या आयोजनासाठी निकष आणि नियमावली तयार करण्यात आली आहे. सदर स्पर्धा ह्या एकूण ४२ विषयांवर आधारित असणार आहेत. नमूद स्पर्धांचे निकष व नियमावली बाबतची सविस्तर माहिती शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका ह्या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी सदर पुस्तिकेत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ह्या संस्थेच्या www.maa.ac.in ह्या संकेतस्थळावर उपयुक्त या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका PDF डाउनलोड करा. Click Here


शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा सर्वसाधारण सूचना

१) सर्व स्पर्धा पुढील तीन स्तरावर आयोजित करण्यात येतील.

1) तालुका स्तर

२) विभाग स्तर

३) राज्य स्तर

२) स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे समन्वयाने करावे.

३) तालुका स्तरावर सर्व स्पर्धांचे आयोजन संबंधित जिल्हा करेल. विभागनिहाय स्पर्धेचे आयोजन पुढीलप्रमाणे होईल. तसेच राज्य स्तरावरील संबंधित स्पर्धांसाठी संबंधित जिल्हे आयोजक असतील.


४) स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व आयोजक व स्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी शिक्षक शिक्षण (TE) किंवा नियामोचित इतर लेखाशिर्ष अंतर्गत प्राप्त निधीतून स्पर्धेच्या आयोजनाचा विहित नियमावलीप्रमाणे खर्च भागवावा.

५) प्रत्येक स्पर्धेत केंद्रातील किमान एका शिक्षकाने सहभाग घेणेबाबत प्रोत्साहित करण्यात यावे. ही निवड प्रक्रिया केंद्र स्तरावर राबविण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांची राहील. स्पर्धानिहाय सहभाग घेणाऱ्या कर्मचाऱ्याची लेखी संमतीही घ्यावी.

६) तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन व संनियंत्रण स्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने करावे, यासाठी आवश्यकतेप्रमाणे विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची मदत घ्यावी. तसेच आयोजक जिल्ह्याचेही वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. प्रत्येक URC क्षेत्र हे एक स्वतंत्र तालुका समजण्यात यावे.

७) विभागस्तरीय स्पर्धांचे आयोजन विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सहभागाने विभाग मुख्यालयाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने करावे. यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांचीही मदत घ्यावी.

८) राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजक जिल्ह्यात करावयाच्या आयोजनाची जबाबदारी ही आयोजक जिल्ह्याची राहील. प्रत्येक स्पर्धेसाठी आयोजनाची जबाबदारी आयोजक जिल्ह्याची राहील.

९) तालुका स्तरावर प्रत्येक स्पर्धेचा विजेता विभाग स्तरावर स्पर्धेसाठी पात्र राहील.

१०) विभाग स्तरावर प्रथम ५ क्रमांकाचे विजेते राज्य स्तरावर सहभागासाठी पात्र राहतील.

११) OLYMPIAD परीक्षा घेण्यासाठी विषयनिहाय व तालुकानिहाय तज्ज्ञ शिक्षकांची यादी तयार करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील एक नोडल अधिकारी नेमावा. तज्ज्ञ शिक्षकांची यादी परिषदेतील संबंधित विभागांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

१२) दिव्यांग स्पर्धकांना गरजेनुसार आवश्यक साहित्य/सुविधा स्पर्धेच्या ठिकाणी उपलब्ध करून दयाव्यात.

१३) आयोजक जिल्ह्याने उद्भवणाऱ्या सर्व सूचना व तक्रारी हाताळाव्यात. सर्व स्तरावरील स्पर्धा निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील याबाबत दक्षता घ्यावी. आवश्यकतेप्रमाणे परिषदेस संपर्क करण्यास हरकत नाही.


शिक्षक व अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत सूचना


शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा सहभागी होणेसाठी लिंक - Click Here


वैयक्तिक क्रीडा स्पर्धा :

तालुका/विभाग/राज्य स्तरावर उपरोक्त स्पर्धांप्रमाणे आयोजनाची कार्यपद्धती राहील.

सांघिक क्रीडास्पर्धा :


१) प्रत्येक संघ हा जिल्हा स्तरावर तयार करावा. सांधिक स्पर्धेसाठी जिल्हा अंतर्गत तालुका स्तरावर सुद्धा संघ तयार होत असल्यास तालुका अंतर्गत स्पर्धा घेऊन आवश्यकतेप्रमाणे सर्व तालुक्यांच्या संघातील उत्कृष्ट खेळाडूंना घेऊन स्पर्धानिहाय जिल्ह्याचा एक संघ निश्चित करावा.

२) विभाग स्तरावर समाविष्ट जिल्ह्यांकडून प्राप्त नामनिर्देशन / विजयी प्रथम क्रमांकाचा संघ सहभाग घेईल. विभाग स्तरावर विजयी प्रथम क्रमांकाचा संघ राज्य स्तरावर नामनिर्देशित होईल. राज्य स्तरावर ८ विभागांकडून आलेल्या ८ विजयी संघातून अंतिम तीन क्रमांक निश्चित होईल.

३) वेगवेगळ्या सांधिक क्रीडा स्पर्धांचे राज्यातील स्पर्धेचे वेळापत्रक शक्यतोवर वेगवेगळ्या दिवशी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

४) एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छित असेल, तर त्याच्या केंद्रातील सर्व शिक्षक एखादया तरी स्पर्धेत सहभागी झाले असतील तरच त्याला परवानगी देता येईल. त्यानंतर मात्र जिल्ह्याने अशा शिक्षकास वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धांमध्ये सहभागासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा.

५) सर्व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा या पुरुष व महिला अशा दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे आयोजित होतील, परंतु सांधिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्रत्येक चमूत किमान ५०% महिला असणे आवश्यक राहील. यासाठी निवडलेले सांघिक खेळ बदलण्यासही हरकत नाही.

६) या स्पर्धांची तयारी करण्यासाठी सुट्टी घेता येणार नाही तसेच सहभागामुळे अध्ययन-अध्यापनाचे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी ही संबंधित शिक्षकाची असेल.

७) सर्व DIEET यांनी सर्वच स्पर्धांसाठी सक्षम परीक्षकांची व स्थळांची निवड पूर्ण करावी आणि आयोजक जिल्ह्यास त्यांच्या BIODATA सह यादी पाठवावी. आयोजक जिल्ह्याने सर्व BIODATA तपासून परीक्षक सक्षम आहेत याची खात्री करावी व सर्व स्तरावरील परीक्षकांची यादी अंतिम करावी.

८) सर्व स्पर्धांच्या ठिकाणी आवश्यक खबरदारी जसे पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृह, वैदयकीय पथक, सावलीची जागा इ. आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करावेत. याची जबाबदारी स्थानिक DIET ची राहील.


शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका PDF डाउनलोड करा. Click Here


शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा सहभागी होणेसाठी लिंक - Click Here


शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा आयोजित करणेबाबत परिपत्रक - Click Here

Post a Comment

0 Comments

close