पदभरती जलद गतीने व्हावी यासाठी बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत सूचना शासन निर्णय
राज्यातील विविध संवर्गाच्या बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव मागासवर्ग कक्षास प्राप्त होत असतात. मात्र, बऱ्याच प्रस्तावांसह सादर करण्यात येत असलेल्या बिंदूनामावल्यांमध्ये नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून अचूक नोंदी घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या बिंदूनामावल्यांच्या तपासणीमध्ये मागासवर्ग कक्षाकडून त्रुटी उपस्थित होतात. प्रस्तावातील माहिती अचूक नसल्याच्या कारणास्तव बिंदूनामावली तपासणीमध्ये आणि नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून त्रुटीपूर्तता करण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे प्रस्तावांची परिपूर्ण तपासणी करण्यास विलंब होतो. परिणामी, मागासवर्ग कक्षाकडून बिंदूनामावली तपासणीस उशीर होतो असा समज होतो. सबब बिंदूनामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावी या दृष्टीने शासन खालीलप्रमाणे सूचना देत आहे.
पदभरती जलद गतीने व्हावी यासाठी बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत सूचना
१. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २९/०३/१९९७ व दि. १८/१०/१९९७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळसेवा व पदोन्नतीची बिंदूनामावली ठेवण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तद्नंतर सद्यःस्थितीत सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २७/०२/२०२४ व दि.६/०३/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळसेवेसाठी बिंदूनामावली ठेवण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
२. त्यानुसार सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारितील संवर्गनिहाय बिंदूनामावल्या तयार करणे व त्या बिंदूनामावल्यांची सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक दि. ५/११/२००९ मधील तरतूदींनुसार मागासवर्ग कक्षाकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
३. सामान्य प्रशासन विभाग, शासन पत्र दि. २२/०७/२०१६ अन्वये बिंदूनामावलीचा नमुना निश्चित करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांनी विहीत नमुन्यात बिंदूनामावली तयार करून संबंधित रकान्यांमध्ये उचित नोंदी घेणे आवश्यक आहे.
४. प्रत्येक संवर्गाची बिंदूनामावली तयार करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याची राहिल. नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी (MAKER) यांचेकडून संबंधित कागदपत्रांच्या आधारे अचूक बिंदूनामावली तयार करून घ्यावी. तयार केलेल्या विविध संवर्गाच्या बिंदूनामावल्या नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील इतर अधिकारी (CHECKER) यांना तपासणीसाठी वाटून द्याव्यात. तपासणीअंती सदर अधिकाऱ्यांनी बिंदुनामावलीच्या शेवटी "बिंदू नामावली मधील सर्व नोंदी, नियुक्ती पत्र, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र इ. कागदपत्रांवरून तपासल्या असून त्या नोंदी बरोबर आहेत." असे प्रमाणित करून त्याखाली त्यांचे नाव लिहून स्वाक्षरी करावी. बिंदूनामावलीतील नोंदींमध्ये काही चुका आढळल्यास संबंधित तपासणी अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी.
५. अधिकाऱ्यांकडून बिंदूनामावली तपासणी केल्यानंतर प्रत्येक संवर्गातील किमान एक दोन कर्मचाऱ्यांच्या नोंदींची तपासणी नियुक्ती प्राधिकारी यांनी करून बिंदूनामावल्यांतील नोंदी अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर सदर बिंदूनामावल्या तपासणीसाठी संबंधित मागासवर्ग कक्षाकडे पाठवाव्यात.
६. उमेदवाराची ज्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे त्या प्रवर्गाच्या बिंदूवर त्याचा बिंदुनामावलीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. तसेच, मागासवर्गीय उमेदवाराचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र याचा क्रमांक व दिनांक याची अचूक नोंद बिंदूनामावलीमध्ये घेणे आवश्यक आहे. यामध्ये काही चुका झाल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल.
७. बिंदूनामावलीमध्ये चूकीच्या नोंदी घेतल्या गेल्यास, आरक्षण निश्चिती अचूक होणार नाही आणि त्यामुळे आरक्षण कायद्याचा भंग होईल. तसेच, बिंदूनामावलीवर आक्षेपही उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे यापुढे बिंदूनामावलीमध्ये अचूक नोंदी घेऊन व बिंदूनामावली प्रमाणित करूनच त्या तपासणीसाठी मागासवर्ग कक्षास सादर करण्यात येतील याची नियुक्ती प्राधिकारी यांनी दक्षता घ्यावी. यानुसार कार्यवाही न केल्यास बिंदूनामावलीतील चुकीच्या नोंदी व त्यानुषंगाने उपस्थित होणाऱ्या बाबी/न्यायालयीन प्रकरणे याकरिता नियुक्ती प्राधिकारी पूर्णतः जबाबदार राहतील.
८. वरील कार्यपध्दतीप्रमाणे कार्यवाही झाल्यास मागासवर्गकक्षास बिंदूनामावलीची तपासणी व आरक्षणनिश्चिती करणे सुलभ होऊन तपासणीसाठी होणारा विलंब टाळता येईल.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२५१२०४१६२९४९६५०७ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
बिंदूनामावलीची तपासणी व आरक्षणनिश्चिती बाबत सूचना शासन निर्णय - डाउनलोड करा. Click Here



0 Comments