Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवन गाथा आणि रयत शिक्षण संस्था स्थापनेचा इतिहास

रयत शिक्षण संस्थेचं नाव महाराष्ट्रातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये घेतलं जातं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना नेमकी का व कशी केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवन गाथा आणि रयत शिक्षण संस्था स्थापनेचा इतिहास याविषयी आज आपण माहिती पाहूया. 


जैन मुनींच्या कुटुंबातील भाऊराव पाटील

भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका जैन कुटूंबात झाला. त्यांचे वडिल इस्ट इंडिया कंपनीत लिपिक (रोड कारकून) म्हणून नोकरीस होते. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते. त्यांच्या पणजोबांचे नाव देवगौडा, वडिलांचे नाव पायगौडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापुरातील कुंभोज ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे झाला. ऐतवडे बुद्रुक येथील पाटील घराण्यात त्यांनी जन्म घेतला होता.

पाटील घराणं हे धार्मिक प्रवृत्तीचं तसंच सुसंस्कृत म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या दोन पूर्वजांनी दिगंबर जैन मुनी बनण्याचा निर्णय घेतला होता.

भाऊराव पाटील यांची राहणी अत्यंत साधी होती. खादीचं साधं धोतर आणि नेहरू शर्ट असा पोशाख ते नेहमी करायचे. सुरुवातीच्या काळात खांद्यावर घोंगडी घालत. नंतर घोंगडी गेली आणि हाती काठी आली.

भाऊरावांचं प्राथमिक शिक्षण आजोळी म्हणजेच कुंभोज येथे झालं. वडिलांची कामानिमित्त सातत्याने बदली होत असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यात त्यांना अनेक अडचणी आल्या.

दहिवडी, विटा याठिकाणी शाळेच्या पटावर त्यांचं नाव होतं. पण वर्गाशी त्यांचा फारसा संबंध यायचा नाही.


विद्यार्थी असल्यापासूनच ते अन्याय आणि विषमता यांच्याविरोधात दंड थोपटून उभे राहत. विटा येथे एके ठिकाणी अस्पृश्यतेच्या अनिष्ट प्रथेतून दलित समाजातील लोकांना पाणी भरण्यास मनाई होती. हा अन्याय सहन न होऊन भाऊरावांनी तेथील रहाट मोडून टाकला.


1902 ते 1909 दरम्यान भाऊराव शिक्षणासाठी कोल्हापुरात होते. शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. ते जैन बोर्डिंगमध्ये राहून माध्यमिक शिक्षण घेऊ लागले. शाळेतील अभ्यासात त्यांना फारशी गती नव्हती पण ते कुस्ती, मल्लखांब, पोहणे या क्रीडाप्रकारांत पटाईत होते.

अस्पृश्य मुलांसाठी 'मिस क्लार्क हॉस्टेल'च्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यामुळे पुन्हा आंघोळ करण्याचा आदेश जैन बोर्डिंगच्या अधीक्षकांनी दिला. पण भाऊराव पाटील यांना हा आदेश मानण्यास स्पष्ट नकार दिला. याचा परिणाम म्हणून त्यांची जैन बोर्डिंगमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर ते कोल्हापूर राजवाड्यावर जाऊन राहू लागले.


शाहू महाराजांचा सहवास

कोल्हापूरच्या राजवाड्यावर राहण्यास मिळाल्यामुळे भाऊराव पाटील यांना छत्रपती शाहू महाराज यांचा खूप सहवास लाभला.

महाराजांचे विचार आणि कार्य यांचा खोल ठसा त्यांच्या मनावर उमटू लागला होता. उपेक्षित समाजाबाबत त्यांचा मनात अधिक करूणा निर्माण झाली. त्यांच्या हक्कासाठी व उद्धारासाठी संघर्ष करण्याचं बीज त्याच ठिकाणी त्यांच्या मनात रोवलं गेलं.


कर्मवीर भाऊराव पाटील यांची राहणी

भाऊरावांची राहणी अतिशय साधी होती. इ. स 1910 पासून भाऊरावांनी खादीचे व्रत स्वीकारले व अखेरपर्यंत त्याचे पालन केले. भव्य देहयष्टी, छातीवर रूळणारी पांढरी शुभ्र दाढी, हातात काठी, खांद्यावर घोंगडी, पहाडी आवाज, अमोघ वक्तृत्व ही त्यांची वैशिष्ट्ये होती.


'पाटील मास्तर'

कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिक्षकांनी सहावी उत्तीर्ण केलं नाही. त्यामुळे त्यांना मॅट्रीकमध्ये जाता आलं नव्हतं. त्यामुळे शिक्षण थांबवून काही काळ ते मुंबईत दाखल झाले.

तिथं मोती पारखण्याची कला शिकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण भाऊरावांना त्या कामात रस आला नाही. यादरम्यान भाऊराव पाटील यांचा विवाहसुद्धा झालेला होता.

पण भाऊराव कोणत्याही कामाविना तसाच वेळ घालवत आहेत, हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांची पत्नीदेखत कानउघडणी केली. यानंतर भाऊराव आपलं राहतं घर सोडून सातारा याठिकाणी खासगी शिकवणी घेण्याचं काम करू लागले.

काही कालावधीतच साताऱ्यात ते 'पाटील मास्तर' म्हणून लोकप्रिय झाले.


1909 मध्ये भाऊराव पाटील यांनी दुधगाव याठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केला. हा प्रयोग त्यावेळी चांगलाच यशस्वी झाला होता.


तुरुंगवास आणि आत्महत्येचा प्रयत्न

1914 दरम्यान कोल्हापुरात एका डांबर प्रकरणात लठ्ठे नामक व्यक्तीविरुद्ध खोटी साक्ष देण्याचं नाकारल्यामुळे भाऊराव पाटील यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

यानंतर भाऊराव यांच्यावरच सतत खोटे आरोप करून त्यांना तुरुंगवासात टाकण्यात आलं होतं. या कालावधीत भाऊरावांवर अनन्वित छळ करण्यात आला. छळास कंटाळून त्यांनी तुरुंगातच तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

मात्र नंतर या प्रकरणातून भाऊराव पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली.

बाहेर पडल्यानंतर पाटील यांनी काही काळ किर्लोस्कर ब्रदर्सच्या लोखंडी कारखान्यात विक्रेते प्रतिनिधी म्हणूनही काम केलं. नंतर त्या नोकरीचाही राजीनामा दिला.


बहुजन समाजासाठीची रयत शिक्षण संस्था

भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांना आपला आदर्श मानत असत. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. आपल्या वक्तृत्वगुणांमुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

त्यावेळी समाजप्रबोधनासाठीच्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये भाऊरावांनी सहभाग घेतला.

अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, कामगारांचा छळ आणि आर्थिक विषमता या विषयांवर ते अत्यंत आक्रमकपणे बोलायचे.

यादरम्यान कराड तालुक्यातील काले याठिकाणी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला. त्यानुसार 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.


काले याठिकाणी संस्थेमार्फत एक वसतीगृह, एक प्राथमिक शाळा तसंच एक रात्रशाळा काढून शैक्षणिक कार्याची सुरुवात करण्यात आली.


1924 साली रयत शिक्षण संस्थेचं काले येथून सातारा शहरात स्थलांतर करण्यात आलं. याठिकाणी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक मिश्र वसतीगृह सुरू करण्यात आलं.

1927 मध्ये या वसतीगृहाचं महात्मा गांधी यांच्या हस्ते 'श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस' असं नामकरण करण्यात आलं.

याठिकाणी सर्व जातीधर्माची मुले एकत्र जेवतात, काम करून एकत्रित शिक्षण घेतात हे पाहून गांधीजींनी त्यांचं कौतुक केलं.

गांधीजी त्यावेळी भाऊराव पाटलांना म्हणाले, "भाऊराव, साबरमती आश्रमात मला जे जमलं नाही ते तुम्ही याठिकाणी यशस्वीरित्या करून दाखवलं आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद."

गांधीजींच्या हरिजन-सेवक संघाकडून या वसतीगृहाला 1933 पासून वार्षिक 500 रुपये इतकी मदत देण्यात येत होती.


संस्थेचा विस्तार वाढला

वसतीगृहात विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करता येतात, या विचाराने भाऊराव पाटील यांनी पुण्यात 1932 मध्ये युनियन बोर्डिंग हाऊस सुरू केलं.

दलित आणि उपेक्षितांच्या शिक्षणासाठी त्यांनी अशी अनेक वसतीगृहे उघडली. सध्या रयत शिक्षण संस्थेमार्फत शंभरच्या आसपास अशी वसतीगृहे चालवली जात आहेत.

त्यावेळी अनाथ मुले आणि बालगुन्हेगार यांना जुवेनाईल कोर्टामार्फत सुधारगृहात पाठवलं जायचं. या मुलांनाही इतर मुलांबरोबर सर्वसाधारण वसतीगृहात ठेवावं, वेगळं ठेवू नये, असं भाऊरावांना वाटायचं.

त्यांनी यासंदर्भात राज्यशासनाशी चर्चा करून आपले विचार पटवून दिले. त्यानंतर विधीसंघर्षग्रस्त मुलांनाही आपल्या वसतीगृहात ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली.

मुदत संपल्यानंतरही संस्थेमार्फत त्यांचं शिक्षण पूर्ण होण्याची व्यवस्था केली जात असे. शाळेविना एकही खेडं असू नये, प्रशिक्षित शिक्षकाविना एकही शाळा असू नये, असा विचार ते करत.

त्या प्रेरणेतून त्यांनी शैक्षणिक शिक्षक देणारे अनेक अध्यापक विद्यालय सुरू केले. पुढे प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये रयत शिक्षण संस्थेमार्फत त्यांनी सुरू केली.

या कामात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची पर्वा न करता आपल्याला समाजकार्यात झोकून दिलं.


कर्मवीर भाऊराव पाटील यांचा गौरव 

कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यामुळे विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

1959 साली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तर पुणे विद्यापीठानेही डी. लिट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. आपल्या कार्यामुळे जनतेकडून त्यांना कर्मवीर ही उपाधी आधीच मिळालेली होती.


सततचं काम, प्रवास यांमुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रकृती नंतर खालावली. 9 मे 1959 मध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजकार्य

भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला.

कर्मवीर भाऊराव पाटील हे जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.

सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

२५फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस असे नामकरण केले गेले.

१६ जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले.

इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.

शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले.


कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेल्या संस्था

दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ

रयत शिक्षण संस्था

छत्रपती शाहू व नेर्ले कार्ले बोर्डिंग वसतिगृह

शिवाजी शिक्षण संस्था सातारा

युनियन बोर्डिंग हाऊस

सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज व महात्मा फुले अध्यापक विद्यालय

प्राथमिक शिक्षण समिती

महाराजा सयाजीराव गायकवाड फ्री अँड रेसिडेन्शिअल स्कुल

जिजामाता अध्यापिका विद्यालय

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिक्षणोत्तेजक पतपेढी

विजयसिग वसतिगृह

आझाद कॉलेज ऑफ एजुकेशन

महात्मा गांधी वसतिगृह

छत्रपती शिवाजी कॉलेज व सद्गुरू महाराज कॉलेज


रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य व बोधचिन्ह

स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य होते व आहे. वडाचे झाड हे रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे. 


रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टे

शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.

मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.

निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.

अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.

संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.

सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.

बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.


कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षणविषयक विचार

1) शिक्षण साध्य नसून एक साधन आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती,नवमानव व नवसमाज निर्माण झाला पाहिजे.

2) शिक्षण हे माणसाच्या जीवनाचा पाया आहे. मानवजातीच्या उत्कर्षाचे ते एक प्रभावी साधन आहे. मानवाच्या अवनतीचे कारण हे शिक्षणाच्या अभावात आहे. प्रभावी शिक्षण हे बलशाली राष्ट्र निर्माण करू शकते.

3) शिक्षण घ्या, शहाणे व्हा, पालकांचे दारिद्रय आड येऊ देऊ नका, घाम गाळून शिका, समाजाच्या उपयोगासाठी शिका

4) शिक्षक हा खेड्यांचा आदर्श ग्रामसेवक व प्रभावी ग्रामनायक बनला पाहिजे.

5) शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ साधन आहे. शिक्षणामुळे माणूस बहुश्रुत होतो.

6) ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, ‘श्रम हीच आमची पूजा’ आणि श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण हेच आमचे घोषवाक्य, समाजाच्या खालच्या थरापर्यंत शिक्षणप्रसार करणे हेच आमचे जीवित ध्येय आहे, असे ते म्हणाले.

7) शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी जबाबदार, सुसंस्कृत व चारित्र्यवान बनले पाहिजेत.

8) कोणाचाही मिंधेपणा न स्वीकारता, लाचारी न पत्करता मनगटाच्या जोरावर काम करून स्वावलंबनातून शिक्षण घ्या. Earn while you Learn या तत्त्वाचा विद्यार्थ्यांनी अवलंब करावा.

9) बहुजन समाजामध्ये बहुसंख्येने असलेला शेतकरी व कामगार यांना ज्ञानाची संजीवनी दिल्याशिवाय खराखुरा समाजवाद देशात येणार नाही.

10) ‘जसा शिक्षक तसा विद्यार्थी असे ते म्हणत’. शिक्षणामध्ये शिक्षक हा केंद्रबिंदू आहे. शिक्षकाच्या चालण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो.


Post a Comment

0 Comments

close