सोलापूर : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना दिला जाणार आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची काल शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणार्या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘ग्लोबल टीचर प्राईज’ प्राप्त केलेल्या बार्शीतील रणजितसिंह डिसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शीत येऊन डिसले यांचा आज सन्मान केला. इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची कामगिरी डिसले सरांची आहे. रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील फोनद्वारे डिसले गुरुजींचे अभिनंदन केले. राज्याच्या विधीमंडळामध्ये डिसले सरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली. दरेकर म्हणाले की, राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक झाल्या. परंतू त्यामध्ये शिक्षक सोडून राजकीय व्यक्तीच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिक्षकांंचे प्रश्न व्यवस्थितरित्या मांडले जात नाहीत.
0 Comments