Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरोग्यमंत्र: रक्तदाब कमी करण्यासाठी हे करा...

डॉ. अभय विसपुते, फिजिशिअन
रक्तदाब कमी करण्यासाठी आपल्या आहारासह जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे.
मिठाचा उपयोग कमी प्रमाणात करावा- मिठाचा अतिरेक टाळावा. बऱ्याच लोकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय अतिरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फार धोकादायक आहे. दररोज जेवणात फक्त तीन ते पाच ग्रॅम मिठाचाच वापर करावा. लिंबाचा रस, मिरे, मोहरी, जिरे या पदार्थाचे सेवन केल्यास मिठाची उणीव भासणार नाही.
धूम्रपान आणि तंबाखूसेवन टाळा- अतिरक्तदाबाचे हृदयावर होणारे दुष्परिणाम हे धूम्रपानामुळे वाढतात. ते लवकर व अधिक प्रमाणात होतात. धूम्रपान करणाऱ्या रुग्णांना औषधांचासुद्धा जास्त डोस (मात्रा) लागतो. त्यामुळे धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे.
वजन कमी करणे- वजन कमी केल्याने थोड्या फार प्रमाणात रक्तदाब कमी होतो. अतिरिक्त वजन म्हणजे हृदयाला अतिरिक्त काम करावे लागते. चरबीच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. हा अतिरिक्त बोजा हृदयाला हानिकारक होऊ शकतो.
स्थूल व्यक्तींच्या रक्तामध्ये कॉलेस्टेरॉलचे (रक्तातील चरबी) प्रमाण जास्त असते. ते रक्तवाहिन्यांत जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व टणक बनतात. तसेच त्यांचा लवचिकपणा कमी होतो. या कारणांमुळे हृदयविकार व अतिरक्तदाब होतो. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, भाज्यांची कोशिंबीर, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, कच्च्या भाज्यांची सलाड भरपूर प्रमाणात खावीत. ताजी फळे खावीत. भात, वरण, भाजी, पोळ्या असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा.
पोळ्यांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे.
दुधाचा, मलईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी व इतर उत्तेजक टाळावे.
केक, आइस्क्रीम, चॉकलेट, मिठाई, जॅम, बटर, चीज, सुकामेवा, दारू टाळावी.
मांसाहार कमीत कमी करावा.
जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.
कॅल्शियम व पोटॅशियम क्षार यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.
व्यायाम आवश्यक
वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत व्यायाम- योगासने करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरोबिक्स, धावणे हे व्यायामप्रकार अतिरक्तदाबाच्या व्यक्तीला अत्यंत फायदेशीर आहेत. मात्र अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी वजन उचलणे, दंडबैठका, सूर्यनमस्कार यांसारखे व्यायाम करू नयेत.

Post a Comment

0 Comments

close