Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आम्हाला शिकायचे आहे, शिक्षक द्या... पांझणच्या चिमुकल्यांवर शिक्षकांसाठी आंदोलन करण्याची वेळ,.

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
'आम्हाला शिकायची इच्छा आहे. आम्ही शाळेतदेखील आनंदाने येतो. पण शिकवायला शिक्षकच नाहीत. मग शिकायचे कसे?', अशी कैफियत मांडत 'आम्हाला मास्तर द्या' या मागणीसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. नांदगाव तालुक्यातील नवे पांझण जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नांदगाव पंचायत समितीवर मंगळवारी मोर्चा काढत प्रशासनाला शिक्षक नसल्याबाबत जाब विचारला. आंदोलनात पालकही सहभागी झाले होते. शिक्षक नियुक्ती व बदलीचे अधिकार नसल्याने प्रशासनाने हतबलता व्यक्त करीत एका शिक्षकाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील नवे पांझण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. सात शिक्षकांची गरज असताना येथे अवघे तीन शिक्षक मंजूर आहेत. सुरुवातीला पाच शिक्षक असताना त्यातील दोघांना इतरत्र पदोन्नती देण्यात आली. दोन पदवीधर शिक्षकांच्या जागा रिकाम्या असूनही त्या अद्याप भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची कमतरता आहे. सात शिक्षकांचे काम तीन शिक्षक करतात. वेळोवेळी मागणी करूनही शिक्षक न मिळाल्याने शाळेतील विद्यार्थी व पालकांनी मंगळवारी पंचायत समितीवर मोर्चा काढला. रेल्वे गेटपासून निघालेला हा मोर्चा पंचायत समितीत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्धा तास ठिय्या दिला. प्रभारी गट शिक्षणाधिकारी एन. जी. ठोके यांनी आम्हाला शिक्षक नियुक्तीचे अधिकार नसल्याचे सांगितले. पालक संतप्त झाल्याने पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना हस्तक्षेप करावा लागला. शेवटी प्रशासनाकडून एक शिक्षक देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दोन शिक्षक कमी आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कायमस्वरुपी शिक्षक देण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. पांझण येथे दोन पदे रिक्त आहेत. एकाची तात्पुरती व्यवस्था केली आहे. दुसरे शिक्षक बदली काळात देण्याची व्यवस्था करणार आहोत.
--एन. जी. ठोके, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, नांदगाव

Post a Comment

0 Comments

close