आधारशिला बखलवाटिका - महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला-अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अनुसार पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांकरिता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाचे नाव अनुक्रमे 'आधारशिला बालवाटिका १', 'आधारशिला बालवाटिका-२' व 'आधारशिला बालवाटिका ३' असे राहील.
पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम टप्प्या-टप्प्यानिहाय राबविणेबाबत GR - Click Here
१. आधारशिला बालवाटिका याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य व अनुषंगिक साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणाच्यावेळी उपलब्ध करून देण्यात येईल.
२. अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांकरिता विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य (कृतीपुस्तिका, समग्र प्रगती पुस्तिका, अन्य पूरक अध्ययन साहित्य, इ.) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येईल. या साहित्याच्या उपयोगिता व परिणामकारकतेचे मूल्यमापन सदरचे साहित्य एक वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येईल. याबाबतची उचित कार्यवाही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यास्तरावरुन करण्यात येईल, त्यानुसार या उपक्रमाच्या अंमलबजावणीची पुढील कार्यदिशा ठरविण्यात येईल.
३. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील तरतुदीनुसार इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण यासंदर्भात सहा महिन्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावीपेक्षा कमी अर्हता धारण केलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत देण्यात येईल. याकरिता, अंगणवाडी सेविकांचा आवश्यक तपशील महिला व बाल विकास विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांना तातडीने उपलब्ध करून देऊन याकामी आवश्यक ते सहकार्य करावे.
४. अंगणवाडीतील वयोगट ३ ते ६ वर्षे बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यावयाचे असल्यास, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या समन्वयाने महिला व बाल विकास विभागाकडून असे प्रशिक्षण देण्यात येईल.
५. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भ क्र. ९ येथील दिनांक २३ एप्रिल, २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (MRSAC) या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळांचे Geo Tagging करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर परिपत्रकातील सूचनांप्रमाणे महिला व बाल विकास विभागाकडील सर्व अंगणवाड्यांचे Geo Tagging करण्यात येईल.
६. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भ क्र. ६ येथील दिनांक १४.०३.२०२४ रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्गखोलीमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबत महिला व बाल विकास विभाग व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या / अतिरिक्त वर्गखोलीमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
७. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरविण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य जसे, जादुई पिटारा, ई-जादुई पिटारा इत्यादी साहित्यांचा बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात व अध्ययनात पुरेपुर उपयोग करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांचे वेळोवेळी उद्बोधन करावे. याकरिता आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्गमित करावे,
८. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर विविध सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
९. अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना द्यावयाचे प्रशिक्षण, त्यासाठीचे आवश्यक साहित्य तसेच प्रायोगिक तत्त्वावर निवडक अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांकरिता द्यावयाचे पूरक शैक्षणिक साहित्य व इतर अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात येईल.
0 Comments