Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा - केंद्र सरकारचा निर्णय

केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. आज अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.



केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच भारतीय भाषांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याकडे आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा होता. आता आज मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांनाही अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे."


भारतात आत्ताच्या घडीला 7 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे.

◾️तामिळ (2004)

◾️संस्कृत (2005)

◾️कन्नड (2008)

◾️तेलुगु (2008)

◾️मल्याळम (2013)

◾️ओडिया (2014)

◾️मराठी (2024)


अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language) मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात

◾️संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा. 

◾️या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे. 

◾️भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. 

◾️प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.


अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

◾️काही प्रमाणात पैसे मिळतात 

◾️अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. 

◾️अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं. 

◾️प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

◾️मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं

◾️प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातात


"माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ 

समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!



आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन - 03 ऑक्टोबर 2024



आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर  प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.  केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे. 


आजचा हा दिवस यापुढे 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 


मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ।।  या ओळींचाही दाखला दिला आहे. ते म्हणतात, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे . निती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे. मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा हा निर्णय आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतला गेल्याने दुधात साखर असा योग जुळून आला आहे. यासाठी आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानतो. 


मराठी भाषा प्रगल्भ आहेच. आता तिचा प्रचार, प्रसार आणखी जोमाने करता येईल. मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केली, वाढवली. तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषक, विचारवंत, भाषा अभ्यासक- संशोधक, साहित्यिक आणि समीक्षक अशा सर्वांचे आभार मानले आहेत. 

Post a Comment

0 Comments

close