Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी वर्णमाला शासन निर्णय - देवनागरी लिपी व वर्णमाला अद्ययावत करण्याबाबत शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2022 व 6 नोव्हेंबर 2009

शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादीसाठी स्वीकारलेली देवनागरी लिपी व वर्णमाला अद्ययावत करण्याबाबत शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आला आहे. 

सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, मराठी पाठ्यपुस्तके इत्यादीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण इत्यादी स्वरूपांत केला जातो, त्या सर्व ठिकाणी देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला व अंक कशा प्रकारे वापरण्यात यावेत ह्याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि. ०६.११.२००९ अन्वये देण्यात आले आहेत.

मराठी वर्णमाला बाबत 06 नोव्हेंबर २009 चा शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here


सदर 06 नोव्हेंबर 2009 च्या शासन निर्णयामध्ये काही सुधारणा, बदल करणे आवश्यक असल्याचे मत काही शिक्षक, लेखक ह्यांनी शासनाकडे व्यक्त केले होते. तसेच, मराठी भाषेतील एकूण स्वर स्वरादी ह्यांची संख्या, प्रमाणलेखनाबाबतचे नियम सोपे करणे इत्यादींबाबत निश्चित कार्यवाही करण्याची मागणी काही व्यक्तींनी केली होती. तसेच, मराठी भाषेतील तत्सम तद्भव शब्दांबाबतचे नियम सोपे करण्याबाबत सन २०१९-२०च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विभागास कपात सूचना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि. ०६.११.२००९ मधील बाबींवर पुनर्विचार करण्यासाठी आणि देवनागरी लिपीच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी 'मराठी भाषा प्रमाणलेखन निश्चितीकरण समिती' मराठी भाषा विभाग, शासननिर्णय दि. २९.०९.२०२१ अन्वये स्थापन करण्यात आली होती. सर्व समिती सदस्यांनी पुढील मुद्दयांच्या अनुषंगाने साधकबाधक चर्चा करून समितीसाठी निश्चित केलेल्या कार्यकक्षेत घेतलेले निर्णय पुढीलप्रमाणे आहेत.


१. तत्सम व तद्भव शब्दांबाबतचे १८ नियम मराठी साहित्य महामंडळाने निश्चित केले असल्यामुळे ह्याबाबत मराठी साहित्य महामंडळानेच पुढील कार्यवाही करणे उचित होईल, त्यामुळे ही बाब समितीच्या कार्यकक्षेतून वगळण्यात आली आणि ह्याबाबतची पुढील कार्यवाही मराठी साहित्य महामंडळाने करावी असे ठरले. 

२. 'लृ' हे स्वरचिन्ह 'क्लृप्ती, क्लृप्त, लृकार अशा काही शब्दांच्या लेखनात वापरले जात असल्यामुळे हे स्वरचिन्ह वगळण्यात येऊ नये.

३. 'ञ' ह्या व्यंजनचिन्हाचा वापर 'नञ' तत्पुरुष' ह्या शब्दात तसेच मराठी भाषेतील प्रमाणलेखनाच्या नियमानुसार तत्सम शब्दांत अनुस्वाराच्या जागी पर-सवर्ण वापरून लिखाण करतानाही केला जातो. त्यामुळे 'ञ' हे व्यंजनदेखील वर्णमालेतून वगळण्यात येऊ नये.

४. सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि. ०६.११.२००९ च्या सहपत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मराठी वर्णमालेतील सर्व स्वर, स्वरादी व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने ह्यांच्या संख्येत समितीने कोणताही बदल प्रस्तावित केलेला नाही.

५. सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि. ०६.११.२००९ च्या सहपत्रामध्ये 'स्वरेतर चिन्हाचे नाव' ह्या शीर्षकाचा नवीन रकाना बनवून त्यात शिरोबिंदू, विसर्ग, हलन्त, अधोबिंदू (नुक्ता), अवग्रह ही चिन्हे दर्शवण्यात यावीत. तसेच ह्या बदलाच्या अनुषंगाने उक्त शासननिर्णयातील परिशिष्ट एकमधील मुद्दा क्र. ०४ मध्ये अनुरूप बदल करण्यात यावेत. शासननिर्णयातील 'स्वरचिन्हाचे नाव ह्या रकान्याशेजारी असलेल्या चिन्हा ह्या रकान्याचे नाव बदलून 'स्वरांशचिन्हे' असे करण्यात यावे.

६. स्वरेतर चिन्हांच्या तत्त्यामध्ये 'चंद्रबिंदू' ह्या नवीन चिन्हाचा समावेश करण्यात यावा व त्यासंदर्भात टीप देण्यात यावी. 

७. शासन निर्णय दि. ०६.१९.२००९ च्या परिशिष्ट तीनमधील विरामचिन्हे व इतर चिन्हे ह्याअंतर्गत सध्या असलेल्या चिन्हांबरोबरच व्याप्तिचिन्ह, छेदचिन्ह, तिर्यकरेषा ह्यांचा समावेश करण्यात यावा.

८. विसर्ग व अपूर्णविराम ह्यांतील तसेच यामधील रकार व संयोगचिन्ह ह्यांतील फरक स्पष्ट करण्यासाठी त्यासंदर्भात टीप देण्यात यावी. 'अधोरेखा' हे चिन्ह उदाहरणासह दर्शवण्यात यावे.

९. अब्ज' ह्या संख्येनंतरच्या 'खर्व निखर्व' इत्यादी संख्यांसाठीच्या वाचक शब्दांचा समावेश करणे शक्य आहे का ह्याबाबत विचार करण्यात यावा. (नंतर अभ्यासान्ती, अधिकृत प्रमाण संदर्भखोताच्या अभावी 'अब्ज' ह्या संख्येनंतरच्या संख्यावाचक शब्दांचा समावेश करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला.)

१०. शासननिर्णय दि. ०६.११.२००९ मधील 'मराठी अक्षरमाला तक्ता - शालेय स्तरासाठी ह्यातील 'स्वर व स्वरचिन्हे' ह्या विभाग शीर्षकाऐवजी स्वरचिन्हे व स्वरांशचिन्हे असे विभागशीर्षक द्यावे.

११. 'श' व 'ल' ह्या अक्षरांची दृश्यरूपे ह्या मुद्दयाबाबत समिती सदस्यांच्या भूमिका थोड्या वेगवेगळ्या होत्या. काही सदस्यांनी देव्युक्त 'श' व गाठयुक्त 'श' तसेच पाकळीयुक्त 'ल' व दंडयुक्त 'ल' अशा दोन्ही दृश्यरूपांना प्रमाण म्हणून मान्यता देण्यात यावी, असे मत मांडले होते. परंतु साधकबाधक चर्चेनंतर अंतिमतः सर्वानुमते सन २००९ च्या शासननिर्णयात नमूद केल्यानुसार, देठयुक्त 'श' व पाकळीयुक्त 'ल' हीच दृश्यरूपे प्रमाणरूपे म्हणून स्वीकारण्यात यावी व त्या अनुषंगाने त्या संदर्भातील शासननिर्णय दि. ०६.११.२००९ मधील मांडणीत कोणतेही बदल करण्यात येऊ नयेत, असा निर्णय घेण्यात आला.


१२. शासननिर्णय दि. ०६.१९.२००९ च्या परिशिष्ट दोनमध्ये जोडाक्षरलेखनासंबंधी केलेली मांडणी काहीही बदल न करता प्रमाण म्हणून स्वीकारण्यात यावी.


थोडक्यात, सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि. ०६.१९.२००९ चा अभ्यास केल्यानंतर समिती- सदस्यांनी मत नोंदवले की सदर शासननिर्णय अनेक जाणकार तज्ज्ञ अभ्यासकांच्या सूचनांनुसार तयार केला गेला होता आणि ह्या शासननिर्णयाची व्याप्ती आणि भूमिका योग्य आहे. त्यामुळे शासननिर्णयासोबतचे सहपत्र व परिशिष्टे ह्यांमध्ये स्वर व स्वरादी ह्यांची संख्या नमुद करणे, 'स्वरचिन्हे, स्वरांशचिन्हे, स्वरंतर चिन्हे' अशा संज्ञा-संकल्पनांबाबत अधिक काटेकोरपणा आणणे, 'चंद्रबिंदू' या चिन्हाचा समावेश करणे, व्याप्तिचिन्ह, छेदचिन्ह, तिर्यकरेषा' ह्या लेखनचिन्हांचा समावेश करणे, 'अधोरेखा' ह्या चिन्हाचे उदाहरण देणे अशा आनुषंगिक बाबींचा समावेश करण्याची बाब वगळता, सदर शासननिर्णयात मूलभूत पातळीवर फारसा फरक करण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय समितीद्वारे घेण्यात आला. त्यामध्ये केवळ उपरोल्लेखित निर्णयांशी संबंधित बाबींचा समावेश करून सर्व समितीच्या वतीने समिती सदस्य डॉ. गिरीश दळवी, डॉ. अनघा मांडवकर आणि डॉ. रेणुका ओझरकर ह्यांनी शासननिर्णय ०६.११.२००९ मध्ये सुधारणा करून शासनास सादर केल्या आहेत.


ह्या पार्श्वभूमीवर, दि. ०६.११.२००९ चा शासननिर्णय अधिक्रमित करून सदर शासननिर्णयातील मूलभूत बाबींमध्ये बदल न करता, त्यामध्ये केवळ उपरोक्त नमूद आनुषंगिक बाबींचा समावेश करून अद्ययावत शासननिर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

मराठी वर्णमाला शासन निर्णय- 10 नोव्हेंबर 2022 - Click Here

सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, मराठी पाठ्यपुस्तके इत्यादींमध्ये तसेच ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतो अथवा भविष्यात केला जाणार आहे अशा सर्व ठिकाणी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादीसाठी सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवण्यात आलेल्या देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमालेचा, अक्षरमालेचा व अंकांचा शासनाने स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने वर्णमालेच्या संदर्भातील स्पष्टीकरणे तसेच विशिष्ट अक्षरांच्या लेखनाबाबतच्या सूचना स्वरचिन्हे, जोडाक्षरे, वर्णक्रम, लेखनात वापरावयाची विरामचिन्हे व अन्य चिन्हे, अंक, अंकांचे अक्षरी लेखन इत्यादीविषयी सविस्तर व सोदाहरण सूचना देणारी सात परिशिष्टे सोबत जोडली आहेत. मराठी भाषेच्या लेखनात एकरूपता राखण्यासाठी सर्वांनी ह्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

Post a Comment

1 Comments

  1. ॲ ऑ हे कोणते स्वर आहेत, रहस्व की दीर्घ

    ReplyDelete

close