*🎯 कणा*
(मूळ कविता)
‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी,
बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे
सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर,
जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन,
फक्त लढ म्हणा’!
🖊 *कविश्रेष्ठ कुसुमाग्रज*
=================
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या *कणा* या कवितेचा महाराष्ट्रातील खालील काही बोलीभाषांमधे केलेला अनुवाद 👇
१) नगरी
२) मराठवाडी
३) वऱ्हाडी
४) लेवा गणबोली
५) आदिवासी तडवी भिल्ल
६) अहिराणी
७) बागलाणी
८) झाडीबोली
९) मालवणी
१०) आगरी
११) परदेशी
१२) बंजारा गोरबोली
१३) पोवारी बोली
=================
🎯 *कना*
(नगरीबोली अनुवाद)
वळिकलं का सर मला ?
पावसात आला कुनी;
कापडं व्हती चिकलानी माकलेली
क्यासावरती पानी!
खिनबर बसला मंग हासला बोल्ला वर बघून;
गंगामाय पावनी आली,
गेली खोपटात र्हाउन !
माह्यारवासनीसारकी
चारी भिताडभर नाचली;
रिकाम्या हातानी जात कशी,
बायकू मातर वाचली !
भित खसली,चूल इझली
व्हतं नव्हतं तेवडं न्हेलं;
परसाद म्हनून पापन्यावर
पानी उलसं ठिवलं !
कारबारनीला घिऊन संगच सर ! आता लडतो हाये;
पडकं भिताड बांध्तो हाये
चिकूल गाळ काडतो हाये!
खिशाकडं हात जाताच
लगीच हासत हासत उटला;
अंहं ! पैका नकू सर,
जरा यक्ट्ंपना वाटला!
मुडून पडला सौंसार तरी बी मोड्ला न्हायी पाटकना;
पाटीवर हात ठिऊन नुस्तं लड म्हना !!!
नुस्तं लड म्हना !!!
🖊 *काकासाहेब वाळुंजकर*
- अहमदनगर
=================
🎯 *कना*
(मराठवाडी बोली अनुवाद)
'वळकलो का सर?' पावसात आला कुनी;
कपडे व्हते भिजलेले,
केसावर पानी।
घटकाबर बसला पुना हासला बोल्ला वर बगून;
'गंगामाय सोयरी आली,
गेली खोपट्यात ऱ्हाऊन।
माहेरवासीण पोरीसारकी चार भितीत नाचली;
रिकाम्या हातानं जाईल कसं,
बायकु तेवढी वाचली।
भित खचली,चूल ईझली, व्हते न्हवते न्हेले;
परसाद म्हून डोळ्यात
पानी जरा ठिवले।
खटल्याला घिऊन संगं,
सर आता लडलालाव;
पडकी भित बांधलालाव,
गाळ चिक्कूल काडलालाव।
खिशाकड हात गेल्यावर हासत हासत उटला;
'पयशे नकु सर,
नक्कर एकाकीपणा वाटला।
मुडून पडला सौंसार पर मुडला नाही कना;
पाटीवर हात ठिवून,
निसतं लड मना' !!
🖊 *डॉ. बालाजी मदन इंगळे*
- उस्मानाबाद
=================
*🎯कना*
(वऱ्हाडी अनुवाद)
'वयखलं का सर मले ?' झळीत आला कोनी,
कपळे चिखलानं भरेल
अन डोक्शावर पानी .
जराभर बसला उलसाक हासला अन बोलला वर पाहून,
'गंगामाय पावनीन आली अन गेली खोप्यात राहून' .
'माहेरवाशीन लेकीसारखी चार भितीत नाचली, रिकाम्या हाती जाईन कशी लक्शीमी तेवळी वाचली .'
'भित पळली, चूल इजली होतंनोतं नेलं ,पर्साद म्हनून पापन्यायवर उलसक पानी ठेवलं .'
'कारभारीनले घिऊन संगं, सर आता लढून रायलो , पळकी भित बांधून रायलो अन चिखोलगाय काळून रायलो .'
खिश्याकळे जानारा हात पाहून हासत हासत उठला, 'पैशे नाई पायजत सर, जरा यकटेपना वाटला .'
'मोळून पळला संसार तरी मोळला नाई कना, पाठीवर हात ठिऊन नुसतं लढ म्हना !'
🖊 *अरविंद शिंगाडे*
- खामगाव
*#जय_वऱ्हाडी*
=================
🎯 *कना*
(लेवा गनबोली अनुवाद)
वयखलं का सर मले
पावसात आला कोनी;
कपळे होते आंबटवले
केसायवर पानी।
घळीभर बसला मंगन हासला
बोल्ला वरहे पाहिसन;
गंगामाय पाहुनी आलती
गेलती घरट्यात राहिसन।
माहेरवाशीन पोरसारकी
चार भीतीत नाचली;
खाली हाती जाईन कशी
बायको मातरं वाचली।
भीत खचली, चूल इझली
होते ना होते गेले;
परसाद म्हनिसन पापन्यायवर
पानी थोडुसं ठेवले।
कारभारनीले घीसन
सर आता लढतोय;
पडकी भीत बांधतोय
गाराबिरा काहाळतोय।
खिशाकळे हात गेला तसा
हासत हासत उठला;
पैसे नि पाहायजे सर
थोडुसा यकटेपना वाटला।
मोळी पडला सौसार तरी
मोळला नि कना;
पाठीवर हात ठिसन
नुस्तंच लढ म्हना।
🖊 *प्रशांत धांडे*
फैजपूर जि. जळगाव
=================
🎯 *कणा*
(आदिवासी तडवी भिल्ल बोली)
वयखला का सर माल ?
बरसातमंझार आला कोणी;
कपळ्या होत्या मैल्या
बालांवर होता पाणी ।
घळीभर बसला मंघून हासला
बोलला वऱ्ह देखीकन;
गंगाबं पाव्हणीण आली
गेली खोपात राहीकन।
माहेरं राहणारी पोरसरखी
चार भितीत नाचली;
मोकी हाती जाईन कशी
बायको मातर वाचली।
भित धसली चुल्हा इंझाला
जी होता नाय होता ती गेला;
शिरणी म्हणीकन पापण्यांवर
पाणी थोळा धरला।
नवरील माही लिकन संगं
सर आता लढ्याला हान;
पळेल भित बांध्याला हान
गारा गाय काहाळ्याला हान।
खिसाकळं हात जाताच
हासत हासत उठला;
पैसं नाय होना सर
थोळा एखलासरखा वाटला।
तुटीकन पळला सौसार
पण मुळला नाय कणा,;
पाठीवर हात धरीकन
फकस्त लढ म्हणा।
🖊 *रमजान गुलाब तडवी*
बोरखेडा खुर्द(यावल)
=================
*🎯 कना*
(अहिराणी रुपांतर)
'वयखं का सर माले?’
पानीमान उना कोनी,
कपडा व्हतात मयकटेल, केसेसवरता पानी।
जरसाक बसना मंग हासना बोलना वऱ्हे देखी :
‘गंगामाय पाव्हनीन उनी,
गयी खोपटामा राही’।
माहेरवाशी पोरना गत
चार भितीस्मा नाचनी;
मोकया हाते जायी कशी,
बायको मातर वाचनी।
भित खसनी, चूल मलायनी, व्हत नव्हतं ली गयी;
परसाद म्हणी पापन्यासवरते,
पानी थोडस ठी गयी।
कारभारीनले लिसन संगे
सर आते लढी रायनु;
पडेल भित बांधी रायनु, चिखुलगारा काढी रायनु।
खिसाकडे हात जाताच हासत हासत उठना;
‘पैसा नकोत सर,
जरसा एखलापना वाटना।
मुडी पडना सौसार तरी मुडना नही कना;
पाठवरते हात ठिसन,
नुस्त लढ म्हना’!
🖊 *नितीन खंडाळे*
- चाळीसगाव
*#जय_अहिराणी*
=================
🎯 *कना*
(बागलाणी अनुवाद)
वळखं का सर माले?
पानी मा वना कोणी;
कपडा व्हतात मळकटेल
आनी केससमा पानी।
घडीभर बसना मजानं हासना
बोलना वर पाह्यी;
गंगा माय पाव्हनी वनी
गयी घरमा ऱ्हायी।
माहेरवाशीन पोरना गत
पुरा घरमा नाचनी;
रिकामा हाते जायी कशी
बायको मात्र वाचनी।
भित खचनी, चूल इझनी
व्हतं नव्हतं घी गयी;
परसाद म्हणीसन पापनी मा
पानी थोडं ठी गयी।
कारभारीनले घीसन संगे
सर, आते लढी राह्यनू;
पडेल भित भांदी राह्यनू
चिखलगाळ काढी राह्यनू।
खिसामा हात जाताच
हसत हसत उठना;
पैसा नको सर,
जरासा एकलपणा वाटना।
मुडी पडना संसार तरी मुडना नही कना;
पाठवर हात ठेवा
आन फक्त 'लढ!' म्हना!
🖊 *वैभव तुपे*
- इगतपुरी
=================
🎯 *कना*
(झाडीबोली अनुवाद)
वळखल्या का सर मालं ? पान्यात आला कोनी;
कपळं होतं भरलेलं,
केसायवर पानी।
घळीभर बसला मंग हासला बोल्ला वरती पावून;
गंगाबाई पावनी आली,
गेली घरट्यात रावून।
माहेरवासीन पोरीघाई
च्यार भितीत नाचली;
खाली हाताना जायेलकसी,
बायको तेवळी वाचली।
भित खसली,चूल विजली,
होता नोहोता नेलन्;
परसाद मनून पापन्यावरत्या पानी थोडसा ठेवलन्।
कारभारनीलं धरून संगा
सर आता लढून रायलू;
पडकी भित बांधून रायलू,
चिखलगाळ काहाळून रायलू।
खिस्याकन् हात जाताच हासत हासत उटला;
"पयसा नोको सर,
जरासा एकलापन वाटला.
मोळून पळलासंसार तरी मोळला नाई कना;
पाटीवर हात ठेवून
फक्त लळ म्हना'!
🖊️ *रणदीप बिसने*
- नागपूर
=================
*🎯कणो*
(मालवणी अनुवाद)
'वळखलात काय सर माका?'
पावसात इल्लो कोणी;
कापडा होती बरबाटलंली टकलेर होता पाणी।
वायच् बसलो मगे हसलो बोललो बगून वरते;
'गंगामाय पावणी इली
घरात र्हवान गेली परते।
म्हायेरवाशणीसारकी चार भिंतीत नाचली;
रिक्यामी हातान जातली कशी,
बायल मात्र वाचली।
भिंत खचली, चूल इझली,
होता नव्हता न्हेल्यान्;
परसादी म्हणान पापणेर पाणी वायच् ठेवल्यान्।
कारभारनीक घेवन् वांगडाक
सर आता लढतंय;
पडलंली भित बांदतंय,
सगळो चिकल काडतंय।
खिशाहार गेलो हात तर
हसत हसत उटलो;
"पैशे नुको सर" वायच् एकटेपणा वाटलो।
मोडान पडलो संसार,
तरी कणो नाय मोडाक;
पाटीवर हात ठेवन् ,
ताकत दिया लडाक!
*🖊मेघना जोशी*
- मालवण
=================
*🎯 कना*
(आगरी भावानुवाद)
‘वलखलांव काय सर मना?’
पावसान आला कोनी,
कपरं व्हतं कलथारलेलं,
केसांवरशी पानी.
शनभर बसला मंग हासला
बोलला वरती बघून
‘गंगामाय पाव्हनी आली,
गेली घरटंन ऱ्हाऊन’
माहेरवाशीन पोरीसारखी
चार भिंतीन नाचली,
मोकले हाती जाईल कशी,
बायको तव्हरी वाचली.
भित खचली, चूल इझली,
व्हता नता न्हेला
परसाद म्हंगून पापन्यांवरती
पानी थोरा ठेवला
कारभारनीला घेउन बरंबं
सर आथा लढतंय
परलेली भित भांदतंय
चिखलगाल काऱ्हतंय
खिसंकरं हात जाताच
हासत हासत उठला
‘पैशे नको सर,
जरा यकटंपणा वाटला.
‘मोरून परलाय संसार
तरी मोरला नाय कना
पाठनीवरती हात ठेउन,
निसता लढ म्हना’!
🖊 *तुषार म्हात्रे*
- उरण (रायगड)
=================
🎯 *कणो*
(परदेशी भाषेत अनुवाद )
ओळख्यो की सर म्हकू
आयोकोई भर पाणीम;
कपडा हा वल्लागच
बाळं प भी पाणी।
थोडो बठ्यो फिर हास्यो
बोल्यो उप्पर देखकन;
"गंगामाई पाव्हणी आयी
गई घरटाम ऱ्हयकन।
माहेरवाशी पोरीसरखी
चारो भीता नाची;
रिकामा हातस जायंगी कशी
फक्त बायको बची।
भित खची, चुल्हो बुझ्यो
हो जे जे ल्हे गयी;
प्रसाद थोडो पापण्यांम्ह
पाणी थोडो रख गयी।
कारभारणीकू संग ल्हेकन
सर आब लढरं है;
पडकी भीता भांदबुंदकन
वल्लो गारो काढरं है।
खिसाम हात जाताच
हासत हासत उठ्यो;
पैसा बियसा नको सर
जरा एकठोपण वाट्यो।
तूट गयो संसार तरी
तुट्यो नही कणो;
पीठ फक्त हात रखकण
फ़क्त लढो कहो।
*🖊विजयसिंग राजपूत*
- पाचोरा
=================
*🎯 कड*
(गोरबोलीतील अनुवाद)
‘ओळखो कांयी सर मन?’ पडते पाणीम आयोतो कोयी;
कपडा हेते गाळेमवलाये हे लटापर हेतो पाणी।
थोडसेक बेठो पच हासो बोलो उपर देकन;
‘गंगायाडी पामणी आयी, चलेगी घरेम रेनं’।
मायरेन आयीही छोरीसरीखी
चार भितेम नाचगी;
छडे हातेर जायं कुकरेन,
तांडरी मातर बचगी ।
भित धसगी, चूलो वलागो, हेतो न हेतो जे लेगी;
प्रसाद करन पापणी मायी पाणी थोडसेक मेलगी।
गोण्णीनं सोबत लेन
सर आबं लढरो छू;
पडीही भित बांदरोछू , सारीगाळ काढरो छू।
खिचासामू हात जातूच हासतो हासतो उठगो;
‘पिसा न हेणू सर,
जरसेक एकलोच छू हानू वाटगो।
तुटन पडगो संसार तरी
तुटी कोनी कड;
पुठेपरती हात मेलन,
फक्ती केदं लड' !
🖊 *एकनाथ गोफणे*
- चाळीसगाव
=================
🎯 *कनो*
(पोवारी बोली अनुवाद)
ओळख्यात् का सर मोला ?" बरसात मां आयेव् कोनी;
कपडा होता पुरा माख्या,
केसपरा होतो पानी...!
सुटीकच बसेव् मंग हसेव् बोलेव् वरती पाह्यकन्;
'गंगामाई पाव्हनी आयी,
गयी घरटा मा रह्यकन् ।
माहेरवासीन् टुरीसरिखी च्यार् भितमा नची;
खाली हात् जाये कसी,
हं घरवाली वु बची ।
भित खसी,चुल विझी,
होतो नोहोतो नेईस;
परसाद मुहून पापणीपरा पानी थोडसो ठेईस ।
कारभारीनला लेयकन् संगमां
सर आब् मी लढ् रही सेव;
पडकी भित बांध रही सेव्,
चिखलगाळ काढ रही सेव।
खिसाकन हात जाताच हसत हसत उठेव;
'पैसा नही पाह्यजे सर,
जरा एकलोपन लगेव।
मोड पडेव संसार तरी
मोडेव नही कनो;
पाठपरा हात ठेयकन्
फक्त लढ कवो ।
🖊️ *रणदीप बिसने*
नागपूर
=================
0 Comments