Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

यंदा २७ पॉलिटेक्निक बंद होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील व्यावसायिक शिक्षणाला लागलेली घरघर कायम असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील २७ पॉलिटेक्निक बंद होणार आहेत. विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंग पदविकेच्या शिक्षणाला गेल्या वर्षी अत्यल्प प्रतिसाद दिल्याने, शैक्षणिक संस्थांनी पॉलिटेक्निक बंद करण्याचे प्रस्ताव तंत्रशिक्षण संचालनालयाला पाठविले आहेत. दरम्यान, राज्यात दहावीनंतर इंजिनीअरिंग पदविका प्रवेशासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत सुमारे ५६ टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या.
राज्यात इंजिनीअरिंगचे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद सातत्याने अल्पच आहे. त्यामुळे अनेक इंजिनीअरिंग कॉलेजांना त्यांच्या इंजिनीअरिंगच्या विद्याशाखा बंद कराव्या लागल्या, तर काही शैक्षणिक संस्थांनी कॉलेजच बंद केले आहे. ही परिस्थिती ताजी असतानाच शैक्षणिक संस्थांनी पॉलिटेक्निक बंद करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. पॉलिटेक्निक बंद करण्यासाठी आवश्यक असणारे ना-हरकरत प्रमाणपत्र मिळण्याच्या अंतिम टप्प्यात संस्था आहेत. बंद होणारे पॉलिटेक्निक पुणे, यवतमाळ, परभणी, लातूर, नांदेड, रायगड, मुंबई, वर्धा, नागपूर, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आदी जिल्ह्यातील आहेत. चालू २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक प्रवेशाची क्षमता एक लाख ३४ हजार ८४९ एवढी होती. या प्रवेश प्रक्रियेसाठी ५७ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामुळे ७७ हजार १०१ एवढ्या जागा सुरुवातीला रिक्त होत्या. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे ५३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे एकूण प्रवेश क्षमतेच्या ५६ टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या. येत्या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त जागांची संख्या कमी व्हावी म्हणून शैक्षणिक संस्थांनी कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
.....
तंत्रशिक्षणाची गुणवत्ता महत्त्वाची
शैक्षणिक संस्थांनी दिलेल्या प्रस्तावानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) पॉलिटेक्निक बंद करण्याची कार्यवाही करतात. राज्यात गुणवत्तापूर्ण आणि अद्ययावत शिक्षण देण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या खासगी अनुदानित पॉलिटेक्निक कॉलेज यापुढे तंत्रशिक्षणात टिकून राहणार आहेत. अशा कॉलेजांना डीटीई आणि सरकारकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे 'डीटीई'चे संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

close