Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्य क्रीडा दिन - ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि.15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणेबाबत

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि.१५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. 

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडाविषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्हयात दरवर्षी दि.१२ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो, याच धर्तीवर सन १९५२ मध्ये हेलसिंकी, फिनलंड येथील ऑलिंपिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक (कास्य पदक) जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा तसेच त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी याकरिता त्यांचा जन्मदिन राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे होत होती.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2023 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here


या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच १५ जानेवारी हा दरवर्षी "राज्याचा क्रीडा दिन" म्हणून साजरा केला जाणार असल्याचे दि.२८.८.२०२३ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजित केलेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान जाहीर केले आहे. त्यानुसार या राज्य क्रीडा दिनादिवशी अपेक्षित क्रीडा विषयक उपक्रम, आर्थिक तरतूद व अन्य आवश्यक बाबी यासंदर्भातील प्रस्ताव संदर्भाधिन पत्रान्वये आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांनी सादर केला आहे. यानुषंगाने राज्यात यापुढे दरवर्षी राज्य क्रीडा दिन साजरा करण्याबाबत तसेच त्याअंतर्गत उपक्रमांबाबत आवश्यक सूचना देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.


शासन निर्णय :

महाराष्ट्राचे महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडाक्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन दि. १५ जानेवारी हा यापुढे दरवर्षी "राज्य क्रीडा दिन" म्हणून साजरा करण्यात यावा, असा निर्णय शासनाने घेतला आहे.


खालील संस्थांनी प्रत्येक वर्षी दि. १५ जानेवारी रोजी राज्य क्रीडा दिन साजरा करावा.

१) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालये, क्रीडाप्रबोधिनी, क्रीडा संकुले.

२) शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये.

३) शासकीय तसेच शासनमान्य खाजगी विद्यापीठे

४) एकविध क्रीडा संस्था/असोसिएशन, क्रीडा मंडळे, क्रीडा अकादमी. 

५) शासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ / अनुदान मिळालेल्या सर्व संस्था. 

६) अन्य संस्था/मंडळे (स्वेच्छेने)


15 जानेवारी - राज्य क्रीडा दिनादिवशी खालील उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात यावे.

१) ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान याविषयांवरील व्याख्यानांचे आयोजन.

२) क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅलीचे, मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.

३) शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांसंदर्भातील नियमावली, ऑलिंपिक स्पर्धासोबतच अन्य महत्वाच्या स्पर्धा, त्यामधील यशस्वी खेळाडू व अन्य बाबी यांची प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन. तसेच ऑनलाइन संपर्क माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवाद. 

४) विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने व विजेत्यांना पुरस्कार वितरण

५) आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव.

६) जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण,

७) क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडाशिक्षण क्षेत्रातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत नवोदित खेळाडू, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी, पालक तसेच क्रीडाप्रेमी नागरिक यांच्यासोबत क्रीडाक्षेत्र तसेच त्यामधील करीअर संधींबाबत परिसंवाद व चर्चासत्रे

८) यशस्वी क्रीडाविषयक उपक्रम तसेच क्रीडा सुविधांनी युक्त क्रीडा संकुले, अकादमी, संस्था यांना भेटी देणे.


आयुक्त, क्रीडा तसेच सर्व उपसंचालक, सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी राज्य क्रीडा दिन व त्याअंतर्गत उपक्रमांचे आपापल्या विभागातील / कार्यक्षेत्रातील संबधितांचे सहकार्य व समन्वयाने यशस्वी आयोजन करावे.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त सर्व कार्यालयांच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या राज्य क्रीडा दिनाकरिताचा खर्च हा मागणी क्र. ई-३ लेखाशिर्ष २२०४, क्रीडा व युवक सेवा १०४, (२५) (०१) महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्हयामध्ये क्रीडा सप्ताह साजरा करणे (कार्यक्रम) (२२०४ १७३८) ५० इतर खर्च या लेखाशिर्षाखाली त्या त्या वर्षासाठी मंजूर अर्थसंकल्पिय तरतुदीतून भागविण्यात यावा. (टिप:-परि.२ मधील अ.क्र.२ ते ६ येथील संस्थांनी राज्य क्रीडा दिन साजरा करण्याकरिता स्वनिधीतून तरतूद करावी.)


प्रस्तुतचा शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. ३९७/१४७१, दिनांक ११/१२/२०२३ आणि वित्त विभाग अनौपचारीक संदर्भ क्र. विवि/शिकाना/११०, दि. १४/१२/२०२३ याअन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१२२९१८३२४००३२१ असा आहे. 

राज्य क्रीडा दिन - ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि.१५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करा. Download

Post a Comment

0 Comments

close