Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यात आता 'क्लस्टर शाळा / समूह शाळा' | 20 पटापेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळांत राबविणार प्रयोग ?

राज्यात आता क्लस्टर शाळा विकसित केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या असणाऱ्या सुमारे साडेचार हजारांहून अधिक शाळा त्यासाठी विचारात घेण्यात येणार आहेत.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत नुकत्याच ॲम्बी व्हॅली येथे झालेल्या कार्यशाळेत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी हा विषय चर्चेला आणला. राज्यभरात २० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळा आहेत, त्या शाळांमध्ये 29 हजार 707 शिक्षक आहेत, तर सुमारे 1लाख 85 हजार 467 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्या प्रत्येकाला शिक्षण ही सरकारची जबाबदारी असली, तरी कमी पटसंख्येमुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात अडचणी येतात, अशी शिक्षण विभागाची धारणा आहे. 


त्यामुळे या विद्यार्थ्यांना जास्त विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांमध्ये आणावे, अशी चर्चा या कार्यशाळेत झाली. पुणे जिल्ह्यात पानशेतजवळ तसेच नंदुरबार येथील तोरणमाळ येथे असा पथदर्शी प्रयोग केला असून, तो यशस्वी झाला आहे. आता राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने विचार सुरू केला आहे. 


क्लस्टर शाळा / समूह शाळा म्हणजे काय? 

अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी एक शाळा म्हणजे 'क्लस्टर शाळा' / 'समूह शाळा'. कमी पटसंख्येच्या शाळा असलेल्या भागातील काही अंतरावरील एक मध्यवर्ती शाळा निवडून त्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात.


त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून या शाळेत यावे लागते. क्लस्टर शाळेपर्यंत पोचविण्यात विद्यार्थ्यांना येण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांचा प्रवास खर्च सरकारतर्फे करण्याच्या पर्यायाचा विचारही केला जात आहे. या प्रक्रियेत कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यांचे क्लस्टर शाळेत किंवा अन्य ठिकाणच्या शाळेत समायोजन करावे, असा पर्याय यावेळी निश्‍चित करण्यात आला. 


सर्व शाळांमध्ये एकच गणवेश

खासगी शाळांप्रमाणे काही जिल्हा परिषद शाळा आणि अनुदानित शाळांनी त्यांच्या गणवेषाचे रंग बदलले आहेत. यातून शाळेचे वेगळेपण दिसण्यापेक्षा मुलांमध्ये उचनिचतेची भावना निर्माण होते, यावर कार्यशाळेत चर्चा झाली.

त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच प्रकारचा गणवेश करण्याविषयी अधिकाऱ्यांनी मते मांडली. सर्व शाळांमध्ये मुलांसाठी खाकी पँट, पांढरा शर्ट आणि मुलींसाठी निळा-पांढरा ड्रेस असा हा गणवेष करण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकास साधण्यावर भर

शिक्षणाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास, समाजात मिसळण्याची वृत्ती, सामाजिक भान, खिलाडूवृत्ती आणि परस्परांना समजून घेण्याची कला देखील विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. परंतु एक दोन, किंवा पाच-दहा पटसंख्येच्या शाळांच्या माध्यमातून ही उद्दिष्टे साध्य करणे कठीण असते. 

अनेक खेळ आणि क्रीडा विषयक संधी त्यांना उपलब्ध होत नाहीत. म्हणून राज्यात 'क्लस्टर' शाळांचा प्रयोग राबविण्याचा विचार करीत आहोत. तसेच विद्यार्थ्यांना एकाच रंगाचे चांगल्या गुणवत्तेचे गणवेश देण्यावर भर दिला जाणार आहे.


- सूरज मांढरे (शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य)


समूह शाळा / क्लस्टर शाळा विकसीत करणेबाबत शिक्षण आयुक्त यांचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close