समूह साधन केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक व विशेष शिक्षक याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची (प्राथमिक) संख्या निश्चित करणेबाबत शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2026 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here
संदर्भ शासन निर्णय
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. एसएसएन-२०१५/(प्र.क्र. ९/१५)/टीएनटी-२, दि. २६.११.२०१९.
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. एसएसएन-२०१५/(प्र.क्र. १६/१५)/टीएनटी-२, दि. १५.०३.२०२४.
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. ७४७/टीएनटी-१, दि. ०८.१०.२०२४.
४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. केंप्राशा-२०२३/प्र.क्र. ५६०/टीएनटी-१, दि. २१.०८.२०२५.
प्रस्तावना :
संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनावरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची (प्राथमिक) संख्या २३६२८८ इतकी निश्चित करण्यात आली आहे. संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत समूह साधन केंद्रांची (केंद्र) पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत ४८६० समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परि. ५.४ अन्वये केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी ०१ पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा) हा ४८६० पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे.
संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) संवर्गातील प्रत्येकी ०१ पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) हा ४८६० पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे.
उपरोक्त प्रमाणे प्रत्येकी ४८६० पदांचा समावेश असलेले दोन संवर्ग निर्माण झाले आहेत. अर्थात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही, ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर दोन संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करुन सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :
संदर्भ क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांचा (प्राथमिक) अद्यावत तपशिल या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये दर्शविण्यात आला आहे.
परिशिष्ट-अ मध्ये जिल्हा परिषदनिहाय शिक्षकीय संवर्गातील मंजूर पायाभूत पदे व शिल्लक पायाभूत पदे याचा तपशिल दर्शविण्यात आला आहे. एखाद्या वर्षाच्या संचमान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे परिशिष्ट अ मध्ये दर्शविण्यात आलेल्या मंजूर पदांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरुपात समायोजित करण्याचा अधिकार आयुक्त (शिक्षण) यांना असेल. तथापि, संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरते पदांचे समायोजन करता येईल.
संचमान्यतेसाठी उपरोक्त परिशिष्ट-अ मधील तपशिल विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.
केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा) व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) या दोन्ही संवर्गाची बिंदू नामावली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०१०२११५२५२४५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक व विशेष शिक्षक याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची (प्राथमिक) संख्या निश्चित करणेबाबत शासन निर्णय डाऊनलोड करा. - Click Here




0 Comments