Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विशेष शिक्षकांना कायम करणे व नवीन विशेष शिक्षक पद निर्माण करणेबाबत शासन निर्णय | विशेष शिक्षकांच्या नेमणुकीकरीता ४८६० पदे राखून ठेवणेत येणार

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांना कायम सामावून घेण्याबाबत तसेच नवीन शिक्षकांच्या नेमणुकीकरीता ४८६० पदे राखून ठेवणेबाबत शासन निर्णय

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. १२.१२.२०२३ व मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. १९.०६.२०२४ रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये राज्यात समग्र शिक्षा अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत विशेष शिक्षकांपैकी २१८ दिव्यांग विशेष शिक्षकांना नियमित करण्याचे निर्देश प्राप्त होते. तसेच रजनिशकुमार पांडे व इतर यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली रिट याचिका क्र. १३२/२०१६ प्रकरणी दि.२८.१०.२०२१ व दि.१२.०३.२०२४ रोजी दिलेल्या निर्देशास अनुसरुन राज्यात सामान्य शाळेमध्ये प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.०६.०८.२०२४ रोजी संपन्न झालेल्या बैठकीतील प्राप्त निर्देशास अनुसरुन राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सद्यस्थितीत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत विशेष शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत मा. मंत्रिमंडळासमोर सादर प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाच्या दि.३०.०९.२०२४ च्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे. त्यास अनुसरुन राज्यात उपलब्ध रिक्त शिक्षकीय पदांपैकी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांना कायम सामावून घेण्याबाबत तसेच नवीन शिक्षकांच्या नेमणुकीकरीता ४८६० पदे राखून ठेवून सद्यस्थितीत कंत्राटी तत्वावर कार्यरत विशेष शिक्षकांचे उपलब्ध रिक्त पदांवर केंद्रस्तरावर एक याप्रमाणे समायोजन करण्याबाबतची व उर्वरित पदांवर भरती प्रक्रिया राबविण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णयः-

मा. मंत्रिमंडळाने दि. ३०.०९.२०२४ रोजी घेतलेल्या निर्णयास अनुसरुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे अनुपालन करण्याच्या दृष्टीने राज्य पातळीवर विशेष शिक्षक या पदाचा नव्याने समावेश करण्यात येत असून राज्यात सद्यस्थितीत उपलब्ध रिक्त शिक्षकीय पदांपैकी, प्रत्येक केंद्र स्तरावर एक या प्रमाणे, ४८६० पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरीता राखून ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे.

०२. उपरोक्त राखून ठेवण्यात आलेल्या उपलब्ध रिक्त पदांवर पुढील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-


०३. सदर विशेष शिक्षकांचे समायोजन आयुक्त (शिक्षण) यांच्या नियंत्रणाखाली शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी खालील निकषांच्या आधारे व कार्यपध्दतीचा अवलंब करुन करण्यात यावेः-

३.१. विशेष शिक्षकाने RCI (Rehabilitation Council of India) द्वारे या पदासाठी निर्धारित केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाची अर्हता पूर्ण केलेली असली पाहिजे.

३.२ विशेष शिक्षकाची इयत्ता १ ली ते इ. १२ वी पर्यंतच्या म्हणजेच सर्व शाळा स्तरातील (प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविण्याची क्षमता असली पाहिजे. यासाठी अशा विशेष शिक्षकाची व्यावसायिक अर्हता विशेष शिक्षण शास्त्रातील डी. एड. बी. एड किंवा बी.एड डी.एड. अशी असली पाहिजे. D.Ed असलेल्या शिक्षकांना सेवांतर्गत B.Ed करणे तसेच B.Ed असलेल्या शिक्षकांनी सेवांतर्गत D.Ed करणे बंधनकारक राहील.

३.३ समायोजन करावयाच्या विशेष शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन समकक्ष प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक), पदवीधर प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक), माध्यमिक शिक्षक या पदांस असलेली वेतनश्रेणी लागू राहील.

३.४ भारतीय पुनर्वास परिषद (RCI) द्वारे दिलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मार्गदर्शक तत्वानुसार नियुक्त व नोंदणीकृत असले पाहीजेत. तसेच भारतीय पुनर्वास परिषद (RCI) प्रमाणपत्र वैधता संदर्भातील निकषांची पूर्तता केलेली असणे आवश्यक आहे.

३.५ समायोजन करण्यात येणाऱ्या शिक्षकांची आरक्षण निहाय बिंदूवर समायोजन करण्यात यावे. बिंदुनामावलीनुसार विशिष्ट प्रवर्गाचे उमेदवार अतिरिक्त ठरत असल्यास ते शुन्य बिंदुद्वर समायोजित करुन, त्या संबंधित प्रवर्गाचे बिंदू रिक्त झाल्यानंतर त्या बिंदूवर त्यांचे समायोजन करण्यात यावे.

३.६ केंद्रस्तरावरील विशेष शिक्षक हा अनेकविध कौशल्यपूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच या शिक्षकास ब्रेल लिपी, साईन लँग्वेज, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बिहेवीयर थेरपी इत्यादी कौशल्ये अवगत असण्याची गरज आहे. म्हणजे तो Multi-Skill Special Teacher (बहुआयामी) शिक्षक असला पाहिजे. शाळांमध्ये वेगवेगळ्या दिव्यांग प्रकारचे विद्यार्थी असल्याने त्यांना शिकवणारा विशेष शिक्षक विशिष्ट एका दिव्यांग प्रकाराने प्रशिक्षित असल्यास तो सर्व दिव्यांग प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देऊ शकणार नाही. यासाठी केंद्रस्तरावरील प्रत्येक विशेष शिक्षकाला RCI ने शिफारस केलेल्या बहु-अपंग प्रवर्गाचे (Multi category Disability) (बहु अपंग प्रवर्ग शिक्षक) चे प्रशिक्षण अथवा अभ्यासक्रम सेवांतर्गत पूर्ण करणे बंधनकारक असले पाहिजे.

३.७ केंद्रांतर्गत घटक शाळेत दिव्यांग विद्यार्थी नसल्यास समायोजित विशेष शिक्षकाने सामान्य शिक्षकाप्रमाणे इतर विषयाचे देखील अध्यापन करणे बंधनकारक राहील. जेणेकरुन त्यांचे सेवेचे पूर्ण उपयोजन होऊ शकेल.

३.८ विशेष शिक्षकांच्या सेवा विषयक नियम व अटी शर्तीबाबतचा प्रारूप मसुदा शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी तयार करुन शासनाच्या मान्यतेकरीता सादर करण्यात यावा.

३.९ विशेष शिक्षक या राज्य पातळीवर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पदाचे सेवाप्रवेश नियम, भरती प्रक्रिया व तद्नुषंगिक बाबी सुनिश्चित करुन विभागस्तरावर उचित आदेश/नियमावली स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

३.१० समायोजन करावयाच्या विशेष शिक्षकांचे ते ज्या जिल्ह्यात/तालुक्यात/महानगरपालिकामध्ये कार्यरत आहेत, त्याप्रमाणे किंवा विशेष शिक्षकांच्या संबंधित जिल्हा परिषद, गट वा महानगरपालिकेमध्ये समुपदेशाने समायोजन करण्यात यावे.

३.११ सदर विशेष शिक्षकांची नियुक्ती केंद्रस्तरावर असल्याने त्यांचे सनियंत्रण संबंधित केंद्राच्या केंद्रप्रमुखांच्या अधिनस्त असावे.

३.१२ या व्यतिरिक्त समायोजनासाठी आणखी कार्यपद्धतीचा अंतर्भाव करण्याची आवश्यकता असेल तर आयुक्त (शिक्षण) यांनी आवश्यकतेनुसार समायोजनाचे कार्यपद्धती बाबतचे आदेश निर्गमित करावेत.

३.१३ सदर आदेश शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू राहतील.


०४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१००८१९२५४८५३२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


विशेष शिक्षकांना कायम सामावून घेण्याबाबत तसेच नवीन शिक्षकांच्या नेमणुकीकरीता ४८६० पदे राखून ठेवणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close