Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विनाअनुदानित शिक्षकांची व्यथा...

रस्त्याच्या कडेला उभा राहून चप्पल विकणाऱ्या एका माणसाकडे आपल्या बापाच्या खांद्यावर बसून एक चिमुरडी आली. तिने चप्पल पसंत केली, बापाने खिशात हात घालून शंभर रुपये काढून समोर धरले. विक्रेत्याने सत्तर रुपये परत केल्यावर चुणचुणीत मुलगी म्हणाली, 'ओ काका तुम्ही जास्त पैसे दिलेत परत...पप्पा त्यांना अजून वीस रुपये द्या.' विक्रेता म्हणाला, 'बाळ, मी मुद्दामच कमी पैसे घेतलेत.' असे म्हणून विक्रेता जरा मागे सरकला, आणि तोंडावरचा मास्क जरा खाली घेतला. त्याबरोबर ती मुलगी आश्चर्याने ओरडली, 'सsssर!!!'

हो, ते तिचे सरच होते! बापू जाधव सर. तुम्ही राहू गावात जाताना, शाळा मागे टाकून थोडेसे पुढे गेलात की उजव्या हाताला दोन तीन पथारीवाले दिसतात, त्यातलेच एक चप्पलवाले जाधव सर आहेत. 

साधारण दहा ते बारा वर्षांपूर्वी बी. एड. केले. खरेतर इतकी उच्च शिक्षित होणारी त्यांच्या घरातील ही एकमेव व्यक्ती. बी. ए. ला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे वडील अत्यंत खुश झालेले. बापूने वडिलांकडे बी. एड करण्याची इच्छा व्यक्त केली. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले. वडिलांची परिस्थिती इतकी नव्हती, परंतु ओळखी पाळखीने पैसे जमवून त्यांनी बापूचे शिक्षण पूर्ण केले. बी एड झाल्यानंतर बापू जेव्हा गावात परतला, तेव्हा घरच्यांसह सर्वांनाच आनंद झाला. आता घरचे लोक त्याला मास्तर म्हणू लागले, हे बिरुद तो आनंदाने मिरवू लागला. लवकरच आपण कुठेतरी शिक्षक म्हणून जॉईन होणार याची स्वप्ने बापू रंगवू लागला. पेपरमध्ये येणाऱ्या जाहिराती बघून तो मुलाखतींना जाऊ लागला, इथूनच खऱ्या अर्थाने त्याला वास्तवतेचे चटके बसायला लागले. मुलाखतीत कुणीच त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेत नव्हतं! प्रत्येकजण खिशात वजन किती टाकू शकतो हाच प्रश्न विचारी. घरी परतताना घरच्यांना काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्याच्या मनाला खाई. कधी खूप लांब आहे म्हणून मीच नको म्हणालो, कधी शाळा आवडली नाही अशी उत्तरे देऊन तो वेळ मारून नेई. मात्र प्रत्येक वेळी अशी उत्तरे देणेही त्याच्या जीवावर यायला लागले. वैतागून घरचेही म्हणायचे, कशीही असो पण कर बाबा नोकरी. लग्नाचं वय निघून चाललंय. घरच्यांचही बरोबरच होतं. अशीच कुठेतरी मानधन तत्त्वावर नोकरी स्वीकारली. घरच्यांना खूप आनंद झाला, त्यांनी गावात पेढे वाटले. बापू मात्र मनात अश्रू ढाळत होता, कारण त्याला मानधन म्हणून महिन्याला फक्त चार हजार रुपये मिळणार होते..... सहा महिन्यांनी तीही नोकरी गेली... आणि हे एक चक्रच चालू झाले. आता घरचेही खचून गेले होते. कधी क्लास घे, कधी पेट्रोल पंपावर कामाला जा, कधी काय तर कधी काय. दरम्यान लग्न झाले, बायकोही चांगली शिकलेली मिळाली. तिचेही डी.एड. झालेले आहे. सध्या ती कपडे शिवून कुटुंबाला हातभार लावते. एक मुलगा झाला. घरच्या जबाबदाऱ्या वाढल्या. तुटपुंज्या मानधनावर काम करणे परवडेनासे झाले. बेगडी मान मिळाला पण पोट मान सन्मानावर भरत नसते. त्यातच लॉकडाऊन झाले, आणि उत्पन्नाचे सगळेच मार्ग बंद झाले. काहीतरी मार्ग काढणे गरजेचे होते, म्हणून बापूने चप्पल व्यवसाय करण्याचे ठरवले. गाठीशी असणारे काही पैसे गुंतवून त्याने माल आणला, आणि गावात रस्त्याकडेला आपली पथारी पसरली. 
घरी गेलो, की भिंतीवर त्याची गुणवत्तादर्शक प्रमाणपत्रे लटकलेली आहेत. आणि त्याच प्रमाणपत्रांखाली माल भरलेली पोती दिसतात. घरचे अजूनही त्याला मास्तर म्हणतात. पोरगा आता मोठा झालाय, तो विचारतो, 'पप्पा, मास्तर म्हणजे शाळेत शिकवणारा शिक्षक ना? तुम्ही तर चप्पल विकता, मग तुम्हाला मास्तर का म्हणतात?' उत्तरादाखल बापूच्या डोळ्यातून फक्त अश्रू ओघळतात...... पण सरकारच्या लेखी बापू बेरोजगार नाही!!
सौजन्य : सोशल मीडिया

Post a Comment

0 Comments

close