राज्य शासनाने तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण-२०२४ द्वारे शिक्षण ही मूल्याधारित, सामाजिकदृष्ट्या संलग्न आणि बहुआयामी प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आली आहे. या चौकटीमध्ये संज्ञानात्मक (Cognitive), सामाजिक भावनिक (Socio-emotional), शारीरिक (Physical), नैतिक व सामाजिक (Ethical-Social) या चार मुख्य विकासक्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी केवळ वर्गखोलीतील अध्यापन पुरेसे नसून, विद्यार्थ्यांना विद्यार्थी समूह / उपक्रमांत सक्रिय सहभाग देणे गरजेचे आहे. PGI व SQAAF यांचे निर्देश देखील हेच अधोरेखित करतात की शाळांनी सहशालेय उपक्रम, जीवनकौशल्य विकास, नेतृत्व प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सहभागावर भर द्यावा. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थी समूह तयार करण्यात येणार आहेत. विद्यार्थी समूह कसे व कोणते तयार करावेत? याबाबत विद्यार्थी समूह मार्गदर्शिका PDF ( शाळा / वर्ग स्तर ) डाउनलोड करा. | विद्यार्थी समूहाची आवश्यकता, निर्मिती व अंमलबजावणी बाबत सूचना वाचा.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० (NEP 2020) मध्ये शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम असावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची स्वभाववैशिष्ट्ये, कौशल्ये, आवड व क्षमता यानुसार अनुभवाधारित शिक्षण देणे अत्यावश्यक ठरते.
एकविसाव्या शतकातील कौशल्यांना अनुसरून, राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अधिकाधिक विदयार्थी समूह स्थापन करावेत. हे समूह तांत्रिक, वैज्ञानिक, कलात्मक, सामाजिक, खेळ, छंद व जीवनकौशल्य यासारख्या विविध क्षेत्रांवर आधारित असतील. या समूहांमुळे शिक्षण प्रक्रियेत कृतीशीलता, सामाजिकता, विज्ञाननिष्ठा, समता आणि उपयोजित ज्ञान यांची वाढ होईल. याकरिता परिषद स्तरावर विविध विभागांच्या कार्यशाळेत या उपक्रमाचा संपूर्ण आराखडा निश्चित करण्यात आला आहे. सर्व विषय विभागांनी विविध विद्यार्थी समूहांची रचना व कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आलेली ही 'विद्यार्थी समूह मार्गदर्शिका (शाळा व वर्ग स्तर)' शाळांसाठी एक मार्गदर्शक साधन ठरेल. यात प्रत्येक समूहाचे उद्दिष्ट, कामकाजाची रूपरेषा, उपक्रमांची उदाहरणे आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती यांचा समावेश आहे. शाळांनी आपल्या स्थानिक गरजांनुसार आणि संसाधनांचा विचार करून या समूहांचे सुयोग्य व्यवस्थापन करावे, अशी अपेक्षा आहे.
विद्यार्थी समूह मार्गदर्शक सूचना
१) प्रत्येक शाळेत विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील.
२) समूहासाठीच्या मार्गदर्शिकेत विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कार्यवाही करावी.
३) समूहांची निवड करताना स्थानिक विविधता, वैशिष्ट्य, उपलब्धता, गरजा, शाळा/वर्गाची विद्यार्थी संख्या यांचा प्राधान्याने विचार करावा.
४) समूहांमध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना विद्यार्थ्यांची आवड, कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाच्या गरजा विचारात घ्याव्यात.
५) समूहाच्या सुयोग्य कार्यान्वयनासाठी आवश्यकतेनुसार मासिक /द्विमासिक / त्रैमासिक / सहामाही / वार्षिक बैठक घेणे बंधनकारक आहे.
६) समूहाद्वारे आयोजित करावयाचे उपक्रम निवडण्याची लवचीकता शाळेस राहील.
७) शालेय विषयांशी पूरक अशा अधिकाधिक समूहांची शाळा/वर्ग स्तरावर स्थापना करावी.
८) शाळा स्तरावर मुख्याध्यापक व संबंधित शिक्षक यांनी शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समुहातील उचित उपक्रम निवडावेत. तसेच उपक्रमांची पुनरावृत्ती टाळावी.
९) शालेय स्तरावर समूह स्थापन करणे व प्रभावीरीत्या कार्यान्वित करणे ही जबाबदारी मुख्याध्यापकांची व संबंधित शिक्षकांची राहील.
१०) वर्गाचा स्तर, वयोगट व समूहाचे उद्देश विचारात घेऊन शाळा व वर्ग पातळीवर समुहाची स्थापना करावी व समूहाचा मार्गदर्शक म्हणून संबंधित शिक्षकाने जबाबदारी पार पाडावी.
११) शाळा/वर्ग स्तरावर स्थापन केलेल्या समूहाचे योग्य समन्वयन मुख्याध्यापकांनी करावे.
१२) मुख्याध्यापकांनी समूह स्थापना व कार्यान्वयनाचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करावा.
१३) सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थी समूहाचे सतत मार्गदर्शन, पर्यवेक्षण व संनियंत्रण करावे.
१४) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य.) यांनी शाळाभेटी करून विदयार्थी समूहाचे सुयोग्य समन्वयन करावे.
विद्यार्थी समूह उपक्रम
शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, कौशल्ये आणि सामाजिक जाणीव विकसित करणे हे शिक्षणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून शाळांमध्ये विद्यार्थी समूह उपक्रम कार्यान्वित करण्यात येत आहे.
विदयार्थी समूह उपक्रमाची आवश्यकता :
'राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०' च्या उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठी आणि एकविसाव्या शतकातील गरजा, आव्हाने पूर्ण करण्यासाठी प्रस्तुत विद्यार्थी समूह उपक्रमाची आवश्यकता आहे. विदयार्थी समूह उपक्रमाची अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास साहाय्यभूत ठरणार आहे. जेणेकरून या समूहांच्या अंमलबजावणीची आवश्यकता पुढील बाबींच्या विकासास उपयुक्त ठरणार आहे.
१) कौशल्य विकास विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमावर आधारित ज्ञानच नव्हे, तर जीवन कौशल्ये (Life Skills) जसे की, संवाद कौशल्ये, नेतृत्व क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, गटकार्य (Teamwork) आणि चिकित्सक विचार (Critical Thinking) विकसित करण्याची संधी मिळेल.
२) सुप्त गुणांना वाव प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही विशेष गुण असतात. या समूहांच्या माध्यमातून विदयार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार कला, विज्ञान, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःला व्यक्त करण्यास आणि आपले कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
३) सामाजिक आणि भावनिक विकास समूहात काम करताना विद्यार्थ्यांना एकमेकांशी जुळवून घेणे, इतरांचा आदर करणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव या बाबींचा विचार करावा लागतो. यामुळे त्यांचा भावनिक आणि सामाजिक विकास होतो.
४) शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी औपचारिक शिक्षणाबरोबर वर्गाबाहेर, आवडीच्या विषयांवर आधारित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी आणि प्रेरणादायी वाटते. यामुळे त्यांची शाळेतील उपस्थिती आणि शिक्षणातील रुची वाढण्यास मदत होईल.
५) नेतृत्व आणि जबाबदारीची भावना विद्याथ्यांद्वारेच हे समूह चालवले जात असल्याने, त्यांना स्वतः पुढाकार घेणे, निर्णय घेणे आणि जबाबदारी स्वीकारणे या गोष्टी शिकायला मिळतात, ज्यामुळे भविष्यातील सक्षम नागरिक निर्माण होतील.
६) रोजगारक्षमतेला चालना विशिष्ट कौशल्ये (उदा. कोडिंग, रोबोटिक्स, कला) विकसित करणारे समूह विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्यास मदत करतील.
विद्यार्थी समूहांचे क्षेत्र :
बालकांच्या विकासातील शालेय प्रक्रियेत 'सुरक्षित आणि प्रेरक वातावरण' असणे हा त्यांचा विकास आणि अध्ययनाचा पाया असतो. त्याअनुषंगाने सर्व उपक्रमांमध्ये विविधता व आव्हाने असतात. प्रत्येक बालक स्वतःच्या गतीने शिकते प्रत्येकाच्या अध्ययन गरजा लक्षात घेतल्या जातात. या तत्त्वांचा विचार करून राज्यातील सर्व प्राथमिक/माध्यमिक शाळांमध्ये विविध समूह स्थापन केले जातील. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला, चिकित्सक वृत्तीला, ऊर्जेला वाव देणारे समूह प्रकार सदर विद्यार्थी समूह मार्गदर्शिकत देण्यात आलेले आहेत.
विद्यार्थी समूह अपेक्षित परिणाम :
सदर उपक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास साहाय्यभूत ठरेल. ते परीक्षाभिमुख विद्यार्थी न राहता, समाजात सकारात्मक बदल घडवणारे, सर्जनशील आणि आत्मनिर्भर नागरिक बनतील.
शाळेत विद्यार्थी समूह तयार करण्यासाठी सूचना :
शाळेमध्ये विद्यार्थी समूह उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणीकरिता खालील सूचनांचा विचार करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी समूह अंमलबजावणी :
१) उद्दिष्ट निश्चित करा:
मूलभूत उद्दिष्ट : विद्यार्थी समूहांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणे.
विशिष्ट उद्दिष्टे : प्रत्येक समूहाचे (उदा. विज्ञान समूह, कला समूह) नेमके काय उद्दिष्ट असेल, हे निश्चित करणे. (उदा. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, कलात्मक कौशल्ये वाढवणे)
२) विद्यार्थ्यांच्या आवडी जाणून घ्या:
सर्वेक्षण : विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना कोणत्या विषयांमध्ये किंवा उपक्रमांमध्ये अधिक रस आहे, हे जाणून घ्या. यामुळे त्यांना आवडणारे आणि ज्यात ते उत्साहाने सहभागी होतील असे समूह तयार करता येतील.
चर्चासत्र : विद्यार्थ्यांशी थेट चर्चा करून त्यांच्या कल्पना आणि अपेक्षा समजून घ्या.
३) विद्यार्थी समूहांची निवड निश्चित करा :
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि शाळेतील उपलब्ध साधनसामग्रीनुसार विविध प्रकारचे समूहू निश्चितकरा. हे समूह शैक्षणिक आणि बौद्धिक, कलात्मक आणि सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक आणि सेवाभावी व कौशल्य आधारित अशा विविध वर्गवारीतील असावेत. समूहांशी संबंधित सविस्तर माहितीनुसार समूह स्थापन करा.
४) शिक्षकांचा सहभाग :
मार्गदर्शक शिक्षक : प्रत्येक विद्यार्थी समूहासाठी एक उत्साही आणि संबंधित विषयाची आवड व अनुभव असलेला शिक्षक 'मार्गदर्शक' म्हणून नियुक्त करा.
सुलभन : विदयार्थी समूहांना कसे मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांना सक्रिय कसे ठेवावे आणि त्यांची कौशल्ये कशी विकसित करावित यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी शिक्षकांचे शाळाभेटींद्वारे सुलभन करावे.
५) समूहाची रचना आणि कार्यपद्धती :
विद्यार्थी नेतृत्व : प्रत्येक समूहात विद्यार्थीच अध्यक्ष, सचिव आणि इतर पदांवर काम करतील अशी रचना करा. यामुळे त्यांना नेतृत्व आणि जबाबदारीची जाणीव होईल.
लोकशाही पद्धत : नेतृत्व निवडताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना लोकशाही पद्धतीचा अवलंब करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची ओळख होईल.
नियमित बैठका : प्रत्येक समूहाच्या नियमित बैठका आणि उपक्रमांचे वेळापत्रक निश्चित करा.
नियम आणि कार्यपद्धती : समूहाच्या कामकाजासाठी साधे आणि स्पष्ट नियम तयार करा.
६) पालकांना सहभागी करून घ्या:
माहिती द्या: पालकांना विद्यार्थी समूहांच्या स्थापनेबद्दल, त्यांच्या उद्दिष्टांबद्दल आणि मुलांच्या विकासातील त्यांच्या भूमिकेबद्दल माहिती दया.
सहभाग : पालकांना समूहांच्या काही उपक्रमांमध्ये (उदा. प्रदर्शन, कार्यक्रम) सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.
७) मूल्यांकन आणि सुधारणा :
नियमित आढावा : विद्यार्थी समूह कसे काम करत आहेत, त्यांचे उद्दिष्ट साध्य होत आहे का, याचा नियमितपणे आढावा घ्या.
अभिप्राय (Feedback): विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून अभिप्राय घ्या आणि त्यानुसार उपक्रमांमध्ये सुधारणा करा.
यश साजरे करा: समूहांच्या यशोगाथा इतरांसोबत शेअर करा आणि यशस्वी उपक्रमांचे कौतुक करा.
८) प्रोत्साहन :
उत्कृष्ट समूह कार्यासाठी शाळा स्तरावर प्रशस्तिपत्र दयावे.
0 Comments