'जागतिक जल दिन' हा एक आंतरराष्टीय दिवस आहे. प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ (UNO) च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे.
जागतिक जल दिन थीम
प्रत्येक वर्षी एक विषय अथवा थिम घेतली जाते. 2025 च्या जागतिक जल दिनाची थीम “हिमनदी संवर्धन” आहे, जगातील हिमनद्यांचे संरक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करण्यासाठी या थिमची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण पृथ्वीचे जलचक्र राखण्यात हिमनद्यांची भूमिका महत्त्वाची असते.
यावर्षी जागतिक जल दिवस साजरा करताना हाच संदेश दिला जात आहे की ,
१. जागतिक तामानवाढीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
२. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे.
३. पाण्याचे सर्व स्त्रोत्र, नद्या, तलाव वगैरे प्रदूषणमुक्त करून पाण्याची उपलब्धता वाढवणे गरजेचे आहे.
४.भूजल भरणी करून भूजलाची पातळी वाढवायला हवी.
५. शेती व उद्योग क्षेत्रात पाण्याचा कमी वापर करून उत्पादन वाढवता येईल अशा तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.
६. जनतेने पाण्याची नासाडी कमी करून आपल्या पाण्याची उपलब्धता वाढवणे महत्त्वाचे ठरेल.
पाण्याशी संबंधित प्रश्न कोणते ?
पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?
पावसाच्या पध्दतीत होणार्या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?
भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?
नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?
तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल?
पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल?
पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल?
पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल?
पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल?
पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?
आपली भूमिका काय ?
स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे.
पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे.



0 Comments