शाळाबाह्य मुले तसेच शाळेत अनियमित असणाऱ्य मुलांना शाळेत आणण्यासाठी तसेच त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने बालरक्षक ही नवी संकल्पना आणली आहे. राज्यातील नागरिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणतीही व्यक्ती बालरक्षक बनून या मुलांच्या शिक्षणात योगदान देऊ शकणार आहे. यासाठी राज्यभरात ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.
राज्याच्या विविध भागात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अद्यापही प्रचंड मोठे आहे. मध्यंतरी शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून शाळाबाह्य मुलांची राज्यातील संख्या सुमारे ७० हजार असल्याची आकडेवारी पुढे आली होती. मात्र, हे आकडे खोटे असून प्रत्यक्षातील शाळाबाह्य मुलांची संख्या यापेक्षा जास्त असल्याचा दावा स्वयंसेवी संस्था सातत्याने करीत आहेत.
आता, राज्यभरातील शाळांमध्ये नव्या शैक्षणिक सत्राची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थी यावेत यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे करीत असताना शाळाबाह्य तसेच अनियमित विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी 'बालरक्षक' चळवळ राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांना शाळेत येण्याची इच्छा निर्माण होईल असे वातावरण निर्माण करणे, शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी मदत करणे ही कामे बालरक्षकांमार्फत केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमागे एक शिक्षक तरी बालरक्षक म्हणून कार्यरत व्हावा, असा प्रयत्न करण्यात येतो आहे. त्याचप्रमाणे, अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच नागरिकही बालरक्षक बनून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात. शाळेपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम राबविली जाणार आहे.
'विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन बालरक्षक त्यांना शाळेत येण्यासाठी प्रेरणा देतील. शाळाबाह्य मुले आणि अनियमित मुले यांचे अनुक्रमे इ-१ आणि इ-२ असे दोन गट पाडण्यात आले आहेत. या दोन्ही गटातील मुलांची शाळेतील उपस्थिती वाढविण्याचा प्रयत्न या अभियानादरम्यान केला जाईल. जिल्हा स्तरावर या योजनेसाठी समन्वयक नेमण्यत आले आहेत. नागपूर विभागाच्या स्तरावर नुकतीच यासंदर्भात बैठक घेण्यात आली. संपूर्ण राज्यातच ही बालरक्षक चळवळ राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे,' असे मत नागपूर प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे प्रमुख रवींद्र रमतकर यांनी सांगितले. सर्व जिल्ह्यांमध्ये या कामाला सुरुवात झाला आहे. विविध ठिकाणी राहणारी स्थलांतरितांची मुले तसेच गावातील मुले यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम बालरक्षक करणार आहेत.
0 Comments