Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मिशन लक्ष्यवेध योजना - राज्यातील खेळाडूंनी ऑलिंपिक स्पर्धासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्युच्च दर्जाची कामगिरी करण्यासाठी "मिशन लक्ष्यवेध" योजना

राज्यातील खेळाडूंनी ऑलिंपिक स्पर्धासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्युच्च दर्जाची कामगिरी करण्यासाठी "मिशन लक्ष्यवेध" ही नवीन योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.



महाराष्ट्र हे क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य आहे. नुकत्याच पार पाडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला १०७ पदके प्राप्त झालेली आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ७३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता व त्यापैकी वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमधून ३३ खेळाडूंनी पदके प्राप्त केलेली आहेत. तथापि, ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होऊन पदके प्राप्त करावीत याकरीता विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.


राज्यातील खेळाडूंनी ऑलिंपिक स्पर्धासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्युच्च दर्जाची कामगिरी करण्यासाठी खेळ व खेळाडू, पायाभूत सुविधा, क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा स्पर्धा आयोजन, क्रीडा विज्ञान व क्रीडा वैद्यकशास्त्र, प्रोत्साहन व पुरस्कार, करिअर मार्गदर्शन, देशी-विदेशी संस्थांच्या सहयोगाने क्षमतासंवर्धन/विकास उपक्रम राबविणे या ०८ महत्वपुर्ण उर्ध्वगामी (Vertical) मुद्यांवर भर देऊन त्यानुषंगाने खेळाडू केंद्रित प्रशिक्षण कार्यक्रम (Focussed Program) तयार करण्यासाठी प्रामुख्याने ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटींग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या १२ ऑलिंपिक क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यानुसार या १२ ऑलिंपिक क्रीडा प्रकारांसाठी राज्य स्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटर व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी क्रीडा प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारण्याबाबतची मिशन लक्ष्यवेध ही नवीन व महत्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

सन 2024 सालातील शासन निर्णय - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन- Click Here

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके - Click Here


मिशन लक्ष्यवेध शासन निर्णय :

ऑलिंपिकसह महत्वपुर्ण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून पदके मिळविण्यासाठी राज्यातील क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा ही खेळाडूकेंद्रीत, अधिक प्रभावी, परिणामाभिमुख, स्पर्धाक्षम व आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे असणे आवश्यक आहे. यानुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

१) ऑलिंपिक पदकांचे ध्येय गाठण्याकरीता नियोजनबद्ध प्रयत्न करण्यासाठी १२ ऑलिंपिक क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित करुन या खेळांचे राज्य स्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटर व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी क्रीडा प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारण्याबाबतच्या "मिशन लक्ष्यवेध" या नवीन व महत्वाकांक्षी योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास व त्यासाठी वार्षिक रु.१६०४६.३५ लक्ष इतक्या अंदाजित खर्चास (सोबतच्या परिशिष्ट-अ प्रमाणे) याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

2. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून प्रत्येक जिल्ह्यातील क्रीडा विभागास वितरीत केल्या जाणाऱ्या एकूण नियतव्ययाच्या किमान १० टक्के इतकी रक्कम "मिशन लक्ष्यवेध" या योजनेंतर्गत मान्य बाबींवर खर्च करण्यात यावी.


3. सदर योजना ऑलिंपिक व आंतरराष्ट्रीय पदके मिळण्याच्या अनुषंगाने राबविण्यात येत असून त्यानुषंगाने तसेच नियोजन विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार प्रचलित ऑलिंपिक अभियान योजना ही सदर मिशन लक्ष्यवेध योजनेत समायोजित करण्यात येत आहे.


4. या योजनेतंर्गत निवडलेल्या १२ क्रीडा प्रकारांकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या २४० खेळाडूंसाठी राज्यातील ०६ ठिकाणी राज्यस्तरीय हाय परफॉर्मन्स सेंटर, राष्ट्रीय दर्जाच्या ७४० खेळाडूंसाठी ३७ विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटरराज्य दर्जाच्या २७६० खेळाडूंसाठी जिल्हास्तरावर १३८ जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. सदर निवडलेल्या खेळाडूंना तज्ज्ञ क्रीडा संस्था / व्यक्तींमार्फत देण्यात येणाऱ्या तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षणाची माहिती, योजनेचे स्वरूप, अंतर्भूत बाबी, आर्थिक बाबी सोबतच्या परिशिष्ट-अ प्रमाणे आहेत.


5. मिशन लक्ष्यवेध या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी करावयाच्या सर्व निविदा प्रक्रिया, तज्ज्ञ संस्थांशी करावयाचे करार, व्यवस्थापनाकरिता कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करुन घ्यावयाचे मनुष्यबळ, खेळाडूंना उपलब्ध करुन द्यावयाचे आर्थिक सहाय्य इ. बाबींचे सनियंत्रण करण्याचे अधिकार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांना प्रदान करण्यात येत आहेत. तसेच या योजनेतंर्गत प्रशिक्षण कार्यक्रम, समाविष्ट खेळाडू व प्रशिक्षक यांची कामगिरी, आस्थापना खर्च व देखभाल दुरुस्तीच्या बाबी आणि आर्थिक बाबी या मुद्यांबाबतचा आढावा दर तीन महिन्यांनी क्रीडा संचालनालय स्तरावर आणि शासन स्तरावर घेण्यात येईल.


6. मिशन ऑलिंपिक ही योजना "मिशन लक्ष्यवेध" या नवीन योजनेमध्ये समायोजित करण्यात येणार असल्यामुळे, मिशन ऑलिपिंक या योजनेचे लेखाशिर्ष क्र. मागणी क्र.ई-३, २२०४, क्रीडा व युवक सेवा, १०४, क्रीडा व खेळ, (०९) खेळाडूंना शिष्यवृत्त्या व पुरस्कार, (०९) (०९) राष्ट्रीय स्तरावर क्रीडा कौशल्य व तंत्र संबंधात खास शिक्षणाचा दर्जा वाढविणे (ऑलिंपिक अभियान), ३१ सहायक अनुदाने वेतनेतर, (२२०४-५३६८) या लेखाशिर्षाखाली उपलब्ध तरतूदीमधून मिशन लक्ष्यवेध या नवीन योजनेसाठी निधी वितरीत करण्यास याद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे.


७. सदर शासन निर्णय, नियोजन विभाग अनौपचारीक संदर्भ क्र. २८१/१४७१, दि.२५/८/२०२३ आणि वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.८५०/व्यय ५, दि. १७/१०/२०२३ यान्वये प्राप्त सहमतीनुसार तसेच राज्य मंत्रीमंडळाच्या दि.१४.१२.२०२३ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.


८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०११११९०९१८८५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

'मिशन लक्ष्यवेध योजना' शासन निर्णय डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close