राज्यामध्ये जिल्हा, तालुका, केंद्रस्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर शिक्षण परिषदेमध्ये विशेष सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामधून शिक्षकांना सकारात्मक शिस्त याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून समाजात याविषयी चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक-विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हे, तालुके अथवा केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'सकारात्मक शिस्त' या विषयावर किमान ४५ मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्यात यावे, असे मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण) यांचे निर्देश आहेत.
सकारात्मक शिस्त या मार्गदर्शन सत्रामध्ये भर द्यावयाचे नऊ मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
१) शारीरिक शिक्षेबाबत शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदी व शिक्षकांची जबाबदारी.
२) शिक्षेचे प्रकार व स्वरूप शारीरिक, शाब्दिक, भावनिक, मानसिक तसेच भीती दाखविण्याकरता केलेली कृती.
३) शिक्षेचे परिणाम - भीती, न्यूनगंड निर्माण होणे, अबोल होणे, अध्ययन गतीचा वेग मंदावणे, मुले भित्री किंवा आक्रमक होणे.
४) शिक्षेचा मनावर व मेंदूवर होणारा परिणाम यामध्ये डॉ. पॉल मॅक्लिन, मेंदू तज्ञ यांचा थिअरी ऑफ डाऊन शिफ्टिंग हा सिद्धांत कथन करणे. हा सिद्धांत पुढील प्रमाणे आहे-
"जेव्हा मूल वाचन, संभाषण आणि अभ्यास अशी काही बौध्दिक कामे करत असते, अशा वेळेला त्याला रागावले तर त्याला भीती वाटते. मग बुद्धीचे काम थांबवून भावनांचे काम सुरु होते. अशा वेळी शरीर हे भावनांचे काम करणाऱ्या क्षेत्राकडे रक्तपुरवठा सुरु करते. अशा वेळी जर अजून मोठी शिक्षा झाली तर शरीर स्वतःला वाचवण्याचे काम सुरू करते. परिणामी रक्तपुरवठा बचावात्मक काम करणाऱ्या क्षेत्राकडे वळतो आणि बौद्धिक काम करणारी क्षेत्रे या प्रसंगी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही."
५) विविध शैक्षणिक विचारवंत व त्यांचे सकारात्मक शिस्तीविषयीचे विचार,
६) सकारात्मक शिस्त तत्त्वे व त्यांची अंमलबजावणी.
७) संवाद, सहकार्य व समुपदेशन यावर आधारित वर्ग व्यवस्थापन.
८) योग्य शिस्तीचे मार्ग, सकारात्मक शिस्तीचे विविध तंत्रे व उपक्रम.
९) अलीकडील घटनांचा संदर्भ घेऊन शिक्षकांची संवेदनशीलता वाढविणे.
अधिक माहितीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिका भाग दोन यामधील 'सकारात्मक शिस्त- एक आव्हान' या लेखाचा आधार घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.



0 Comments