देशातील सर्वात तरुण महापौर - आर्या राजेंद्रन
केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली आहे. आर्याने यूडीएफच्या उमेदवार श्रीकला यांना दोन हजार ८७२ मतांनी हरवलं. ती आता तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती देशातील सर्वात तरुण महापौर ठरणार आहे. केरळची आणि देशातील सर्वात तरुण महापौर बनून आर्या राजेंद्रन एक नवा इतिहास कायम करणार आहे.
माकप जिल्हा व राज्य समितीने एकमताने महापौर पदासाठी तिची उमेदवारी मंजूर केली होती. आज जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांनी आर्या राजेंद्रन यांना महापौर पदाची शपथ दिली. आर्या यांनी 99 पैकी 54 मते मिळवून महापौर पदी विराजमान झाली. महापालिकेतील 100 सदस्यापैकी सीपीएम आणि डीएलएफ आघाडीने 51 जागावर विजयी बहुमत मिळवले होते.
कसे मिळाले महापौर पद?
सीपीआय-एमने आपल्या विजयानंतर पहिल्यांदाच निवडणूक लढवून निवडून आलेल्या आर्याला थेट महापौरपदी निवडलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्या जमीला श्रीधरन आणि अन्य दोन महिलाही महापौरपदाच्या शर्यतीमध्ये होत्या. त्यापैकी महापौर पदाचे उमेदवार आणि सध्याचे महापौर पराभूत झाले. त्यामुळे तरुण चेहऱ्याला संधी देण्यासाठी पक्षाने आर्याची निवड केली आहे.
हे ही वाचा -
ऑटो चालकाचा मुलगा ते वयाच्या २१ व्या वर्षी IAS अधिकारी…अन्सार शेख यांची प्रेरणादायी कहाणी.
ती सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाली असून ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य देखील आहे.
पाचवीत असल्यापासून पक्षाची सदस्य
आर्या राजेंद्रन ही पाचवीत शिकत असल्यापासून CPIM पक्षाची सदस्य आहे. तिने पक्षाच्या बालसंगम विंगसाठी काम केलंय. नंतरच्या काळात बालसंगमची जिल्हा अध्यक्षा आणि राज्याची प्रमुख या पदावरही तिने काम केलंय. आर्याने सांगितले की बालसंगममधील कामाच्या आधारे तिला स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (सीपीएम स्टुडंट विंग) च्या राज्य समितीत स्थान मिळालं.
आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयन तर आई एलआयसी एजंट
आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयनचे काम करतात. तर, तिची आई श्रीलथा एलआयसी एजंट म्हणून काम करते. भाऊ अरविंदने ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पूर्ण केलंय आणि तो सध्या मध्य आशियात नोकरीला आहे.
महापौरपदाचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. मी त्याचं पालन करीन. निवडणुकीदरम्यान जनतेनं मला पसंती दिली कारण मी एक विद्यार्थी आहे आणि लोकांना एक शिक्षित व्यक्ती प्रतिनिधी म्हणून हवा होता. मी माझे शिक्षण सुरू ठेवतानाच महापौर म्हणून माझी कर्तव्यं पार पाडणार आहे' असं आर्या राजेंद्रन हिने म्हटलंय.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आर्याने आपण विजयी झाल्यास सर्वात आधी आपण जी विकासकाम हाती घेणार आहोत त्यामध्ये खालच्या स्तरातील प्राथमिक शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी काम करणार असल्याचं म्हटलं होतं. आपला शैक्षणिक प्रवास आणि राजकारण दोन्ही एकाच वेळी सुरु राहील असा विश्वास आर्याने व्यक्त केला आहे.



0 Comments