राज्यात मान्यताप्राप्त माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या अर्धवेळ शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्हताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊन त्यांना घड्याळी तारिकेनुसार मानधन देण्यात येते. संदर्भाधिन 21-11-2022 शासन निर्णयान्वये माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वांवर नियुक्त शिक्षकांना द्यावयाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. या मानधनामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शालेय शिक्षण विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. माध्यमिकच्या शिक्षकांचे मानधन आता प्रति तास 250 रुपये आणि उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे मानधन प्रतितास 300 रुपये करण्यात आले आहे.
घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हत्ताप्राप्त असावेत, अर्हता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये. तसेच घडयाळी शिक्षकांची मानधन नियमितपणे अदा करण्यात येईल, याची शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णय दिनांक ०१.०५.२०२५ पासून अंमलात येईल.
राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावरील सुमारे १० हजार शिक्षक कार्यरत आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे १० हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
0 Comments