एरव्ही अन्याय हा अडगळीचा शब्द रोजचा ऐकतो आहे मी. आतातर अन्याय हा शूद्र शब्द ऐकला की हसू येतं मला. अन्याय अन्याय म्हणून कांगावा करणाऱ्या व्यक्ती अन्यायाच्या परिमार्जनासाठी प्रतिकारच करत नसतील तर हा असा अन्याय व्हायचाच हो. आम्ही लढणे विसरलो; म्हणूनच रडतो आहोत रात्रंदिन. त्यात क्रान्तीचा इतिहास शिकवणारा शिक्षकच कर्मदारिद्री होवून निर्णायक क्षणी पळपुट्टेपणा करीत असेल तर....
आजचा संप म्हणजे संधी होती आमच्या असंतोषाला व्यक्त करण्याची. तीही आम्ही दवडली. का? कारण क्रान्तीची धमक नाही? फुकटात खायची सवय असल्याने ताटात पडलेलं सारंच चघळत बसून दिवस काढण्याची निर्लज्ज वृत्ती. शिवाय काहींची तर एवढी विलक्षण बुद्धी आहे, की लढणाऱ्यांना भेटलं की आम्हालाही भेटलेच, अशाही गप्पा सार्वजनिक ठिकांनी मोठ्या अविर्भावाने सांगत सुटतात ते. स्वतःला वेगळे भासवण्याच्या अट्टाहासात आम्ही आमच्याच स्वकीयांशी गद्दारी करतो, याचीही जाणीव नाही.
राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनांची आंदोलने किमान माझ्यासाठी तरी नवलाईची बाब नाही. माझ्या बारा वर्षाच्या सेवेत त्यांची नऊ आंदोलने जवळून पाहिलो आहे मी. तरीही हे आंदोलन मात्र ऐतिहासिकच. राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवून; प्रत्यक्ष सहभागाची भूमिका घेवून आक्रमक झालेल्या शिक्षकांच्या संघटना पहिल्यांदाच पाहतो आहे मी महाराष्ट्रात. १७ लाख कर्मचारी संपात सहभागी होत असताना शिक्षकांच्या नाममात्र संघटनांनी घाबरायची आवश्यकता नव्हतीच. किमान शिक्षकांनी तरी स्वतःला वेगळे भासवू पाहणाऱ्या ह्या संघटनांची निष्ठा लाथाडून संपात सहभागी होण्याचे पुण्यकर्म करणे गरजेचे होतेच होते. संघटनांच्या समस्या नसतात हो कधी. त्यांच्यात असते केवळ राजकारण. समस्या शिक्षकांच्या असतात. किमान स्वतःच्या समस्यांना प्रमाणित करून स्व न्यायासाठी आक्रोश करण्याची सहज वृत्ती आम्ही मात्र आजही स्विकारू शकलो नाही. माझं युद्ध मलाच लढायचं आहे; हे अंतिम सत्य आहे. मनातल्या साऱ्या गंडांना ( शंकांना ) दूर सारून न्यायाच्या ह्या युद्धात सहभागी होण्याची सहज कृती स्विकारणे किमान ह्यावेळी तरी गरजेचे आहे.
मुळात आम्ही घाबरतो तरी का? आणि कशासाठी? ह्याच महाराष्ट्राच्या भूमित कोण्या एका क्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी सतत सहा महिने कामबंद आंदोलन केले आहे. अंगणवाडी सेविकांनी सुद्धा आपल्या कर्तव्याला गुंडाळून मुंबई गाजवली आहे. अत्यल्प मानधनावर जगणाऱ्या बायांचा एवढा अखंड आशावाद आमच्यात का नाही? शिवाय वरच्या दोनही आंदोलनात सहभागी आंदोलकांवर कारवाई करण्याचे धाडस शासन करू शकला नाही. सहा महिन्यांच्या कामबंद आंदोलनात किमान एका दिवसाचे वेतनही थांबवता आले नव्हते शासनाला. किरकोळ संख्या असलेल्या कर्मचारी आंदोलन जिंकण्याचे एवढे धाडस करू शकतो; तर आम्ही का नाही? आमच्या आत्मविश्वासाला कोणत्या भुताने ( भयाने ) ग्रासलं?
_बळेच हा पुरुषार्थ माझा_
_राक्षसांनी रौदला_
_बाईलीचे सोंग माझे_
_बाईलीचे पिंड आहे._
आज ह्या ओळींचा प्रत्यय आलाच आला. कारवाईच्या भयाने आंदोलनात सहभागी नसलेल्या तमाम कर्मचाऱ्यांना संपकरी बायांनी बांगड्यांची भेट दिली. वाचताना आश्चर्य वाटलं. पण स्वताच्या क्षमतांना ओळखू न शकल्याने, आत्मविश्वास हरवलेल्या माणसांना ही भेट समर्पकच म्हणावी लागेल. आंदोलनात/ संपात सहभागी होवून तमाम राज्यकर्मचाऱ्यांच्या उत्थाणासाठी हा सामूहिक संघर्ष लढणे गरजेचे आहेच आहे. किमान ह्या वेळी सामूहिक न्यायाला प्रमाणित न करता स्व न्यायासाठी तरी कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होणे ही अनिवार्य बाब आहे.
काहींनी तर शुद्ध नालायकपणा चालवलाय नुसता. संपात सहभाग नाहीच नाही; पण संपात सहभागी न होण्याचे आवाहनही करतांना पाहिलं आहे मी त्या ठगांना. अशा नालायकांनी सामान्य समूहाचे नेतृत्व करण्यापेक्षा राज्यकर्त्यांचे पाय चाटण्याचा नविन उद्योग सुरु करायला हवा. किमान त्याला स्वामिनिष्ठा तरी म्हणू आम्ही. स्वताला वेगळे भासवण्याच्या नादात अशी डुकरागत एकाट कृती ही माणसं करूच कशी शकतात?
वेळ आहे अजूनही. अन्यायाच्या परिमार्जनासाठी सामूहिक प्रतिकाराची संधी उपलब्ध आहे अजूनही. ह्या दोन दिवसाच्या सामूहिक लढ्यात सहभागी होण्याचे पुण्यकर्म करावेच सर्वांनी. ह्या ऐतिहासिक लढ्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व्हावेच सर्वांनी. ह्या लढ्यातून खूप काही मिळेल असा पोकळ आशावाद दाखविणाऱ्यापैकी मी नाही. पण आम्हाला गृहीत धरून अखंड शोषण करणाऱ्या मस्तवाल शासनाचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी संपाची ही सामूहिक आणि एकीकृत कृती सर्वांकडून सहजतेने होणे ही गरज आहे काळाची.
आमचं अतिरेकी सहन करणं, हेच आमच्यावर होणाऱ्या अन्यायाचे एकमेव कारण आहे. बघा, विचार करा..!
आपलाच
आपल्यातलाच
एक सामान्य शिक्षक


0 Comments