Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

धर्मनिरपेक्षतेची मूल्ये रुजवणारी जिजाऊ

धर्मनिरपेक्षतेची मूल्ये रुजवणारी जिजाऊ

सोळाव्या शतकात स्त्री चूल आणि मूल यामध्ये मर्यादित असताना विदर्भातील एका महिलेने एक असामान्य कर्तृत्व सिद्ध केलं. या थोर महिला म्हणजेच राजमाता जिजाऊ !


     रयतेला वाऱ्यावर सोडून वतनावर प्रेम करणाऱ्या शासन व्यवस्थेला छेद देत सर्वसामान्य, अठरागड बारा बलुतेदारांना न्याय देणारी, महिलांना सन्मान देणारी आणि सामान्यांना आपलीशी वाटणारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प शहाजीराजे व जिजाऊ या दाम्पत्याने केला. थोरले पुत्र संभाजी यास बेंगळूरु, दुसरे पुत्र शिवाजी यास पुणे आणि व्यंकोजीस तंजावर अशा ठिकाणी कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य उभयतांनी केले.
      बाल शिवबास पुणे जहागिरीत पाठवत असताना मातब्बर सरदार, पायदळ, घोडे, हत्ती, खजिना आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना देणारी राजमुद्रा जिजाऊंकडे शहाजीराजांनी सुपूर्द केली.
     पुणे गांव आदिलशाही सरदारने बेचिराख केले होते. पुण्याची अवस्था बेसूर झाली होती. फुटक्या कवड्यांची माळ, तुटकी चप्पल व मोडकी लोखंडी पार पुण्याच्या भूमित जगदेव यांनी रोवली होती. या धार्मिक दहशतीमुळे पुणे ओस पडले होते.
        जिजाऊंनी बाल शिवबास घेऊन ही पार व धार्मिक दहशतवाद उलथून टाकला. सोन्याच्या फाळाचा नांगर या भूमीत फिरवून स्वराज्याची मशागत केली. मावळ भागातील सर्वसामान्य मावळ्यांना एकत्र करून पुणे नव्यानं वसवलं.
       स्वराज्यात स्त्रियांचा व शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची शिकवण आपल्या मावळ्यांना दिली. मोहिमेत असताना कुठल्याही धार्मिक स्थळांना उपद्रव होणार नाही, असाही संदेश दिला. कारवाईत जर कुराणाची प्रत सापडल्यास  ती सन्मानाने आपल्या मुस्लिम शिपायाकडे सुपूर्द करण्याची सक्त ताकिद होती. ही धर्मनिरपेक्षतेची शिकवण शिवबासह सर्व मावळ्यात रुजविणारी जिजाऊ या राष्ट्रमाता ठरल्या.
       स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार केले, तेव्हा त्याच्या मृतदेहाची अवहेलना होऊ न देता त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे दफन करण्यास सांगणाऱ्या जिजाऊ या अनाकलनिय होत्या.
      त्यांच्या या माणुसकीच्या शिकवणीमुळेच स्वराज्यात नूरखान बेगम, शमा खान, दौलतखान, मदारी मेहतर, काझी हैदर, दर्या सारंग, इब्राहिम खान या सारखे अनेक मातब्बर विश्वासू मुस्लिम सरदार स्वराज्यात होते. या माऊलीने घडविलेल्या शिवाजी व संभाजी या दोन छत्रपतीमध्ये धर्म निरपेक्षतेची मूल्ये खोलवर रुजली होती.
      स्वराज्य हे लोककल्याणावर आधारीत असावं व रयत सुखी आणि संपन्न असावी हेच ध्येय जिजाऊंचं होतं. ते प्रत्यक्षात आणताना स्वकीय जरी विरोधात उभारला तर त्याची गय करायची नाही, ही शिकवण जिजाऊंची होती. आज या रयतेच्या मातेची जयंती, त्यांना त्रिवार अभिवादन !

Post a Comment

0 Comments

close