Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत स्थलांतर नको... नवी मुंबई विमानतळाच्या कामामुळे शाळा स्थलांतरित...

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
नवी मुंबई विमानतळाच्या कामामुळे स्थलांतरित होणाऱ्या गावांत सुरू असलेले जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्थलांतर शैक्षणिक वर्ष संपेपर्यत करू नये, तसे करण्याचे आदेशही देऊ नयेत, अशी मागणी बुधवारी चार गाव ग्रामस्थांनी पनवेल पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. शाळांच्या स्थलांतरणाच्या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी एक बैठक सिडकोने उभारलेल्या नवीन शाळा इमारतीमध्ये पार पडली. त्यावेळी ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे दहा गावे विस्थापित होत आहेत. मात्र पुनर्वसनाबाबतचे प्रश्न न सोडविल्यामुळे उलवे, तरघर, कोंबडभुजे आणि गणेशपुरी या गावातील ग्रामस्थ स्थलांतरणाला अजून तयार झालेले नाहीत. त्यामुळे गावातील शाळाही जिल्हा परिषदेने स्थलांतरित करू नयेत. गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणत्याही प्रकारचे आदेशही देऊ नयेत, असे स्पष्ट सांगितले आणि या संदर्भातील मागण्याही त्यांच्या समोर मांडल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावनिहाय शाळेसाठी भूखंड देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार सिडकोने त्या शाळांच्या जागांचा ताबाही गावकीकडे द्यावा आणि तसा करारनामा करावा शिवाय शाळा बांधण्यासाठीही आर्थिक सहाय्य आणि निधी उपलब्ध करून द्यावा, अंगणवाड्यांचे भूखंड इरादित करून अंगणवाड्या बांधून द्याव्यात, उलवे नोड पुष्पक नगरमध्ये बांधण्यात आलेल्या शाळा इमारतीचे काम सुरक्षित करून द्यावे आणि या शाळेमध्ये पहिल्यांदा सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शाळेमध्ये सुरक्षा रक्षक नेमावा, विद्यार्थी वाहतूक करणारी बससेवा चार किमीपर्यंत, नवीन शाळा बांधकाम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवावी. शाळा इमारतींचा ताबा सिडकोकडे न ठेवता तो जिल्हा परिषदेकडे देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
नवीन इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे फर्निचर नाही. त्यामुळे टेबल, खुर्च्या, कपाटे या गरजेच्या वस्तू उपलब्ध करू द्याव्यात. कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन, अन्न शिजवण्याचे साहित्य, मुलांच्या जेवणासाठी व्यवस्था, हात धुण्यासाठी बेसिन आदी व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सिडकोकडे पंचायत समिती आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी या मागण्या लावून धराव्यात, अशी मागणी केली आहे. या मागण्या मान्य झाल्यास शाळा स्थलांतर करण्यास आमची काही हरकत असणार नाही, असे चार गाव ग्रामस्थ समितीने स्पष्ट केले आहे. या मागण्यांचा साविस्तर विचार केला जाईल, असे आश्वासन यावेळी ग्रामस्थांना देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

close