Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जामखेड-अंगणवाडीचे छताचे प्लास्टर कोसळले

म. टा. वृत्तसेवा, जामखेड
तालुक्यातील नान्नज येथे चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या अंगणवाडीच्या छताचे प्लास्टर गुरुवारी कोसळले. सुदैवाने या वेळी सर्व लहान मुले मधल्यासुट्टीत बाहेर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, निकृष्ट कामांबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
नान्नज येथे मारवाडी गल्लीत २०१४-१५ मध्ये साडेचार लाख रुपये खर्च करून अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. काही ग्रामस्थांच्या मते उद्घाटन होण्याअगोदरच एकदा प्लास्टर पडले होते. तात्पुरती मलमपट्टी डागडुजी करून उद्घाटन झाले. या अंगणवाडीत पंधरा ते वीस मुले येतात, एक सेविका व एक मदतनीस आहे. आज खाऊवाटप झाल्यावर खाऊ खाल्यानंतर मुलांची मधलीसुट्टी झाली. त्यामुळे मुले बाहेर गेली आणि त्याच वेळी स्लॅबचे प्लास्टर कोसळले. सुदैवाने मुले बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या या इमारतीचे स्लॅबचे पूर्ण प्लास्टर पडण्याच्या स्थिस्तीत आहे. निकृष्ट प्रतिची वाळू, कमी सिमेंट, बांधकामास योग्य प्रमाणात पाणी न मारणे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे यामुळे असे प्रकार घडत आहेत. अधिकारी, ठेकेदार यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे असे प्रकार घडत आहेत, असा आरोप करून ग्रामस्थांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोट :
२०१४-१५ मध्ये साडेचार लाख रुपये खर्च करून अंगणनाडीच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. ग्रामपंचायतीने हे काम केले. ही सर्व जवाबदारी ग्रामपंचायतीची आहे. देखभाल व दुरुस्ती ग्रामपंचायतीने करावी.
- व्ही. डी. जोशी, उपअभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद नगर
फोटो ओळ :
नान्नज येथील अंगणवाडीच्या छताचा भाग गुरुवारी कोसळला.

Post a Comment

0 Comments

close