जनगणना व बीएलओ चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सेवापुस्तकात करणेबाबत...
जनगणना व बी.एल.ओ. चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकमध्ये करणेबाबत संदर्भिय पत्र संचालनालयास प्राप्त झाले आहे. संदर्भः- विजयकुमार गुंड, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर यांचे जा.क्र.४६/२०२६-२७, दिनांक ०८/०९/२०२६ रोजीचे पत्र. सदर निवेदनामध्ये खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.
जनगणना व बी.एल.ओ. ची कामे करताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना त्यांच्या नियमित शैक्षणिक कामकाजाव्यतिरिक्त शासनाने सोपलेले अतिरिक्त राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे लागते.
अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षकांना अर्जित राजेचा लाभ देण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित झालेले असताना समान स्वरुपाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सदर लाभापासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक व भेदभावपूर्ण ठरेल तसेच जनगणना व बी.एल.ओ. चे काम हे शिक्षकांनी स्वेच्छेने स्वीकारलेले काम नसून शासनाच्या आदेशानुसार पार पाडलेले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे या कालावधीतील प्रत्यक्ष कामाचे दिवस शिक्षकांच्या सेवाकालाचा भाग म्हणून विचारात घेऊन त्यानुसार अर्जित रजेचा लाभ देणे आवश्यक असून खालील प्रमाणे मागण्या करण्यात येत आहेत.
१. शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक २६/०८/२०२६ रोजी निर्गमित केलेल्या आदेशाच्या धर्तीवर माध्यमिक वा उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी स्वतंत्र आदेश तातडीने निर्गमित करावेत.
२. जनगणना व बी एल ओ चे राष्ट्रीय कर्तव्य बजावलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या दिवसांच्या प्रमाणात अर्जित रजा त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये जमा करणचे निर्देश संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना द्यावेत.
३. यापूर्वी जनगणना व बी एल ओ चे काम केलेल्या शिक्षकांनाही या निर्णयाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत.
४. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनाही समान राष्ट्रीय कर्तव्य बजावलेले असल्याने प्राथमिक शिक्षकांप्रमाणेच त्यांनी समान निकष व समान लाभ देण्यात यावा.
५. या संदर्भात जिल्हानिहाय कार्यवाही करण्यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना स्पष्ट सूचना निर्गमित करणेत यावेत याबाबत संचालक शिक्षण प्राथमिक व माध्यमिक यांनी पत्राद्वारे निवेदन सादर केले आहे.



0 Comments