Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Marathwada Mukti Sangram: निजामाची सत्ता उखडून मराठवाड्याने मिळवले स्वातंत्र्य ! ऑपरेशन पोलो विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Marathwada Mukti Sangram: निजामाची सत्ता उखडून मराठवाड्याने मिळवले स्वातंत्र्य ! स्वामी रामानंद तीर्थ अन् सरदार पटेलांच्या मुत्सद्देगिरीची संपूर्ण गोष्ट - ऑपरेशन पोलो



भारत स्वतंत्र झाल्यानंतरही तब्बल १३ महिने जुलमी निजामी राजवटीखाली राहिलेल्या मराठवाड्याने १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळवले. स्वामी रामानंद तीर्थ यांचे नेतृत्व, सरदार वल्लभभाई पटेल यांची खंबीर भूमिका आणि भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन पोलो' लष्करी कारवाईमुळे निजामाला शरणागती पत्करावी लागली. रझाकारांचे अत्याचार मोडून काढत मराठवाडा भारतात विलीन झाला, ज्याची आठवण म्हणून आज 'मराठवाडा मुक्तीदिन' साजरा केला जातो.


Marathwada Mukti Sangram History 

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असला, तरी मराठवाड्याची जनता मात्र त्यानंतरही १ वर्ष, १ महिना आणि २ दिवस निजामी जुलमी राजवटीच्या आणि स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत होती. अंतिमतः १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैन्याच्या सैनिकी कारवाईमुळे (ऑपरेशन पोलो. ) निजामाला शरणागती पत्करावी लागली आणि मराठवाडा स्वतंत्र होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट झाला.


मराठवाडा मुक्ती संग्रामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी.

पूर्वीच्या हैदराबाद संस्थानामध्ये मराठी, तेलगू आणि कन्नड भाषिक प्रदेश समाविष्ट होते. या संस्थानावर सातवा आणि शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान याची राजवट होती. निजामाने संस्थानात उर्दूला राजभाषेचा दर्जा देऊन मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षणावर कडक निर्बंध लादले होते. नागरी स्वातंत्र्याचा संकोच केला जात होता आणि प्रशासनातील नोकऱ्यांमध्ये पक्षपाती धोरण अवलंबले जात होते. 

या अन्यायकारक धोरणांविरुद्ध जनतेमध्ये सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी परभणीचे गणेश वाचनालय आणि औरंगाबादचे बलवंत वाचनालय यांसारख्या संस्थांनी, तसेच विविध खाजगी राष्ट्रीय शाळांनी मोलाचे योगदान दिले. स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या शाळांनी तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना प्रज्वलित केली.

राजकीय हक्क मिळवण्यासाठी २९ जून १९३८ रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली, परंतु निजामाने स्थापनेनंतर लगेचच ७ सप्टेंबर १९३८ रोजी त्यावर बंदी घातली. या बंदीच्या विरोधात व्यापक सत्याग्रह करण्यात आला. याशिवाय, आर्य समाज, हिंदू महासभा, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे जनलढ्याला मोठी ताकद मिळाली. १९३८ मध्ये उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीतावर घातलेल्या बंदीविरोधात अभूतपूर्व संप पुकारला; या 'वंदे मातरम् चळवळीने' मुक्ती संग्रामासाठी तरुण कार्यकर्त्यांची मोठी पिढी तयार केली. 


मुक्ती संग्रामाचा उग्र लढा आणि रझाकारांचा अत्याचार

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामाने स्वतंत्र राहण्याचा किंवा पाकिस्तानशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. २९ नोव्हेंबर १९४७ रोजी भारत सरकारसोबत 'जैसे थे' करार करूनही निजामाने त्याचा भंग केला. कासीम रझवीच्या नेतृत्वाखालील 'रझाकार' या निमलष्करी संघटनेने संपूर्ण संस्थानात लुटालूट, जाळपोळ आणि हत्यांचे सत्र सुरू केले. अर्जापूर येथे स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची रझाकारांनी हत्या केली.


स्टेट काँग्रेसची दुहेरी नीती

या दडपशाहीला तोंड देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील स्टेट काँग्रेसने दुहेरी नीती वापरली. सत्याग्रहाबरोबरच सीमेवर सशस्त्र लढा उभारण्यासाठी कॅम्प्स सुरू करण्यात आले आणि दिगंबरराव बिंदू यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली. गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ. वाघमारे, माणिकचंद पहाडे यांसारख्या नेत्यांनी गावोगावी जंगल सत्याग्रह, लेव्हीबंदी, साराबंदी आणि कर आकारणी केंद्र (करोडगिरी नाके) उद्ध्वस्त करण्याचे कार्यक्रम यशस्वी केले.


ऑपरेशन पोलो आणि मराठवाड्याची मुक्ती

रझाकारांचा वाढता अत्याचार, सीमेवरील हल्ले आणि कराराचा भंग यामुळे भारत सरकारने कठोर निर्णय घेतला. भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली १३ सप्टेंबर १९४८ रोजी पहाटे ४ वाजता हैदराबाद संस्थानाविरुद्ध 'ऑपरेशन पोलो' अंतर्गत लष्करी कारवाई (पोलिस ॲक्शन) सुरू झाली.

मेजर जनरल जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर मार्ग तसेच इतर पाच दिशांनी भारतीय फौजा संस्थानात घुसल्या. अवघ्या ५ दिवसांच्या कारवाईनंतर निजामी सैन्याची वाताहत झाली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी सायंकाळी निजामाने पूर्ण शरणागती पत्करली आणि युद्धबंदी घोषित केली. १८ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने हैदराबाद शहरात प्रवेश केला.


अशा प्रकारे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि हजारो हुतात्म्यांच्या बलिदानातून मराठवाड्याला निजामी जुलमी राजवटीपासून मुक्ती मिळाली. १७ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात 'मराठवाडा मुक्ती दिन ' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.


१७ सप्टेंबर - मराठवाडा मुक्ति संग्राम दिन

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. 

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे आणि अनेक नेत्यांकडे होते. 

मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्यात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. 

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. यासीन जूबेर हैद्राबादी मंत्री याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली परत घेण्याची प्रतिज्ञा केली त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकु दिले नाहीत यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते; यामध्ये रामचंद्र धंदेवार याना बाळगिर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने शहीद झाले. त्यावेळी गोदामाय दुथडी भरुन वाहत होती. रामचंद्र याना सिरसागर नावाच्या मर्दाने शहीदास आपल्या पाठीवरुन पैलतीरी आणुन भर पावसात खड्डा केला व त्यांचा विधी पुर्ण केला. 

निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. 

चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 

१५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

स्वातंत्र्य सेनानींनी आपले आयुष्य ज्या कारणांसाठी वेचले, त्याची जाणीव ठेवून मराठवाड्यातील सामाजिक, आर्थिक, कृषीविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वांगिण प्रगतीसाठी आपणा सर्वांच्या सहकार्यातून विकासाचा मार्ग चोखाळू या. मराठवाड्याच्या अस्मितेला अभिवादन.

Post a Comment

0 Comments

close