Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासन निर्णय - राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यास कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान / सेवा उपदान मंजूर करणेबाबत

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत शासन निर्णय आज 31 मार्च 2023 रोजी जाहीर. 

१. वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ३१.१०.२००५ व दिनांक २७.०८.२०१४ अन्वये दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत.

२. तद्नंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्र.७ येथील Central Civil Services (Implementation of National Pension System) Rules, २०२१ दिनांक ३०.०३.२०२१ अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तिवेतन अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचान्यास रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय केले.

तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्र.८ येथील Central Civil Services (Payment of Gratuity under National Pension System) Rules, २०२१ दिनांक २३.०९.२०२१ अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान अनुज्ञेय केले आहे. 

3. केंद्र शासनाच्या वरील निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2023 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here


शासन निर्णय :-

शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा 

(अ) सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान, 

(ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.

(क) तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे. 

वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवा उपदान व मृत्यु उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यःस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतूदी लागू राहतील.


२. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४, दि. २९.०९.२०१८ अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात येत आहे. सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नये तसेच प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावीत.


३. दिनांक ०१.११.२००५ ते या निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तिवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना- ३ मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागेल, त्यानुसार कुटुंब निवृत्तिवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल, सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तिवेतन अनुज्ञेय राहील.

४ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे शासकीय सेवेत नियुक्त होणारा कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तिवेतन लेखा क्रमांक (PRAN) मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तिवेतन निधी विनियमक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा सोबतचा नमुना-२ मध्ये विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा.


५. जे शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा विकल्प सादर करतील. त्यांनी नमुना-१ प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे.

६. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत वरील परिच्छेद क्र.४ प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील. तसेच यापुढे शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यानी उपरोक्तप्रमाणे विकल्प शासन सेवेत नियुक्त झाल्यावर ८ दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील.

७. शासन असाही आदेश देत आहे की, जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारांसह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी.

८. या अनुषंगाने कार्यपध्दतीबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०४०३१३३३३३०७०५ असा आहे.

शासन निर्णय (वित्त विभाग) 03 मार्च 2023 - राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यास कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान / सेवा उपदान मंजूर करणेबाबत चा शासन निर्णय डाउनलोड करा. - Click Here


शासन निर्णय (शालेय शिक्षण विभाग) 16 जून 2023 - राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यास कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान / सेवा उपदान मंजूर करणेबाबत चा शासन निर्णय डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close