राज्यातील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची सविस्तर माहिती आता ऑनलाइन भरली जाणार आहे. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाने 'शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष' अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
नियमित, नियमिततेतर आस्थापना, कार्यव्ययी आस्थापना, रोजंदारी, अंशकालीन आणि मानसेवी कर्मचाऱ्यांची माहिती या ऑनलाइन प्रणालीत भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ही माहिती वेळेत भरली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचा पगारही अडकू शकतो.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणती माहिती द्यावी लागणार?
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोषात कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आयडी, नाव, जन्मदिनांक, लिंग, पदनाम, सेवेत रुजू व निवृत्तीची तारीख, भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक, पॅन, आधार, मोबाइल, ई-मेल, सामाजिक प्रवर्ग, जात, धर्म, स्वग्राम आणि दिव्यांगत्व आदी माहिती घेतली जाणार आहे.
सध्याचे पद, पदोन्नतीची तारीख आणि जुलै २०२६मधील संपूर्ण वेतनाची तपशीलवार माहितीही नोंदवावी लागेल. या माहितीमुळे शासकीय मनुष्यबळाची अचूक संख्या, रिक्त पदांची स्थिती व वेतनावरील खर्चाचे चित्र स्पष्ट होईल.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष १५ सप्टेंबरपासून सुरुवातः
अधिकाऱ्यांना २ ते १५ सप्टेंबर २०२६ दरम्यान ऑनलाइन प्रणालीचा लॉग-इन आयडी व पासवर्ड मिळणार आहे. १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत माहिती भरून पहिले प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्रुटी दुरुस्तीसाठी १ डिसेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दुसरे प्रमाणपत्र मिळणार आहे.
प्रमाणपत्र बंधनकारक; त्याशिवाय पगार नाही
1) नोव्हेंबर २०२६ चे वेतन बिल सादर करताना पहिले प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. फेब्रुवारी २०२७ चे वेतन बिल (मार्चमध्ये देय) सादर करतानाही दुसरे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
2) कोषागारात वेतन बिले सादर न करणाऱ्या कार्यालयांनाही कर्मचारी आणि रिक्त पदांची माहिती ऑनलाइन भरावी लागेल. १ जुलै २०२६ रोजी सेवेत असलेले आणि जुलैमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारीही यात समाविष्ट केले जाणार आहेत.




0 Comments