Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खूप हसाल - भन्नाट जोक, ट्रेन मधील सीट बुकिंग

एका बाईने दिवाळीला जाण्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवलेली असते. ती जाम आनंदात असते. जायचा दिवस येतो, ती ट्रेनमध्ये आपल्या जाग्यावर बसायला जाते तेव्हा नेमका तिथे एक माणूस बसलेला असतो. 

ती त्या माणसाला, "ओ, उठा, ही माझी जागा आहे" म्हणत उठवायचा प्रयत्न करते. तिच्या या वाक्यावर त्या पुरुषाने दिलेली उत्तरे, वेगवेगळ्या आवाजात:

13) अशोक सराफ: तुमची जागा आहे म्हणजे? हे हे तिकीट म्हणजे काय 'हे' आहे का? अहो, दहा चकरा मारल्यात मी टीसीच्या मागे. किती? दहा! तेव्हा कुठे त्याने मला ही जागा दिलीये. मला सांगतीये.. (मागे टीसी दिसल्यावर) मी कुठे नाही म्हणतोय, मी कुठे नाही म्हणतोय.. मी नाही म्हणालो तुम्हाला? बसा बसा.. बसा म्हणजे काय? बसायलाच पाहिजे.. 

12) लक्ष्या: तुमची जागा आहे? एक.. एक मिनिट हा, जरा माझं तिकीट बघतो. (खिसे चाचपडत) इथे आहे का? नाही, मग खालच्या खिशात? इथेही नाही. (शेजारच्याला उद्देशून) चुकून तुमच्या खिशात नाही ना ठेवलं? (त्याने रागात पाहिल्यावर, दात काढत) अह्यं.. आजोबा चिडले वाटतं.. (बाईदेखील हसत नाहीये, हे पाहिल्यावर सिरियस होत) सापडलं सापडलं, वरच्याच खिश्यात होतं. (तिकीट पाहून) आयला हो की, पण तुमची हरकत नसेल तर आपण वन बाय टू बसूया का? (बाईने रागाने पाहिल्यावर, मागे बघून) ए कोणे रे.. काही पण बोलतो का..? काही स्टॅंडर्ड आहे की नाही मॅडमचं..? (बाईकडे पाहत) काहीही बोलतात, उठतो मी.. उठतो..

11) महेश कोठारे: बिनडोकासारखं काहीतरी बोलू नका. मी स्वतः ऑनलाईन काढलं आहे तिकीट. आणा पाहू तुमचं तिकीट. (तिकीट पाहिल्यावर) डॅमीट, वाटलंच मला. तुम्ही नक्कीच त्या कवटी... म्हणजे गावठी एजेंटकडून तिकीट विकत घेतलं अशणार, त्यानेच तुमची फसवणूक केली अशणार, पण काळजी करू नका, मी जातीनं याचा तपास करेन.. हवालदार यांची कंप्लेन्ट घ्या..

10) सचिन:  हे कदापी शक्य नाही. मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झाला असणार. पण तरीही एक बाईमाणुस म्हणून मी तुम्हाला माझी जागा देऊ इच्छितो. माझ्यासारख्या तरुणाला उभं राहून प्रवास करणं काही मोठी गोष्ट नाही. आय स्वेयर, यु कॅन टेक माय प्लेस.. शेवटी काय ही आपली मुंबई आहे, हो की नाही..?

9) प्रशांत दामले: अहो काय जागेचं घेऊन बसलाय.. अश्या  छोट्या मोठ्या चुका होत राहतात.. आणि खरं सांगू का, हे असं एखाद्याला बसलेल्या जागेवरून उठवणं मुळात हे सुद्धा चूकच आहे.. चूकवरून आठवलं.. (पेटी काढून, वाजवायला घेत) "मला सांगा चूक म्हणजे नक्की काय असतं.. " अहो थांबा, अहो थांबा.. पूर्ण तरी करू द्या..

8) भरत जाधव: काय माझी जागा, माझी जागा लावलंय केव्हापासून? बसलोय ना मी आता इथे? जेव्हा मी इथून उठेन तेव्हा बसायचं, कळलं. आली मोठी शहाणी.

6) संजय नार्वेकर: अर्ये क्वोन तू? आन मला काय उठवत्येस? आपल्याला हितचं बसायचंय आं खिडकीजवळ. तुला काय करायचं ना ते करून घ्यायचं, बरं का. कोणाला बोलवायचं ते बोलावं. घाबरत नाय आं आपण कोणाला.. हां...

5) अंकुश चौधरी (फास्ट, नॉनस्टॉप टोनमध्ये): तुला इथेच बसायचं तर तू इथे बस, मी उभा राहतो किंवा थोडयावेळ तू उभी राहा, मी बसेन, माझं स्टेशन येईल दहा मिनिटात किंवा आपण दोघेही डबल सीट बसू माझी काहीच हरकत नाही, काय बोलतेस?

4) मकरंद अनासपुरे: अय डोळे बिळे फुटले ककाय तुझे? माझं तिकीट आहे हितं. हे म्हणजे असं झालं, कधी नाय ती विंडो सीट भेटली अन बायडी येऊन उगीचच खेटली.. ह्या ह्या ह्या..

3) नाना पाटेकर: तुझी जागा आहे म्हणतेस? च्छान आहे. ही समोरची सीट, ती पण च्छान आहे. बाजूची बघ, ती पण च्छान आहे. पूर्ण ट्रेनच किती च्छान आहे. कुठेही बसू शकतेस तू, मग इथेच बसायचा अट्टाहास का?

2) मोहन जोशी: अहो बाई, म्हाताऱ्या माणसाच्या तोंडावर सांगता तुम्ही उठायला, या म्हाताऱ्या माणसाच्या तोंडावर सांगता? मान्य तुम्ही बाईमाणुस आहेत, पण ह्या वयस्कर माणसाचं काही आहे की नाही तुम्हाला? अवघड आहे सगळं, अतिशय अवघड आहे परमेश्वरा. असं वाटतंय आत्ता या क्षणी ट्रेनमधून उडी मारावी, पण माझं स्टेशन अजून लांब आहे.. तर तोवर.. तुम्ही पण टेकवा कुठेतरी थोड्यावेळ..

1) विक्रम गोखले: हे.... सहन करण्याच्या..... पलीकडचे आहे. म्हणजे एका.... असहाय्य स्त्रीने... असा एकटा प्रवास करणं..... आणि तिला तिच्या... हक्काची जागा न मिळणं.. हे... चीड आणणारं आहे... मला वाटतं.. तिला तिच्या हक्काची जागा.... मिळायलाच हवी.. (मग त्यांना शेजारचा सांगतो की तुम्हीच त्यांच्या जागेवर बसला आहात)

#पुढील_स्टेशन_दातकाढा

Post a Comment

0 Comments

close