प्रशासनात आता AIचा वापर | 'एआय' टेक्नॉलॉजीचा वापर करून जिल्ह्यातील नागरिकांशी आता फोन संपर्क साधण्यात येत आहे. शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाविषयी चौकशी करून त्यांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्या विभागासंदर्भात किंवा ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांच्या जास्त तक्रारी असतील, तर आता जिल्हा परिषद थेट कारवाई करणार असल्याची माहिती सीईओ कुलदीप जंगम यांनी दिली.
दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कॉलिंग सेंटरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना फोन करून त्यांच्याकडून शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांच्या विभागाकडे तक्रारी असतील, तर त्याच्या डॅशबोर्डवर नोंदी घेतल्या जात आहेत व त्या नोंदीच्या आधारे संबंधित तालुकाप्रमुख व विभागप्रमुख त्यांच्या तक्रारीचे निवारण आठ दिवसांत करतील. यातून संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजना व प्रशासकीय कामकाजाचा लाभ गतिमान पद्धतीने मिळण्यास मदत होणार असल्याचेही सीईओ जंगम यांनी सांगितले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित उड्डाण २०२५ अंतर्गत प्रशासनात एआय वापर उद्घाटन, तसेच प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेत झाला. यावेळी सीईओ कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मार्केटिक्स कंपनीचे संचालक मोहित कोकीळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रसाद मिरकले यांनी केले, तर आभार कादर शेख यांनी मानले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे शेकडो अधिकारी, कर्मचारी यांना एआय तंत्रज्ञानाविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले.
कशी चालणार एआय यंत्रणा
जिल्ह्यात पुरवठा, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास विभाग या विभागांचे लाभार्थी अधिक असल्याने एआय कॉलिंग सेंटरसाठी त्यांचा प्राधान्याने विचार केला आहे. एआयवरून नागरिकांना कॉल केला जाणार असून त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल, तक्रारीबद्दलची माहिती संकलित करून संबंधित तालुकाप्रमुख अथवा विभागप्रमुख पहिल्या आठवड्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करतील तर प्रत्येक महिन्याला जिल्हा परिषदेचे सीईओ व जिल्हाधिकारी स्वतः तक्रारीच्या अनुषंगाने आढावा घेऊन त्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.
प्रत्येकाला स्वतंत्र आयडी नंबर...
लाभार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डॅशबोर्डवर मराठी व इंग्रजीमध्ये नोंदी घेतल्या जातात. प्रत्येक तालुका कार्यालय व जिल्हा कार्यालयांना लॉगिन आयडी उपलब्ध करून दिला जातो. तो ओपन केल्यानंतर संबंधित विभागाच्या सकारात्मक तसेच नकारात्मक बाबी डॅशबोर्डवर संबंधितांना दिसतात व त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
0 Comments