ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा ७ जुलैला प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला होता. त्यांचा राजीनामा प्रशासकीय कारणास्तव नामंजूर करण्यात आला आहे.
युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सात कोटी रुपयांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली होती.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते 'डायट'कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर अवार्डची तयारी करण्यातच तो कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला. तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करून अहवाल तसाच ठेवला. विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडला आणि त्यांची स्वतंत्र चौकशी करून कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या केली होती.
त्यापूर्वी डिसले गुरुजी यांनी अमेरिकेत जाण्यासाठी रजेचा अर्ज दाखल केला होता. परंतु अपूर्ण कागदपत्रे आहेत या कारणावरून त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मध्यस्थितीने त्यांना रजा मंजूर करण्यात आली होती.
रजा मंजूर करण्यासाठी शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोप डिसले गुरुजींनी केला होता. पण, त्यांना त्याचा पुराव्यानिशी खुलासा करण्याचे पत्र जि. प ने दिले होते तेव्हा त्यांनी माफीनामा सादर केला होता.



0 Comments