रातांधळेपणा - 'अ' जीवनसत्त्वाचा अभाव
अंधुक अथवा मंद प्रकाशात कमी दिसणे किंवा काहीही न दिसणे या विकृतीला ‘रातांधळेपणा’ म्हणतात.दिवसा उत्तम दिसणे परंतु रात्रीच्या वेळी कमी दिसणे यावरून रातांधळेपणा (रात्र-रात) ही संज्ञा बनली आहे. डोळ्याच्या जालपटलातील शंकु-शलाकांमधील रंगद्रव्यावर प्रकाशकिरण पडल्यामुळे त्याचे विघटन (घटकद्रव्ये अलग होण्याची क्रिया) होते. या रासायनिक बदलांना शंकु-शलाका हे प्रकाशग्राही असलेले तंत्रिका तंतूंचे (मज्जातंतूंचे) संवेदनाग्राहकच आहेत. या रंगद्रव्याला ‘दृग्नीलारुण’ (ऱ्होडॉप्सीन) म्हणतात व त्यावरील विक्रियेकरिता अ जीवनसत्त्व आवश्यक असते आणि त्याची न्यूनता हे रातांधळेपणाचे प्रमुख कारण असते.
या आजारात माशाच्या खवल्यासारखे डाग डोळयाच्या पांढ-या भागावर दिसू लागतात. हे डाग बुबुळाच्या बाहेरच्या बाजूला असतात. पण नाकाच्या बाजूला कधी येत नाहीत. डोळयात काजळ घातल्यावर या खरखरीत भागावर काजळ साचून हा भाग उठून दिसतो. या खवल्यासारख्या भागाला बिटॉटचे ठिपके म्हणतात. ( बिटॉट हे एका शास्त्रज्ञाचे नाव आहे. ) आता हा आजार फार क्वचित आढळतो.*
उपचार
उपचार
'अ' जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, (विशेषत: शेवग्याचा हिरवा पाला, पालक, मेथी, इत्यादी) रंगीत फळे (उदा. गाजरे, टोमॅटो,पपई, आंबा,भोपळा, इ.) व प्राण्यांचे मांस, यकृत, अंडी, मासे उपयोगी आहेत. या सर्व पदार्थांमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर असते.
'अ' जीवनसत्त्वाचे जास्त शक्तीचे तेलकट औषध बाटलीतून मिळते. याचा एक चमचा म्हणजे दोन लाख युनिट असतात. आजाराच्या उपचारासाठी एकूण सहा लाख युनिट द्यावे लागतात (रोज एक चमचा तीन दिवस).मात्र आजार नसल्यास केवळ एक चमचा द्यावे.
रातांधळेपणा टाळण्यासाठी, सर्व मुलांना 5 वर्षापर्यंत दर 6 महिन्यांनी एक चमचा 'अ' जीवनसत्त्वाचा डोस द्यावा.
'अ' जीवनसत्त्वाअभावी येणारे अंधत्त्व हे पूर्णपणे टाळण्यासारखे आहे. त्यासाठी करायची उपाययोजना ही अतिशय साधी आहे. त्यामुळे मुलाचे आयुष्यभराचे भावी नुकसान टाळता येईल.
उपचार केल्यानंतर रातांधळेपणा, डोळयाचा कोरडेपणा, पूर्ण बरा होतो. पण बिटॉटचे ठिपके एकदा तयार झाले की जात नाहीत. मात्र, बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा जाऊन ते परत पूर्ववत चकचकीत होऊ शकते. पण बुबुळ मऊ पडून फुटले तर परत कधीही दृष्टी येऊ शकत नाही.
गरोदर मातेस 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येऊ शकतो. म्हणून गरोदर मातेलाही रातांधळेपणासाठी डोस देणे आवश्यक आहे. बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा ही अंधत्त्वाची पूर्वसूचना समजा. यावर अजिबात वेळ न दवडता उपचार करा. या बरोबरीने जंतासाठी बेंडेझोल हे औषध द्यावे.
0 Comments